- डॉ. अनिल भिकाने, डॉ. प्रवीण बनकर
देशी गोवंशामध्ये स्थानिक हवामानात जुळवून घेण्याची विलक्षण शक्ती आहे. तसेच सकस दूध देण्याची क्षमता असते. निकृष्ट चारा पचविण्याची क्षमता, काही रोगाविरुद्ध प्रतिकारकता यासारखे गुणधर्म देशी गोवंशात आढळतात. या गोवंशाचे शास्त्रशुद्ध संगोपन गरजेचे आहे.
देशातील एकूण पन्नास नोंदणीकृत गोवंशापैकी महाराष्ट्रात देवणी, डांगी, गवळाऊ, खिलार, लाल कंधारी आणि कोकण कपिला हे सहा गोवंश आढळतात. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, उत्पादनक्षमता असलेल्या जातिवंत गोवंशाचे संगोपन आणि संवर्धन आवश्यक आहे. गोवंश संवर्धनात प्रामुख्याने पैदासक्षम आणि जातिवंत वळूची उपलब्धता संबंधित जातीच्या पैदासक्षेत्रात असावी. यासह पशुपालकांमध्ये शास्त्रशुद्ध पैदास व्यवस्थापनाचे ज्ञान गरजेचे असते.
देशी गोवंश संवर्धनासाठी उपाय
पैदासक्षेत्रात जातिवंत वळूची जोपासना
ज्या वळूत संबंधित देशी वंशाची बाह्यलक्षणे आणि प्रजोत्पादन गुणधर्म दिसून येतात त्यास जातिवंत वळू म्हणतात.
वळूंची निवड करताना त्याची बाह्यलक्षणे जसे रंगरूप, शारीरिक ठेवण, बांधा आणि प्रजोत्पादन गुणधर्म म्हणजे त्यापासून झालेली उत्तम वंशावळ (वासरू/कालवडी) यांचे सकल आकलन करावे.
शुद्ध वंशावळीचे जनावरे असावे.
शुद्ध वंश हा जातिवंत मादी आणि वळू यांच्या संकरातून तयार होतो.
कळपात एक उत्तम वळू अनेक माद्यांना फळविण्यासाठी पुरेसा असतो.
कृत्रिम रेतनाद्वारे एक वळू अनेक पिलांचा (वासराचा) पिता ठरू शकतो.
जातिवंत वळू हा गोवंश सुधारणेचे महत्त्वाचे अंग आहे.
पैदास प्रणालीची अंमलबजावणी
गावपातळीवर देशी गोवंशाचे वळू/गाईंना नैसर्गिक पद्धतीने फळविण्यासाठी वापरत असल्यास, एकच एक वळूस दर पिढीला न वापरता आंतरपैदास टाळावी.
निवड पैदास म्हणजेच शुद्ध देशी गोवंशाच्या गाई कृत्रिम रेतनाद्वारे फळवीत असल्यास त्यास शुद्ध जातिवंत त्याच गोवंशाचे वीर्य रेतनासाठी वापरावे.
मोठ्या प्रमाणावर असलेल्या अवर्णीत किंवा अर्धसंकरित गाईंना नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनाद्वारे फळविण्यासाठी शुद्ध देशी गोवंशाचे वळू किंवा वीर्य वापरल्यास पत सुधारणा या पैदासप्रणालीचा वापर कटाक्षाने करावा.
देशी गोवंशाचे पैदास क्षेत्र आकसत आहे. देशी गोवंशाच्या संख्यात्मक वृद्धीसाठी पैदास क्षेत्राच्या लगतच्या भागात कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक पद्धतीने प्रसार करत देशी गोवंशाचे पैदास क्षेत्राचा विस्तार करावा.
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
सिद्ध वळूच्या वीर्याचे कृत्रिम रेतन, लिंगवर्गीकृत वीर्य, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान इत्यादी सारख्या प्रगत तंत्राच्या माध्यमातून पशुपालकांना संवर्धन व वेगाने आनुवंशिक सुधारणा करणे सुलभ होईल.
प्रयोगशील पशुपालकांनी वळूच्या प्रजनन गुणधर्माचा लेखाजोखा ठेवावा.
नैसर्गिक रेतंनासाठी वळू जोपासत असल्यास त्याचे वीर्यपरीक्षण करून त्यातील जीवित शुक्राणू संख्या तपासावी.
‘ब्रीड सोसायटी‘च्या माध्यमातून गोसंवर्धन
गोवंशाच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धनासाठी पशुपालक, पैदासकार, शास्त्रज्ञ आणि प्रणालीकर्ते यांच्यात सहसमन्वय असावा.
अभ्यासू पशुपालकांनी पुढाकार घेत आपल्या भागातील देशी गोवंशाची ‘ब्रीड सोसायटी’ स्थापन करावी. अस्तित्वात असलेल्या ब्रीड सोसायट्यांना मजबूत करावे. यासाठी उत्साही आणि देशी गोवंशप्रेमी पशुपालकांचा लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे.
पशुपालकांना रोजगार, माहितीचे प्रसारण तसेच जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय किंवा बिगर शासकीय योजनांची माहिती आणि आर्थिक मदत या दृष्टीने ‘ब्रीड सोसायटी’ उपयुक्त ठरते.
पशुधनाचे कल्याण, चारा-पाण्याची व्यवस्था, आनुवंशिक सुधारणा, उत्पादन क्षमतेत वाढ, पशुपालक समाजाचा सर्वांगीण विकास या पैलूबरोबर सांस्कृतिक आणि भौगोलिक वारसा म्हणून पैदासकार संघटना महत्त्वाच्या आहेत.
ब्रीड सोसायटीच्या माध्यमातून उत्कृष्ट जनावरांची नोंदणी संशोधन आणि विक्रीसाठी महत्त्वाची ठरते.
देशी गोवंशाची सद्यःस्थिती आणि आव्हाने
पशुगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार (२०१९) गोधनाच्या बाबतीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर.
मागील पशुगणनेच्या (२०१२) तुलनेत गोवंशात ९.६३ टक्क्यांनी घट.
राज्य पातळीवर देशी गाईंच्या एकूण संख्येत ८.१७ टक्क्यांनी घट. बैलांच्या संख्येत २९.६३ टक्क्यांनी चिंताजनक घट.
पशुसंवर्धनात पैदासक्षम नर आणि माद्या यांच्या संख्येतील समतोल हा नैसर्गिक संवर्धन करण्याचा हेतू महत्त्वाचा. या पार्श्वभूमीवर देशी गोवंशाचे संवर्धन हा कळीचा मुद्दा आहे.
(डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर: ९४२०२ १४४५३)
(डॉ. प्रवीण बनकर, सहायक प्राध्यापक, पशू आनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प. संस्था, अकोला :९९६०९ ८६४२९)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.