ज्ञानेश्वर माऊलींच्या रथामागची एक दिंडी, माणसे साडेतीन हजार, ट्रक, ट्रॅक्टर, छोटी वाहने मिळून चाळीस वाहने, जेवायला काय...
सासवड : ज्ञानेश्वर माऊलींच्या रथामागची एक दिंडी, माणसे साडेतीन हजार, ट्रक, ट्रॅक्टर, छोटी वाहने मिळून चाळीस वाहने, जेवायला काय...साडेतीन चार हजार मांडे...हजार-बाराशे किलो आंब्याचा रस, वरण भात, भाजी...होय!
हा आजच्या द्वादशीच्या पारण्याचा बेत. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील तीन गावांत महिला दिवस-रात्र जागून हे मांडे तयार करून वारीत चालणाऱ्या वारकरी माउलींना टेंपोत पाठवून देतात. या गावांतील महिलांनी सेवेसाठी केलेल्या संघटित शक्तीतून सकारात्मक भावाचे अनोखे दर्शन घडते, ते वारीच्या वाटेवर...
सटाणा तालुक्यातील शारदे, अंबासन, शिरपूरवडे या तीन गावातील सर्व महिला आषाढी वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा म्हणून मांडे खाऊ घालतात. त्यानुसार आज द्वादशीला मांडे पाठवायचे असल्याने काल दुपारी बारापासूनच गावातील मांड्याच्या भोजनाच्या कामाला सुरुवात होते.
प्रत्येक घरोघरी डाळ शिजायला सुरुवात होते. लहान मुलीपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत प्रत्येक महिला वारकऱ्यांच्या सेवेसाठी जाणाऱ्या प्रसादाला हातभार लावतात. या महिलांत आपलेच मांडे कसे जास्त होतील यासाठी चढाओढ लागते.
अतिशय आत्मीयतेने प्रत्येक महिला रात्री बारापर्यंत राबत आपला मांड्याचा वाटा आणून देतात. ते सर्व एकत्रित करून सकाळी मांड्यांचा टेंपो वारीत दाखल होते. यावर्षीही सटाणा तालुक्यातील तीन गावांतून आलेले मांडे आणि हजार-बाराशे किलोच्या आंब्यांच्या रसाचे जेवण दुपारी बारा वाजता सुमारे साडेतीन हजार वारकऱ्यांना देण्यात आले.
याबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘गोविंद महाराज केंद्रे यांनी आमच्या गावात हरिनाम सप्ताह सुरू केला. त्यामुळे आमच्या परिसरातील भाविकांचा या दिंडीशी स्नेह आहे.’’
४६ क्रमाकांच्या दिंडीने लक्ष वेधले
ज्ञानेश्वर माऊलींच्या रथामागे ४६ क्रमांकाची दिंडीत सुमारे तीन-साडेतीन हजार वारकरी आहेत. पंढरपूरसमीप सोहळा गेल्यानंतर ही संख्या दुपटीने वाढते. या दिंडीत राज्याच्या सर्व भागातील वारकरी सहभागी होतात. या दिंडीचे दीडशे तंबू आहेत. छोटी-मोठी पंचवीस-वाहने आहे. विशेष म्हणजे या दिंडीत संपूर्ण वाटचालीत एक गोड पदार्थ दुसऱ्या पंगतीला नसतो. तसे नियोजन केले जाते. विष्णूमहाराज केंद्रे हे वारसा चालवित आहेत.
वारकऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना गावापासून दूर अंतरावर मुक्काम करावा लागतो, असे या दिंडीचे व्यवस्थापक भास्कर महाराज पवार यांनी सांगितले.
भाव, कृती अन् सकारात्मक परिणाम
संघटित शक्तीचे दर्शन या तिन्ही गावांमधून दिसून येते. सेवेसाठी सकस चढाओढ लागणे ही अतिशय चांगली गोष्ट यामधून अधोरेखित होते. कोणतीही सेवा असो, तिच्यातील भाव अतिशय महत्त्वाचा असतो, तो या गावांमधून दिसून येतो. मनात माऊलींविषयी असलेला सेवेचा भाव त्यांच्या कृतीत उतरला. त्याचा परिणाम म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट सहज साध्य झाली आणि हजारो वारकऱ्यांना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मांडे-आमरसाचे जेवण देण्यात आले.
अन्नदान करण्याच्या उद्देशाने आम्ही वारकऱ्यांना मांडेभोजन देतो. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांना मुक्ताईने मांडे खाऊ घातले होते. त्यामुळे याच सोपानदेवांच्या नगरीत वारकऱ्यांना मांडे खाऊ घालण्याची सेवा देण्याची संधी आम्हाला मिळते, हे आमचे भाग्य आहे.
- युवराज देवरे, सेवेकरी, शिरदे, ता. सटाणा, जि. नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.