श्रुती आपटे
Bhagvat Geeta Spiritual Tips : हल्ली प्रत्येकच गोष्टीचा इव्हेंट करण्याची फॅशन झाली आहे. मग तो एखादा घरगुती कार्यक्रम असू दे किंवा अगदी देवाचा सोहळा. भरपूर पैसा खर्च करणं, शो ऑफ करणं मोठेपणा मिरवण्यातच अधिक उत्सुकता असल्याचं दिसून येतं.
पण भगवत गीतेत श्रीकृष्ण स्वतः सांगतात की, देव हा फक्त भावाचा भुकेला असतो. तुमचा मोठेपणा, खर्च किती केला याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. काय म्हणताता श्रीकृष्ण जाणून घेऊया...
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।
पान, फूल, फळ, जल जो मला भक्तीने अर्पण करतो त्या प्रयतात्म मनुष्याची भक्तीयुक्त भेट मी आनंदाने स्वीकारतो.
भक्ती योगात अनन्य भक्ती महत्त्वाची असते. अशी अनन्यता कशी साध्य करावी ते आपल्याला संतांच्या भक्ती भावातून पाहायला मिळते. भगवंत भक्तांच्या प्रेमाचा भुकेला असतो. संतांच्या सहाय्याला तो धावून जातो.विठ्ठलाच्या भक्ती मध्ये तल्लीन झालेल्या अनेक संतांची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. हा विठ्ठल संत नामदेवांनी भरवलेला घास खातो.
संत जनाबाईंना दळण दळू लागतो. संत एकनाथांच्या घरी सेवेसाठी राहतो. तर संत नरसी मेहतांचा केदार राग ऐकण्यासाठी त्यांना ऋणमुक्त करतो. संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचवतो. प्रल्हाद, ध्रुवबाळ यांच्या कथा सुद्धा अशाच अनन्य भक्तीचे उत्तम उदाहरण आहेत. भगवान श्रीकृष्णाला खरोखरच काय हवं असतं? तो कशाने प्रसन्न होतो?
याचे अगदी सोपे उत्तर श्रीकृष्णाने दिले आहे. देव भावाचा भुकेला असतो. एखादे पान, फूल, फळ किंवा अगदी थोडसं पाणी सुद्धा प्रेमाने, भक्तिभावाने भगवंताला अर्पण केले तर तो संतुष्ट होतो. अर्पण करणारा मात्र ‘प्रयतात्मा’ असणे महत्त्वाचे आहे. निष्काम, निःस्वार्थी निष्कपट असला पाहिजे. सुदाम्याचे पोहे, शबरीची उष्टी बोरे, विदुरा घरच्या कण्या सुद्धा भगवंताला
अमृतासारख्या स्वादिष्ट लागल्या. भगवान श्रीकृष्ण स्वतः जगदीश्वर आहे. त्रैलोक्याचे ऐश्वर्य त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. निर्मळमन, अत्यंत प्रेम आणि समर्पण भाव याचेच त्याला कौतुक असते. कुठलातरी सुप्त हेतू कामना अपेक्षा ठेवून कितीही मौल्यवान वस्तू त्याला अर्पण केल्या तरी भगवंताच्या दृष्टीने त्याचे मूल्य शून्यच असते.
एखादे लहान मूल आईनेच दिलेला खाऊ तिलाच निष्पाप मनाने भरवते. आई कौतुकाने तो खाते. त्या आईसारख्याच प्रेमाने भगवंत भक्ताच्या प्रेमभेटीचा स्वीकार करतो. भगवंत अर्जुनाला समजावतात, हे कौंतया, तू जे काही करतोस, जे खातोस, यज्ञ,दान तप करतोस, ते सर्वकाही मलाच अर्पण कर. या त्यागाच्या आणि अर्पणाच्या भावामुळेच तू कर्मांच्या शुभाशुभफलांच्या बंधनातून मुक्त होशील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.