गौतम बुद्धांची शिक्षणप्रणाली

विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवायला आपण शिक्षकांना प्रेरणा देतो की वर्गात विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा आणि चर्चेतून ज्ञानाकडे जा. हाच बुद्धांचा शैक्षणिक विचार आहे.
Buddha
Buddhaesakal
Updated on

अमेरिकेतील टेक्सास शहरामध्ये सोळा वर्षांच्या मुलाने पिस्तुलाने शाळेमध्ये अंदाधुंद फायरिंग केली, ज्यामध्ये दुसरी ते पाचवीच्या १९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अशा बातम्या वाचल्यानंतर मनात पहिलं येतं, की आपण विद्यार्थ्यांना कुठे घेऊन चाललो आहोत. मुलं जे समाजात पाहतात, जे त्यांना दिसतं त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत असतं. सगळीकडे हिंसा, हाणामारी याचंच जर वातावरण असेल तर मुलं तशीच बनणार आहेत. म्हणून जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मी एका न्यूज चॅनलवर म्हटलं होतं, की ‘आता शाळेत मुलांना बुद्ध शिकवावा लागेल. कारण जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे.’

होय, जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. कारण जगाचा इतिहास बघितला तर लक्षात येतं, की गेल्या पाच-हजार वर्षांत इतकी युद्धं झाली आहेत; सरासरी काढली तर महिन्याला एक युद्ध इतकी निघेल. ही युद्धं कुठेतरी थांबली पाहिजेत; आणि त्यासाठी आपल्याला मुलांवर, विद्यार्थ्यांवर काम करावं लागेल. असं काम करणं शाळेच्या माध्यमातूनच शक्य आहे. शाळेच्या माध्यमातून मुलांना शांतीचा संदेश द्यावा लागेल. असा संदेश ज्यांनी कृती-उक्तीतून लोकांना दिला, असे बरेच महापुरुष आपल्याकडे होऊन गेले; पण खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा संदेश दिला तो भगवान गौतम बुद्ध यांनी!

Buddha
पालकांनो, जमिनीवर आहात ना?

शालेय पातळीवर त्यांच्या विचारांचा समावेश आपण करतोच. मूल्यसंस्कार म्हणून आपण ते विचार सोपेपणाने मुलांपर्यंत पोचवत असतो. बालवयातच हे संस्कार त्यांच्यावर व्हावेत याची आपण खबरदारी घेतोच आहोत. बुद्धाचे विचार त्यांना सांगणं क्रमप्राप्त आणि महत्त्वाचं आहे; कारण एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांकडे क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन स्किल, एकत्र काम करण्याचं कौशल्य, आनंदी राहण्याची वृत्ती या गोष्टी असायलाच हव्यात. यातली एकही बाब सोपी नाही. हे गुण अंगी बाळगावे लागतात. सगळे गुण माणसाच्या आत असतात; ते शोधावे लागतात. आनंदी राहण्यासाठी आपली विचारसरणी तशी हवी. तशी विवेकी विचारसरणी गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतून, तिच्या पालनातूनच आपल्याला मिळवता येते. विवेकाचा अर्थ समजणं ही तर फार मोठी गोष्ट आहे. अर्थात, ती अशक्य नाही. अगदी लहानपणापासून मुलांना त्या मार्गावरून नेण्याची गरज आहे. त्या बुद्धांच्या विवेकी विचारांसोबत ध्यान शिकवावे लागेल.

विद्यार्थ्यांना मेडिटेशनची अत्यंत आवश्यकता आहे. ध्यानधारणा म्हणजे काय ते आपणच त्यांच्यापर्यंत न्यायला हवं. ध्यानधारणेतून आपण आपल्यापर्यंत पोचत असतो. आपण आपल्याला ओळखू लागतो. शालेय पातळीवर खासकरून इयत्ता पाचवीच्या पुढे जर मुलांना ध्यानधारणा शिकवली, तर नक्की उपयोग होतो. धर्मनिरपेक्ष पद्धतीने गौतम बुद्धांनी जे विपश्‍यना तंत्र विकसित केलं-आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यानधारणा करायची-हे तंत्र मुलांना शिकवणं गरजेचं आहे.

