विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठालाची...! संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाचा भक्तीत तल्लीन झालाय. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असतं. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते. देवशयनी एकादशी बद्दल असे म्हटले जाते की, या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात.
धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र म्हणून ओळखली जाते. या दिवसानंतर चातुर्मास सुरु होतो. हा दिवस वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा ही तिथी 17 जुलैला साजरी केली जाणार आहे.
प्रत्येकाला पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य नसते. अशावेळी आपल्या शहरातील विठ्ठल मंदिरात जाऊन भक्त दर्शन घेतात. पण आषाढी एकादशीला माऊलीची कृपा घरावर कायम राहावी म्हणून घरच्या घरी पूजा कशी करायची जाणून घ्या.
हिंदू पंचांगानुसार आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8.33 वाजेपासून 17 जुलै रात्री 9.33 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलैला साजरी होणार आहे.
देवशयनी एकादशीला अनुराधा नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योग असणार आहे. सकाळी 7.04 पर्यंत शुभ योग आणि त्यानंतर शुक्ल योग असणार आहे.
विठ्ठल रुक्मिणी मूर्ती
पाणी
पंचामृत
चंदन आणि हळद मिश्रित पाणी
हळद कुंकू
अष्टगंध
बुक्का
तुळशी पत्र
नवीन वस्त्र
5 फळं
विडाचे पान
सुपारी
तांदूळ
गुलाबाचे फुल
केळी
अगरबती
कापूर
आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन घरातील देवाची पूजा करा. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा.
विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी.