बरड : ‘माऊली कोणालाही उपाशी ठेवत नाही’, माऊली सर्वांना चालवते’, माऊली बळ देते’, असे नेहमी ऐकिवात होते. त्याचा अनुभव फलटण ते बरड या वाटचालीत शुक्रवारी आला. पंढरीच्या वारीच्या वाटेवर श्रद्धा, भक्ती आणि मानवता जगते, याची जाणीव झाली. उन्हाचा पारा ३६ अंशावर गेला होता. घामाच्या धारा अंगातून वाहत होत्या.
थकलो होतो. भूक लागली होती. तेवढ्यात एक वयस्कर वारकरी भेटले. नाव विचारले तर म्हणाले, महादेव गवारी. आधी माझ्या हाताचा आधार घेऊन चालू लागले आणि काही अंतरावर दिंडीत तल्लीन होऊन आनंदाने गाऊ लागले. ‘टाळ-मृदंग आणि अभंगाच्या आवाजाने पायाला बळ मिळतं,’ या त्यांच्या मूलमंत्राने माझ्याही पायात बळ आलं होतं.
फलटण ते बरड वारीच्या वाटेने चालत होतो. उन्हाचा पारा चढला होता. सहकारी झपाझप चालत होता. तुलनेत मी मागे पडत होतो. विडणीला माऊली विसाव्याला थांबली. न्याहारीची वेळ झाली आणि भूकही लागली होती.
बाजूला विक्रेत्याकडून ताक घेतले. नंतर ओळखीच्या वारकऱ्याने दिलेला लाडू खाऊन पुढची पिंपरदची वाट चालू लागलो. उन्हामुळे पावलांची ताकद कमी होत होती. सोहळ्याच्या पुढे चालणारे सर्वच वारकरी घामाघूम झालेले. डोक्यावर ऊन आणि पोटात भूक, अशी अवस्था होती. माझ्या पुढे ७०-७५ वर्षांचे आजोबा पाय लपकत चालले होते.
गळ्यात तुळशीच्या दहा बारा माळा होत्या. त्यांनी अचानक माझा हात घट्ट पकडला. म्हणाले, माऊली जरा आधार घेतो.’ माझ्या हाताचा आधार घेत ते चालू लागले. मलाही वेगात चालण्याने काहीसा शीण आला होता. त्यांच्यामुळे आरामात हळूहळू चालू लागलो. तेवढ्यात माझा सहकारी म्हणाला, की ‘तुम्ही चुकीच्या माणसाचा आधार घेतलाय बाबा. तेच दमलेत.’ बाबा म्हणाले, ‘‘पुढे चालणाऱ्या त्या माणसाच्या हातात तांब्या आहे. तो घेऊन या.
त्यात पंचामृत आहे, ते घ्या.’’ गरज असल्याने आम्हीही ती संधी सोडली नाही. दोघेही पंचामृत प्यायलो. थोडं बरं वाटलं. बाबांना विचारले, ‘पंचामृत कुठून आणलं’. बाबा म्हणाले, ‘मी पहाटे महापूजेला जातो, तेथून आणले होते, सर्वांना वाटत होतो.’ मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. ‘घरी कोण कोण असतं?’ असं विचारल्यावर म्हणाले, ते म्हणाले, की ‘दोन मुलं, एक मुलगी आहे. एक मुलगा डीएड झालाय. दुसरा पोल्ट्री फार्म चालवतो. अकरा वर्षांपूर्वी पत्नी गेली.’
‘उन्हाने बेजार झालो,, असे मी म्हणताच, बाबा म्हणाले, ‘पोरा, एक लक्षात ठेवायचं. वारीत चालताना, दोन बाटल्यांत दोन लिंबे पिळायची, मीठ -साखर टाकायची आणि वाटेनं थोडं-थोडं पित राहायचं. भरपूर पाणी प्यायचं.
अशा उन्हामध्ये ते लयं गरजेचं असतं.’ बाबांनी मला वारीत, उन्हात चालतानाचा गुरुमंत्रच दिला होता. मी त्यांना म्हणालो, ‘बाबा रथासोबत दिंड्यांबरोबर चालताना कळत नाही, पण पुढे नुसते चालताना चाल उरकत नाही.’ त्यावर बाबा म्हणाले, ‘टाळ-मृदंग आणि अभंगाच्या आवाजाने पायाला बळ मिळतं.’
एक दिंडी टाळ-मृदंगाचा गजर करीत चालली होती. त्यावेळी अचानक बाबांनी मला ढकलत दिंडीत नेले. माझ्या हाताचा आधार घेत अभंग म्हणू लागले. बाबांच्या आणि माझ्या पायाचा वेग आता वाढू लागला होता. चालता चालता माझा हात सोडून बाबांनी दिंडीतील एका वारकऱ्याचा टाळ घेऊन अभंग म्हणायला सुरुवात केली.
बाबा अभंग गाण्यात तल्लीन झाले होते. बाबांनी माझ्या हाताचा आधार सोडला होता. मलाही मनात काही तरी चुकल्यासारखे वाटत होतं. म्हणून मी बाबांना अभंग म्हणतानाही आधार देण्याचा प्रयत्न करीत होतो. पण, बाबा आता दिंडीसोबत झपाझप पावले टाकत चालत होते. मी हळूहळू दिंडीच्या बाहेर जाऊ लागलो. पिंपरदजवळ आल्यावर बाबांचे दर्शन घेऊन मी निरोप दिला.
माऊली कोणालाही उपाशी ठेवत नाही’, असेही ऐकले होते. त्याचा प्रत्यय पंचामृताच्या रूपाने आला. माऊली सर्वांना चालवते, असे म्हटले जाते, त्याचीही अनुभूती सल्ल्यातून आली. माऊली बळ देते’, असे नेहमी ऐकिवात होते. त्याचा अनुभव वारीत चालणाऱ्या आजोबांच्या रूपाने भजनात रममाण होत चालण्यावरून आला. पंढरीच्या वारीच्या वाटेवर श्रद्धा, भक्ती आणि मानवता जगते, याची जाणीव झाली. एकंदरीत काय तर, विश्वरूप माउलींवर तुम्ही श्रद्धा ठेवा, ती सर्वांना तारून नेते,’ असे वारकरी म्हणतात. त्याची अनुभूती वारीच्या वाटेवर आली. मानवतेची ही गंगा अखंड सुरू राहते. अशाच मानवतावादी विचार वारीच्या वाटेवर दररोज जगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.