विपश्‍यना म्हणजे दिवसदिवस फक्त मौन पाळणं नव्हे. शब्दाशब्दाचे सोयीस्कर असे एकेरी उडते अर्थ लावून आपण आपल्यासाठी बरेच भ्रम निर्माण करत असतो. त्याने आपण उगीचच गोंधळ तेवढा वाढवत असतो. तसं न करता आपण इथे विपश्‍यनेचा अर्थ लक्षात घ्यायला हवा, समजून घ्यायला हवा. शब्दांचे अर्थ, त्याचे पुढचे-मागचे संदर्भ लक्षात घेऊन आपल्या आत रुजवायला लागतात.

ही गौतम बुद्धनिर्मित एक योगसाधना आहे. विपश्‍यना म्हणजे विशिष्ट पद्धतीने निरखणं, अंतर्मुख होणं, स्वतःच्या आत डोकावणं. त्यातून अवतीभवतीचंही यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यायला स्वच्छ आणि शांत मनाने तयार होणं आणि मग प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अर्थपूर्ण जीवनासाठी उपयोग करणं अशी ती सारी प्रक्रिया आहे.

विपश्‍यना ही जीवनातल्या सत्यांपासून पळून जायला शिकवत नाही, तर जीवनातल्या सत्याला वास्तव रूपात स्वीकारायला शिकवते. भूतकाळातल्या चिंता आणि भविष्यकाळातल्या विवंचना यांत अडकण्याऐवजी बुद्ध आपल्या शिष्यांना वर्तमानाकडे डोळसपणे पाहायला शिकवतात. जे जसं आहे ते तसंच स्वीकारायला शिकवतात. त्यातूनच तटस्थता साधत जाते. तटस्थता म्हणजे हार मानणं नव्हे तर एक प्रकारची अलिप्तता अंगी बाणवणं.

या प्रक्रियेतून एक प्रकारची अद्‌भुत, अंतर्गत, अनामिक अशी शांती लाभून मन कमालीचं निर्विकारी, संयत आणि तरंगविरहित असं शांत होतं. बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हल्ली कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या मनःशांतीसाठी विपश्‍यनेचा आधार घेतला जातो. अगदी कॉर्पोरेट लेव्हलची ऑफिसेससुद्धा याला अपवाद नाहीत.

पण आपण मोठ्यांना ध्यानधारणा शिकवण्याच्या प्रक्रियेत लहान विद्यार्थी विसरून जातो आणि मग टेक्सास शहरातील शाळेमध्ये अंदाधुंद पिस्तुलाची फायरिंग होते.

Buddha
ढिंग टांग : आमची अयोध्या..! (डायरी एका मावळ्याची)

बुद्धांच्या आचार-विचारांमागे अलौकिक सामर्थ्य, कुशाग्र बुद्धिमत्ता, असामान्य प्रतिभा यांबरोबरच स्वानुभवाचं अधिष्ठान आहे. सिद्धार्थापासून गौतम बुद्ध म्हणून उदयाला येऊन सामर्थ्य सिद्घ करेपर्यंतच्या काळावधीतली त्यांची जडणघडण लक्षणीय आहे. मुळात सिद्धार्थ जात्याच दयाळू आणि प्रेमळ. त्याला शिकार करणं, लढाई करणं या गोष्टी आवडायच्या नाहीत. एखाद्या जातीचं धार्मिक कर्तव्यच लढाई करणं आहे ही गोष्ट त्याला पटत नसे.

सगळे विवाद फक्त आपसात चर्चा करून सोडवले पाहिजेत, कुणीही कोणत्याही मुद्द्यावर लढू नये असं त्याचं ठाम मत होतं. ‘स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या’ असं सिद्धार्थ सगळ्यांना सांगत असे. म्हणजे आता जो ‘जिओ और जिने दो’ हा नारा आधुनिक शैक्षणिक धोरणाचा पाया ठरतो आहे; त्याचा पाया बुद्धांनी घातला आहे आणि ही काही कुठेही दोन हात करता येत नाहीत म्हणून शोधून काढलेली पळवाट नव्हती. खरंतर सिद्धार्थ धनुर्विद्येत आणि नेमबाजीत निष्णात होता. ‘अहिंसा हा मानवाचा परमधर्म आहे, हिंसा करणं पाप आहे’ असं त्याचं प्रामाणिक मत होतं. म्हणून तो शस्त्र उचलण्याच्या विरोधात होता.

