- डॉ. भाग्यश्री झोपे
नवरात्रात शक्तिउपासना करण्याबरोबरीने जर घरातील प्रत्येक स्त्रीने स्वतःची शक्ती वाढविण्याचा निश्र्चय केला, तर संपूर्ण परिवाराचे, येणाऱ्या पिढीचे आरोग्य सुधारेल. आजच्या लेखात आपण याच विषयाच्या अनुषंगाने ही शक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांची माहिती घेणार आहोत.
स्त्री ही शक्तीचे स्वरूप असते, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य, या गोष्टी वैदिक संस्कृतीसाठी नवीन नाहीत. आयुर्वेदातही अष्टांगांपैकी एक अंग, एक विभाग स्त्रीआरोग्यासाठी समर्पित केलेला आहे. काम करण्याचे सामर्थ्य, प्रतिकारशक्ती, सहनशक्ती अशी शक्तीची वेगवेगळी रूपे असू शकतात. स्त्रीच्या बाबतीत प्रजननशक्ती, सौंदर्यशक्ती, मार्दवशक्ती या तर विशेष शक्ती होत. या सर्व शक्तींचे मूळ असते ते स्त्रीसंतुलनात म्हणजेच संप्रेरकांच्या समतोलात. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणत, विश्र्वचक्र सतत व व्यवस्थित चालू राहावे ही संकल्पना विश्र्वोत्पत्तीपासून कणाकणात रुजलेली आहे आणि यादृष्टीने स्त्रीआरोग्य हा विषय महत्त्वाचा आहे. शक्तीचा संबंध सर्वाधिक असतो तो सप्तधातूंशी, अग्नीशी. स्त्री असो वा पुरुष, दोघांमध्ये सातही धातू सशक्त असणे अभिप्रेत असतेच, मात्र स्त्रीशक्तीचा विचार करता तिच्यात रस-रक्तधातू अधिक महत्त्वाचे असतात. पाळी योग्य वयात सुरू होणे, नियमित असणे, योग्य रक्तस्राव होणे, रजोनिवृत्ती दरम्यान समस्या उत्पन्न न होणे हे सर्व मुख्यत्वे स्त्रीच्या सशक्त रसधातूवर अवलंबून असते. योग्य शरीरबांधा हा सुद्धा रसाधातूवर अवलंबून असतो, रसधातूच्या पोषणासाठी शतावरी कल्प घालून दूध घेणे सर्वोत्तम असते. शतावरी, अनंतमूळ, केशर वगैरे रसरक्तपोषक द्रव्यांपासून तयार केलेला स्त्री संतुलन कल्प तर शक्तीसाठी वरदानच होय. मोसंबी, डाळिंब, द्राक्षे, अशा रसप्रधान फळांचे ताजे रस, लाह्या भिजवलेले पाणी, आमटी, सार, कढी यासारख्या द्रवपदार्थांची योजना, सुवर्णसिद्धजल हे सुद्धा रसधातूला पोषक असते.
