दीपावलीचा सण म्हटला की 'अभ्यंगस्नान' हे महत्त्वाचे असते. नरक चतुर्दशीच्या दिवसापासून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. प्रथम आपण अभ्यंगस्नान म्हणजे नेमके काय आणि ते कशासाठी करायचे ते पाहूया. अंगाला तेल, उटणी आणि अत्तर लावून उष्णोदकाने स्नान करणे याला ‘ अभ्यंगस्नान ‘ म्हणतात. याला ‘मांगलिकस्नान ‘ असेही म्हणतात.
दीपावलीचे दिवस हे थंडीचे असतात. या दिवसात थंडीमुळे आपल्या शरीराची त्वचा कोरडी होते. तसेच ती निस्तेज होते. शरीराला तेल-उटणी लावून मसाज केले तर त्वचा तेजस्वी होते. त्वचेचा कोरडेपणा जातो. तसेच तेलाच्या मसाजमुळे स्नायूही बळकट होतात. सुगंधी द्रव्यांमुळे मनातील नैराश्य, आळस जाऊन माणसाला उत्साह वाटू लागतो. वातावरण प्रसन्न होते. म्हणून आयुर्वेदामध्ये शरीराच्या व मनाच्या आरोग्यासाठी ‘ अभ्यंगस्नान ‘ करण्यास सांगण्यात आले आहे.
अभ्यंगस्नान करण्याची प्रथा फार प्राचीन कालापासून आहे. माणूस ऐहिक सुखोपभोगासाठी तेले व सुगंधी द्रव्ये वापरू लागल्यावर अभ्यंगस्नानाचा विधी रूढ झाला. शरीराचे स्नायू बलवान व्हावे बल, पुष्टी आणि कांती वाढावी, या उद्देशाने अभ्यंगस्नान करण्याची पद्धत सुरू झाली. शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले रहावे हा त्यामागचा उद्देश होता. पुढे अभ्यंगस्नानाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तीळ, खोबरे यांचे तेल किंवा तूप वापरतात. तसेच अभ्यंगस्नानासाठी चंदन, गुलाब, मोगरा इत्यादी फुलांपासून नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली अत्तरे वापरतात. मात्र, केमिकल वापरून तयार केलेली अत्तरे वापरू नयेत. त्यापेक्षा सुगंधी फुले स्नानासाठी वापरण्याच्या पाण्यामध्ये घालावीत.
प्राचीनकाली उटण्यामध्ये चंदन , हळद, कोष्टकोळिंजन, नागरमोथा, कचोरा, कापूरकाचरी, वाळा, बावची, अनंतमूळ, आवळा, दवणा , मारवा, पुदीना , मुलतानी माती, चणाडाळपीठ इत्यादींचा वापर केला जात असे. यातील वनस्पती तर औषधी आहेत. सध्या बाजारात विकल्या जाणाऱ्या उटण्यात या मौल्यवान गोष्टींचा वापर केला जात नाही असे म्हणावे लागेल. पूर्वी अनेक गावातून नैसर्गिक पद्धतीने सुगंधी फुलांपासून नैसर्गिक अत्तरेही तयार केली जात होती. कनोज गाव तर अत्तरांसाठी प्रसिद्ध होते. केमिकल वापरून कृत्रिम सुगंधी अत्तरे त्वचेसाठी घातक असतात ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
मंगलकार्याच्या प्रारंभी यजमान पुरुष-स्त्रीने अभ्यंगस्नान करावे असा एक विधीही आहे. विवाह समारंभाच्या अगोदर वधू-वराच्या अंगाला हळद लावून स्नान घालण्याची प्रथा आहे तो अभ्यंगस्नानाचाच एक प्रकार आहे. केवळ माणसालाच नव्हे, तर महापूजेत देवालाही अभ्यंगस्नान/ मांगलिकस्नान घालण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नानाला अठरा द्रव्यांची आवश्यकता असते असेही एका ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. अभ्यंगस्नानाची प्रथा इतर देशातही रूढ आहे. दीपावलीप्रमाणे गुढीपाडवा वगैरे सणांच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.