सर्जनोत्सव - भुलाबाई , भोंडला, हादगा

विविधतेने नटलेली आपली भारतभूमी. सण, उत्सव, परंपरा यातून वेगवेगळ्या पद्धतीने या संस्कृतीचे जतन संवर्धन केले जाते. महाराष्ट्र या उत्सव परंपरेत अग्रस्थानी आहे.
Bhondala
BhondalaSakal
Updated on

- अपर्णा पाटील-महाशब्दे

विविधतेने नटलेली आपली भारतभूमी. सण, उत्सव, परंपरा यातून वेगवेगळ्या पद्धतीने या संस्कृतीचे जतन संवर्धन केले जाते. महाराष्ट्र या उत्सव परंपरेत अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील अशीच एक उत्सवरुपी लोकपरंपरा म्हणजेच भोंडला, भुलाबाई, हादगा होय.

प्रवाही असे जी चिरंजीव आहे, अनेकातुनी एकता जेथे वाहे

प्रतिक स्वरुपात जी व्यक्त होते, नमस्कार त्या भारतीय संस्कृतीते

महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने भोंडल्याची परंपरा पाळत असल्याचे दिसतं. पश्चिम महाराष्ट्रात या उत्सवाला भोंडला म्हटलं जात, विदर्भात हाच हादगा होत; तर खान्देशात शिवपार्वतीच्या रूपातून भुलाबाई अवतरतात. खरंतर हे स्त्री मनाचा भाबडा वेध घेत स्त्रियांना मुक्त व्हायला शिकविणारे, स्त्री भावनांचा तरंग सांगणारे उत्सव, सर्जनोत्सव होय.

भाद्रपदात गौरी गणपती झाले की मुलींना वेध लागतात ते भुलाबाई/भोंडल्याचे. त्या अगदी वाटच पाहत असतात या उत्सवाची. लहानपणी भातुकली खेळायचा तिचा हक्क असतो ना, तसाच हा भोंडला, हादगा, भुलाबाई उत्सव हा तिचा हक्काचा उत्सव. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत लाडक्या गणरायाला निरोप दिला की त्याच मखरात खान्देशात विराजमान होते ती ‘भुलाबाई’.

डोई माठ पाण्याला जाई,

भुलाबाई ग माझी भुलाबाई ।

भुलाबाई बाजूला भुलोजी,

पाळण्यात तुमचे बाळ खेळाती ।।

झिम्मा खेळू फुगडी घालू प्रेमाने

आपण नाचू गाऊ ।।

भाद्रपद पौर्णिमेपासून महिनाभर घरोघरी खान्देशात भुलाबाई-भुलोजीच्या मातीच्या मूर्ती प्रस्थापित करून गाणी गायली जातात.

इनामगाव, चांडोली येथील उत्खननात एका मातीच्या पेटीवर स्त्रीची मृण्मय मूर्ती आढळली. ती भुलाबाईची असावी असा कयास व्यक्त केला गेला. तेव्हापासून भुलाबाईचे पूजन केले जात असावे. ताम्रपाषाण युगातील ही लोक परंपरा साधारणत: साडेतीन हजार वर्षांपूर्वीची असावी. विजया जहागीरदार यांच्या ‘कर्मयोगिनी’ या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील कादंबरीतही अहिल्याबाईनी आपल्या नात सुनेबरोबर भुलाबाईची गाणी म्हटल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ३०० वर्षापेक्षा अधिक पुरातन असे भुलाजा भुलाईचे एकमेव मंदिरदेखील आहे.

अशाच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात अश्विन महिन्याला सुरुवात झाली, की अंगणात मधोमध हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करत, त्याभोवती फेर धरून भोंडला खेळला जातो.

ऐलमा पैलमा गणेश देवा,

माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय बुरुजावारी

बुरुजावारी फकिराचे गुंजावणी डोळे

गुंजावणी डोळ्यांच्या सारविल्या टीका

हत्तीचीचं प्रतिमा का? तर त्यावेळी वर्षा ऋतू संपून शरद ऋतूचे आगमन झालेले असते. सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश झालेला असतो. निसर्गाने बहरलेली धरती, फुलांची, पानाची, धान्याची समृद्धी लेवून आलेली असते. या समृद्धीचे प्रतीक म्हणून हत्तीची पूजा केली जाते. हत्ती हे शक्तीचं, बलाचं प्रतीक, म्हणूनच भोंडला/हादगा हा पृथ्वीच्या सुफलीकरणाचा उत्सव. हस्ताचा पाऊस मानवी जीवनात नवचैतन्य, नवसंजीवनी घेऊन येतो म्हणूनच भोंडला म्हणजे एक प्रकारे चैतन्य पूजाच! हस्त नक्षत्राला सुरू होणारा सण १६ दिवस कोजागिरी पोर्णिमेपर्यंत खेळला जातो.