नितळ त्वचा, तेजस्वी कांती, डोळ्यांमधील सतेजता हे सर्व संपन्न रक्तधातूवर अवलंबून असते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर काळपट डाग, त्वचा काळवंडणे, एकाएकी खूप तीळ किंवा मस येणे हे सर्व त्रास रक्तातील अशुद्धीशी संबंघित असतात. रक्तधातूच्या संपन्नतेसाठी एक तर रक्तात जमलेली अशुद्धी दूर करणे आणि नवीन अशुद्धी आत येऊ न देणे या दोन पद्घतीने काम करावे लागते. रक्तशुद्धीसाठी केशर, हळद, कढीपत्ता, दालचिनी वगैरे स्वयंपाक घरातील पदार्थ तसेच अनंत कल्प, महामंजिष्ठादी काढा वगैरे घेण्याचा उपयोग होतो. नवीन अशुद्धी येऊ नये यासाठी सेंद्रिय अन्न घेणे, दूध व फळे किंवा यासारखे विरुद्ध अन्न न घेणे, तेलकट पदार्थ टाळणे हे सर्व आवश्यक असते. धात्री रसायन, सॅनरोझसारखी रसायने नियमित घेणे, लोहित प्लस गोळ्या घेणे हे सुद्धा रक्तधातूची शक्ती वाढण्यास मदत करणारे असते. वारंवार मूत्रसंसर्ग हा सुद्धा स्त्रीआरोग्यासाठी हानिकारक असतो. मुळापासून बरा झाला नाही तर पुन्हा पुन्हा उद्भवत राहतो. यावरही पुनर्नवाघनवटी, शक्ती धूप, संतुलन यू.सी. चूर्ण घेण्याने मूत्रवहसंस्थेला ताकद मिळून हे त्रास बरे होऊ शकतात. स्त्रीचे मन अधिक संवेदनशील असते. मानसिक ताण, असुरक्षिततेची भावना ही सुद्धा स्त्रीसंतुलनामध्ये बिघाड करू शकते. मन तसेच अग्नीवर काम करण्यासाठी योगासने महत्त्वाची असतात. सूर्यनमस्कार, फुलपाखरू, संतुलन समर्पण, मार्जारासन, अनुलोम-विलोम हे यादृष्टीने उत्तम होत. संगीताचाही या दोन तत्त्वांवर उत्तम प्रभाव होत असतो. श्री गुरुजींनी यादृष्टीने तयार केलेले स्त्रीसंतुलन हे स्वास्थ्यसंगीत ऐकण्याने अनियमित पाळीपासून ते थायरॉइडपर्यंतच्या अनेक समस्यांमध्ये सुधारणा होताना दिसते.
ज्योतिध्यान हेसुद्धा स्त्रीसंतुलनासाठी प्रभावी असते. अग्नी हा सूर्याचा प्रतिनिधी आणि सूर्य हा आरोग्याचा दाता. ज्योतिध्यानात भ्रूमध्यात ज्योत पाहण्यामुळे संपूर्ण संप्रेरकसंस्थेला उत्तेजना मिळू शकते, थायरॉइडच्या समस्येवर उत्तम परिणाम मिळू शकतात. सकाळ - संध्याकाळ श्री गुरुजींच्या आवाजातील अग्निपार्थना ऐकत बरोबरीने ज्योतिध्यान करण्याने (सोमध्यान) अजूनच फायदा होताना दिसतो. शक्ती आणि शुक्रधातू यांचाही घनिष्ठ संबंध असतो. पुन्हापुन्हा गर्भपात होणे, अंगावरून पांढरे जाणे, प्रमाणापेक्षा अधिक श्रम होणे, या सर्वांमुळे स्त्रीमध्ये शुक्रक्षय होऊ शकतो. तेव्हा या गोष्टी अंगावर न काढणे, फेमिसॅन तेल, शक्ती धूप यांचा नियमित वापर करणे, गरजेनुसार उत्तरबस्ती करून घेणे हे सुद्धा आवश्यक होय. रसायन म्हणजे शुक्रधातू, ओजस वाढविणारा विशिष्ट औषधयोग. म्हणूनच रसायनसेवनाने शक्ती मिळू शकते, वर्ण उजळू शकतो. रोग बरा होऊ शकतो, आयुष्य वाढू शकते; स्मृती, बुद्धी, प्रज्ञासंपन्नता मिळू शकते. एवढेच नाही तर ‘सौभाग्यवर्धन’, ‘अलक्ष्मीनाश’, ‘वाचासिद्धी’ या गोष्टीही मिळू शकतात असे आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे. आयुर्वेदातही शक्तिवर्धक रसायने तयार करताना त्यावर ‘श्रीसूक्त’ या अथर्ववेदातील लक्ष्मीदेवीच्या सूक्त-मंत्राचा संस्कार करायला सांगितला आहे. ‘श्रीसूक्तेन नरः कल्ये ससुवर्णं दिने दिने।... सुश्रुत चिकित्सास्थान.....’ नवरात्रात शक्तिउपासना करण्याबरोबरीने जर घरातील प्रत्येक स्त्रीने स्वतःची शक्ती वाढविण्याचा निश्र्चय केला तर संपूर्ण परिवाराचे, येणाऱ्या पिढीचे आ रोग्य सुधारेल हे नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.