सातारा : कऱ्हाड तालुक्यातील शामगाव घाटात संशयितरित्या फिरणाऱ्या टोळीला उंब्रज पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने अटक केली. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने औरंगाबाद जिल्ह्यातील रेकॉर्डवरील चंदनचोरांची टोळी गजाआड झाली. त्यांच्याकडून दुचाकी व चंदन चोरीचे शस्त्र व साहित्य असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. शामगावच्या घाटात पहाटे झालेला थरारक पाठलाग आणि पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने टोळी जेरबंद झाल्याने सातारा, नगर, औरंगाबादसह पुणे जिल्ह्यात चंदनचोरी व चोऱ्यांची कबुली त्यांनी दिली आहे.
त्या टोळीची औरंगाबादमध्ये ‘पुष्पा’ नावाने नोंद होती. उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड त्यांच्या कर्मचाऱ्यांसह रात्रगस्त घालत होते. त्यावेळी त्यांनी सतर्क राहण्याचे आदेशही दिले होते. त्यांच्यासोबत हवालदार विष्णू मर्ढेकर, प्रशांत पवार होते. दुचाकीवरून तीन संशयित शामगाव भागात फिरत असून चंदनाची झाडे हेरून रात्री ती कापून आतील चंदनाच्या गाभ्याची चोऱ्या करतात, अशी त्यांना माहिती मिळाली. हवालदार मर्ढेकर व पवार यांनी त्या भागात रात्रगस्त पट्रोलिंग वाढवले. त्यावेळी त्यांना दुचाकी (एमएच ११ झेड ५३९७) संशयित ट्रिपल सीट फिरताना आढळले.
दुचाकी थांबवून त्यांनी तपासणी केली. त्यावेळी दुचाकीवरील काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून त्यांना पहाटे पकडले. त्यांच्याकडे करवत, बॅटरी, कुऱ्हाडीसारखी शस्त्रे आढळली. त्यांच्याकडे चोरीचे साहित्य आढळल्याने तिघा संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली. चंदनचोरीसाठी कुऱ्हाडीची पाती त्यांनी त्यांच्याकडे ठेवल्याची कबुली दिली. चौकशीवेळी संशयितांनी सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता शस्त्रे चंदन तोडीला वापरल्याचे त्यांनी सांगितले. संबंधितांनी चंदन गाभा काढण्यासाठीच ती बाळगल्याची कबुली दिली. तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित असून त्यांच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.
गस्त घालताना पोलिसांनी चाणाक्षपणा दाखवल्यास गुन्हेगारांचा पर्दाफाश होतो. त्याचे उत्तम उदाहरण चार दिवसांपूर्वीच शामगाव हद्दीत अनुभवास आले. रात्रगस्तीच्या पोलिसांना शामगाव घाटात काही लोक संशयितरित्या फिरतानाची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी दाखवलेल्या चाणाक्षपणामुळे चंदनतस्करांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांचा पाठलाग करून पकडलेल्या टोळीकडून सातारा, नगर व पुणे जिल्ह्यांतील चंदनतस्करीचे २० हून अधिक गुन्हे उघडकीस आले. औरंगाबाद जिल्ह्यातील वॉन्डेट टोळी पोलिसांच्या चाणाक्षपणाने गजाआड झाली. त्यामुळे जिल्ह्यातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्यासही हातभार लागला.
लपवलेले चंदन जप्त...
पोलिसांच्या तपासात तिघे संशयित घातक असल्याचे पुढे आले आहे. तिघांवर औरंगाबाद जिल्ह्यातील चोऱ्यांचे गुन्हे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. संबंधितांनी लपवून ठेवलेले सात हजार ५०० रुपयांचे चंदनाचे झाड व त्याच्या खोडातील चंदनाचा गाभा काढून दिला असून पोलिसांनी तोही जप्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.