हा सिद्धार्थ म्हणजे राजा शुद्धोधन आणि राणी मायदेवीचा पुत्र; त्याच्या मावशीने म्हणजे दुसऱ्या आईने, गौतमीने त्याला सांभाळलं म्हणून त्याचा उल्लेख गौतम असा केला जातो. क्षत्रिय कुळात इ.स.पू. ५६३ मध्ये लुम्बिनी इथे बुद्धाचा जन्म झाला. समृद्धीत वाढत असलेला हा संवेदनशील आणि अलौकिक प्रतिभेचा राजपुत्र संकट आणि दुःख यांपासून खूप दूर होता.

पण अखेर त्याला दिसलेल्या तीन दुःखद घटनांनी त्याच्या मनोवृत्तीत जे परिवर्तन झालं, त्याला जी अंतर्मुखता लाभली, ती सिद्धार्थला ‘बौद्ध धर्माचे प्रणेते गौतम बुद्ध’ या स्थानापर्यंत घेऊन गेली.

त्याचा यशोधरेशी विवाह झाला. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. मात्र सिद्धार्थ वैवाहिक जीवनात रमेना. तो वृत्तीने अधिकाधिक विरक्त होत चालला. साऱ्या वैभवाचा, वैवाहिक जीवनाचा, पत्नी आणि पुत्राचा त्याग करून त्याने गृहत्याग केला. संन्यासदीक्षा ग्रहण केली. अत्यंत कठीण तपश्चर्या केली. अखेर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. अस्थिरता संपून ज्ञानाचा उदय झाला. त्यांना चार सत्ये गवसली,

-जगातल्या सर्व दुःखाचं मूळ आसक्ती आहे.

-तिचा त्याग केल्याशिवाय मनाला सुख लाभणार नाही.

-अशा प्रकारे दुःख निर्माण होण्याचं मूळ कारण आणि त्यातून मुक्त होण्याचा अष्टांगिक मार्गही गवसला. हे दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या सिद्धार्थला लोक ‘गौतम बुद्ध’ म्हणून संबोधू लागले.

ज्या वृक्षाखाली त्यांना बोध म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली त्या वृक्षाला पुढे ‘बोधिवृक्ष’ म्हणून संबोधण्यात येऊ लागलं. ज्ञानप्राप्तीचा आणि सुखप्राप्तीचा मध्यम मार्ग त्यांना गवसला होता. कोणतंही अतिरेकी असं त्यागाचं टोक न गाठता ज्याला वाटत असेल त्याने सुखासाठी ‘जीवनाचं योग्य ज्ञान’, सत्कृत्य करण्याचा निश्चय, मृदू भाषा, चांगली कृत्यं, उपजीविकेचं प्रामाणिक साधन, यथार्थ प्रयत्न, उच्च विचार आणि मनाची न ढळणारी शांतता या गोष्टींचा सतत अभ्यास केला पाहिजे, असं बुद्ध सांगतात.‘प्राणिमात्रांवर दया करा, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका, सर्वांशी समानतेने वागा, खोटं बोलू नका. दारू पिऊ नका, परोपकार करा, लोभ धरू नका, सत्याने वागा, आपलं आचरण शुद्ध आणि पवित्र ठेवा’ हा भगवान बुद्धांचा सरळ साधा उपदेश आहे. सामान्यजनांना तो कळावा म्हणून संस्कृत भाषेत तो न करता ते पाली भाषेत करत असत.

बुद्धांच्या एकूण सर्व उपदेशांत मला स्वतःला अतिशय गरजेचा आणि कमालीचा उपयुक्त वाटतो तो शांतीचा उपदेश. अनेक कंगोरे असणारी ही मनःशांती आपण समजून घेतली आणि ती प्राप्त होण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न केले तर, जगताना तिचा अवलंब केला तर, आपलं मनुष्यजीवन सार्थकी लागलं असं आपण म्हणू शकू. ही बुद्धप्रणीत शांतता समजून घेण्यासाठी आधी बुद्धाची बुद्धिवादी नैतिकता समजून घ्यायला हवी.

