अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत उत्तीर्ण व्हावे यासाठी उपदेशामृत देण्यात मोठ्यांची धन्यता असते. हे करा आणि हे करू नका असे एकामागोमाग अनेक सल्ले दिले जातात. मुलांच्या मनावर, डोक्यात शिक्षकांकडून, पालकांकडून अशा मौलिक विचारांची, उपदेशांची सरबत्ती सुरू असते.
त्यात अनेक अगम्य शब्दांची गुंफण केलेली असते. परंतु त्यातील किती शब्दांचे अर्थ आणि तुम्ही पोटतिडकीने बोलत आहात ते मुलांच्या डोक्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यांच्या डोक्यात ते कितपत शिरते? त्याचे आकलन किती झालेले असते? त्याप्रमाणे वागणे त्यांना का शक्य होत नाही? शब्दांचे अर्थच जिथे कळले नाहीत तिथे त्याच्या उपयोजनाची अपेक्षा ती काय धरणार? उपदेश वाया गेला म्हणून मग आपली उगाचच चिडचिड आणि राग.
म्हणून जे बोलत आहात अपेक्षित धरत आहात ते मुलांना समजणे पहिले महत्त्वाचे. आपण आपले अभ्यासाचे काम इमानदारीने आणि मन लावून करणे, आवश्यक. मनाची एकाग्रता नसेल तर स्वतःवरील विश्वास निर्माण होणं जड जात.
या उलट चांगली केलेली कामे नेहमी आत्मविश्वास वाढवण्यास मदतच करतात. प्रयत्नातील सातत्य, नेमकेपणा, उद्दिष्टांवर आधारित अभ्यास हा आपल्याला येते आहे, जमते आहे, माझे काही ही चुकत नाही अशा विचारांकडे घेउन जातो. अभ्यासाविषयीची तयारी झाल्याची स्वतःच्या मनाची तयारी, कबुली आत्मविश्वास संपादनास उपयुक्त ठरते.
स्वतःतील कमतरता आणि दुर्बलतेवर लक्ष देण्याऐवजी आपल्यातील बलस्थाने ओळखून त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्यातील कौशल्ये आणि क्षमता लक्षात घेऊन अभ्यास करणं हे आत्मविश्वास वाढविण्यास मदतच करत असते.
लक्षवेधी असणं अभ्यासात गरजेचे असतं. केवळ सरधोपटपणे वाचत किंवा यांत्रिकपणे लेखन करत न बसता, समजणे, लक्षात येणं, ध्यानात येणं, कळणे या प्रक्रियांना अग्रक्रम द्यायला हवा. त्यातून आपल्या मनाची खात्री झाली पाहिजे.
आळस, कंटाळा सोडून आजचा दिवस शेवटचा समजून काम केले पाहिजे तरच आत्मविश्वास वाढीला लागतो. अभ्यासात कृती करण्यास, उपयोजनास प्राधान्य द्यायला हवे. केवळ विचार करत राहून चालणार नाही. त्यातून आपल्या मनात अनेक फाटे फुटण्याची शक्यता जास्त आणि आपले मन विचलित होणार, वेळ जाणार म्हणूनच अभ्यासात आत्मविश्वास मिळवणं हा अभ्यास संपवून तुम्ही कसोटीसाठी तयार झाला आहात असे समजता येईल.
आपल्याला आता येत आहे हे कधी आणि कसे समजेल याचा प्रयत्न करणे सुद्धा आवश्यक. त्यासाठी स्वयंमूल्यमापन. थोड्या थोड्या कालांतरानंतर आपल्याला काय येते आहे याची स्वतःहून परीक्षा घेणे उपयुक्त ठरू शकते. त्यातूनच तुम्हाला स्वतःच्या बद्दल निश्चितता निर्माण होईल. सतत दोन मतात रहाणं हे धोकादायक असतं, त्यासाठी स्वतःच असं नक्की मत, विचार असणं हे तुम्हाला खात्री देते.
स्वतःच्या बाबतीतील सकारात्मकता, होकारात्मकता ही आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त असते. आपण जे काही करतो आहोत याविषयी तुम्हालाच खात्री नसेल, नक्की नसेल तर मग असा डळमळीतपणा काय कामाचा. आत्मविश्वासाच्या आधारे तुम्ही कोणतीही अशक्यप्राय गोष्ट शक्य करू शकता. तो संपादन करण्यासाठी जागरूकपणे प्रयत्न करणं मात्र गरजेचं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.