हस्त हा जीवनाचा राजा,

पावतो जनांचिया काजा,

तयासी नमस्कार माझा ।।

आपण भारतवासी देवच नाही तर नदी, पर्वत, झाडे, अगदी मातीही देवस्वरूप मानून त्याची पूजा करतो. वटपौर्णिमेला आपण वड पुजतो, वसुबारसेला गाईला वंदितो, आपण गोवर्धनही पुजतो, कारण हे सर्व आपल्याला काहीना काही देणारे दाते आहेत. आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक अंगाचा विचार करणारी आपली भारतीय संस्कृती. कृतज्ञता व्यक्त करणे हा तर आपला संस्कारच. अशा उत्सव गीतातून व्यक्त केली जाते. अगदी छोटीशी कोथिंबीरही सुटत नाही.

कोथिंबीरी बाई गं, आता कधी येशील गं

आता येईन चैत्र मासी,

चैत्रा चैत्रा लवकर ये

हस्त घालीन हस्ताचा,

देव ठेवीन देव्हाऱ्या

देव्हाऱ्याला चौकटी, उठता

बसता लाथा-बुक्की

संस्कृतीचा लोकोत्सव

भुलाबाई, भोंडल्याची ही गाणी कोणी, कधी, लिहिली हे सांगणे कठीण आहे. परंतु वर्षानुवर्षे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपात वहन होत आलेली आहे. त्यामुळे या गाण्यात शुद्धता, व्याकरण इ. ला महत्त्व नाही. वर्षानुवर्ष चालत आलेली ही लोककला. खरेतर आपल्या कामातील व्यग्रतेतून महिलांना थोडे मोकळे होण्यासाठी मिळालेलं व्यासपीठाच. या उत्सवात गायली जाणारी गाणी बहुतांशी स्त्री मनाचा भाबडा वेध घेणारीच. ‘शिक्यावारचे लोणी’, ‘कारलेच बी’, ‘कृष्ण घालितो लोळण’, ‘राधा रुसली सुंदरी’, ‘अडकित जाऊ खिडकीत जाऊ’ यासारख्या अनेक गाण्याने, टिपऱ्याच्या नादाने वातावरणात नवीन उत्साह संचारतो. सारे भेद दूर सारत एकत्र येऊन ठेक्यात, लयीत सुरात सूर मिसळीत गीत गातांना, सामुहिकता, समरसतेचा संस्कार आपोआप मनात रुजविणारा हा लोकोत्सव.

भुलाबाई, भोंडल्याच्या या खेळात खिरापत ओळखणे हाही वेगळा आनंद देणारा क्षण. खिरापतीला आणलेला पदार्थ काय? हे ओळखताना येणारी मजा काही औरच असते.

सर्प म्हणे मी नाकुला, दारी अंबा एकुला

दारी आंब्याची कोय ग, खिरापतीला काय गं

एकमेकांच्या सोबत मनसोक्त हसता गाता यावं, मनातील भावना मुक्तपणे बोलता याव्यात यासाठीच भोंडला, भुलाबाई, हादगा यासारखे उत्सव सुरू झाले असावे नाही का!

आड बाई आडोणी

आडाचं पाणी खारवणी।

आडात पडला शिंपला,

आमचा भोंडला संपला

आज आधुनिकतेच्या नांदीत, हा आनंद हरविलेला दिसतो. ‘करिअर’च्या नादात जीवनाचा आनंदच गमविलेला दिसतो. तोच आनंद पुन्हा अनुभवणेसाठी अशा लोककलांचा, परंपरेचा वारसा जतन करणे आवश्यक आहे असे वाटते. आपल्या संस्कृती, कला, परंपरेचा वारसा जपून ठेवत, हा वसा पुढील पिढीस माहित असणे आवश्यक आहे, सामाजिक जाण ठेवत, कालानुरूप बदल करून आपण आपल्या लोप पावत चाललेल्या संस्कृतींचे जतन करावयास हवे. पारंपारिक काळानुरूप गाण्यात थोडे बदल करून जनजागृतीसाठी प्रयत्न व्हायला हवेत.शेवटी संस्कार म्हणजे तरी काय? गुणांची बेरीज व दोषांची वजाबाकी, हळुवार हाताने दोष दूर करायचे व सुदृढ हाताने गुणांची प्रतिष्ठापना करायची. आपली संस्कृती जपण्यात आपणही आपला खारीचा वाट उचलू या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.