‘बुद्धाने काय सांगितलं होतं’ ते पुनःपुन्हा आठवण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आज मानवजात सामूहिक अशांततेकडे वाटचाल करू लागली आहे. या संकटातून मार्ग काढायचा झाल्यास बुद्धाच्या शांततेचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजायला हवा. त्यांनी सर्वांना बुद्धिवादी नैतिकता सांगितली. त्यांनी धर्माच्या व्याख्या केल्या नाहीत, तर नीतीवर आधारलेला समाजच कसा शांत आणि सुखी असतो हे दाखवून दिलं. कधीही स्वतःला धर्मप्रवर्तक म्हटलं नाही. ‘मी जे सांगितलं तो अंतिम शब्द होय’ असा आग्रह त्यांनी कधीही धरलेला नाही. त्यांनी सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर टिकून राहणाऱ्या होत्या.

मागील दहा हजार वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा, जगातल्या सर्वोच्च १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली. त्या यादीत विद्यापीठाने बुद्धांना अग्रक्रम दिला होता.

आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात, ‘‘बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने वा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.’’

गौतम बुद्धांची तत्त्वं खऱ्या अर्थाने आणि सखोल समजून घ्यायला हवीत; केवळ शाब्दिक उदोउदो काही कामाचा नाही. प्रबुद्ध व्यक्तींनी भरलेलं प्रबुद्ध समाजजीवन हे बुद्धांचं स्वप्न होतं. ते नुसते अशा स्वप्नांचे द्रष्टे नव्हते तर अशा समाजाचे निर्माते होते हे लक्षात घ्यायला हवं.

आणि अशा समाजाची त्यांनी सांगितलेल्याच दिशेने प्रगती साधायला हवी. हे आपल्या हातात नक्कीच आहे.

Buddha
पंख सकारात्मकतेचे : प्रचंड गुंतागुंतीच्या प्रसंगातून सहज सुटका

पुतळ्यापलीकडे जात तत्त्वांपर्यंत पोचणं हे आपलं कर्तव्य आहे; आणि त्या कर्तव्यपूर्तीची सुरवात प्रारंभी म्हटल्याप्रमाणे पुढच्या पिढीवर लक्ष केंद्रित करून करायची आहे. मुळात आपण तर या गोष्टी अंगीकारायच्याच आहेत; पण शांतता आणि विपश्‍यना यांचे अर्थ कृतिशील रीतीने विद्यार्थ्यांच्या मनात घट्टपणे रुजवायचे आहेत. असं घडलं तरच बुद्धप्रणालीचा गाभा असलेला ‘विवेक’ आपल्याला नीटपणे कळला असं म्हणता येईल.

ज्या शिक्षणातील ज्ञानरचनावादावर आपण चर्चा करतो ती पद्धत गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना शिकवण्यामध्ये वापरत होते. त्यांचे त्यांच्या शिष्यांसोबतचे भावनिक संबंध, तसेच प्रवचन सांगण्याची पद्धत जर पाहिली तर शिष्यांसोबत चर्चा करणे आणि प्रश्न निर्माण करणे आणि याचे उत्तर शिष्याकडूनच काढून घेणे ही त्यांची सचोटी होती. चर्चेतून ज्ञानाकडे जाणं हे गौतम बुद्धांनी त्यांच्या सर्व शिष्यांसोबत केलं. त्यामुळेच बुद्ध विचार जगात सर्वत्र पसरला. हीच समजावून शिकवण्याची पद्धत आता शैक्षणिक धोरणात ज्ञानरचनावाद म्हणून शिक्षकांना आपण सांगत असतो. विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवायला आपण शिक्षकांना प्रेरणा देतो की वर्गात विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा आणि चर्चेतून ज्ञानाकडे जा. हाच बुद्धांचा शैक्षणिक विचार आहे.

(लेखक शिक्षण अभ्यासक व इस्पॅलिअर एक्सपेरिमेंट व हेजिटेज स्कूलचे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.