दसरा हा सण कृषीसंस्कृती एक महत्त्वाचा लोकोत्सव आहे. पुर्वीच्या काळी ग्रामीण भागात पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो.
आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.
आज आपण या लेखात भारतातील विविध भागात विजयादशमी कशा पद्धती साजरी होते याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहेत. कारण कोस बदला की प्रथा परंपरा सगळया बदलतात.आपल्या विविधतेने नटलेला भारतात एक सण वेगवेगळ्या पद्धतीने कसा साजरा होतो, त्या सणाचे वेगवेगळ्या भागात काय धार्मिक महत्त्व आहे या सगळयांची सविस्तर माहिती पाहू या..
कोल्हापूर
महाराष्ट राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण असतो. तेथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतात.
आंध्रप्रदेश
आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याच बरोबर दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला 'थेपोत्सवम' असे म्हटले जाते. तसेच, मंदिरात आयुध पूजाही होते.
दक्षिण भारत
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसांत दर तीन दिवशी देवीच्या एक-एक रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन दिवस सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. या दिवशी लोक एकमेकांना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.
पंजाब
पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. या दिवशी लोक एकमेकांना मिठाई देऊन हा सण आनंदाने साजरा करतात.
म्हैसूर
चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे.
छत्तीसगड
छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.
गुजरात
सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.
● उत्तर भारत
उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालू असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.