खूप वर्षांपूर्वी एका ४२ वर्षे वयाच्या यशस्वी उद्योजकाचे वडील त्याला भेटायला घेऊन आले होते. तुम्ही बरोबर का आलात म्हणून विचारल्यावर म्हणाले, ‘‘लहान आहे तो. सगळं व्यवस्थित नाही सांगता आलं तर? म्हणून मीच त्याला डॉक्टरकडं घेऊन आलो.’’ पालक म्हणून अशा प्रकारे कधीही न संपणारी जबाबदारी राहतेच. मूल मोठे होते, पण पालकत्व कायम जिवंत राहतेच.
हे आपल्या मनुष्याचे सुख आहे आणि दुःख सुद्धा. हा जबाबदारीचा प्रवास सुखाचा व्हावा. जे चढ-उतार सृष्टी क्रमाने कोणालाच चुकत नाहीत, ते सहन करण्याची आणि टिकून राहण्याची ताकद या नात्यात राहावी म्हणून हा वर्षभराचा लेखनप्रपंच ‘सकाळ’च्या सहकार्याने पार पडला. प्रत्येक आठवड्याला एक अशा प्रकारे मुलाच्या जन्मापासून ते मूल ‘मोठे’ होईपर्यंतचे टप्पे आपण अभ्यासले. कोठे खड्डा असू शकतो आणि सारे कुटुंब मुलाला सांभाळून कसे पार होऊ शकते, हे तर आपण बघितलेच आणि प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाच्या आणि आनंदाच्या गोष्टी कशा जपायच्या हे सुद्धा बघितले.
महत्त्वाच्या गोष्टींची उजळणी
पालक आणि कुटुंब ही आयुष्यातली पहिली आणि सर्वांत महत्त्वाची नाती आहेत. पुढच्या आयुष्यात घडणाऱ्या बहुतेक सर्व नात्यांवर आणि निर्णयावर त्यांचा अमीट ठसा राहतो.
मेंदूला आणि मनाला वयानुसार योग्य प्रकारे शिस्त लावणे हे आधुनिक पालकांचे आद्य कर्तव्य बनले आहे, कारण समाजाने या महत्त्वाच्या सामूहिक जबाबदारीतून पूर्णपणे अंग काढून घेतले आहे.
मेंदूला योग्य खुराक आणि मनाला योग्य प्रेम या दोन्हींची गरज असते. ते कमी पडून चालत नाहीत, पण अतिरेक सुद्धा टाळावा लागतो.
शाब्दिक आणि भावनिक संवाद साधणे, प्रत्यक्ष अनुभवातून हा संवाद शिकवणे, संवाद धोक्यात येण्याची वेळ येता तो नेटाने जपणे हे शिकण्याची कुटुंब ही एक हक्काची आणि सर्वोत्तम शाळा आहे.
भविष्याची सतत काळजी टाळून, चालू असलेल्या वयाच्या गरजेवर लक्ष देऊन वयानुरूप गरजा पुरवणे आणि तशीच जबाबदारी देणे.
वयात येणाऱ्या मुलांना पुरेशी मोकळीक देणे, पण मोकाट सुटणार नाहीत यावर थोड्या अंतरावरून नीट लक्ष ठेवणे.
मुलांचे विचार नीट समजावून घेणे आणि गरज पडेल तेथेच स्वतःचे मत देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
मुलांचे प्रेम मिळवण्यासाठी आसुसले होऊन स्वतःबद्दलचा पालक म्हणून आदर कमी न होऊ देणे.
खूप जास्त सूचना देऊ नका, असे तुम्हाला सांगून मी स्वतः तीच चूक करू नये म्हणून आता आवरते घेतो. वर्षभर प्रेमाने वाचन केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि आनंदी पालक म्हणून तुमच्या आयुष्यभराच्या वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा.
शुभं भवतु (समाप्त)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.