गुराखी बांधव खास गायी-गुरांसाठीच दिवाळी साजरी करतात.
गुराख्यांच्या दिवाळीला धनत्रयोदशीपासून खरी सुरुवात होते. गुराखी बांधव खास गायी-गुरांसाठीच दिवाळी साजरी करतात. गुरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुराखी खास गायी-गुरांना ओवाळतात. गुराढोरांना ओवाळण्यासाठी लव्हाळीच्या गवतांची दिवटी तयार केली जाते. धनत्रयोदशीपासून गुराख्यांकडे लव्हाळीची दिवटी बनवायला सुरुवात होते.
लव्हाळी म्हणजे चांगलं उंच वाढणारं गवत असतं. त्या गवताच्या हिरव्या काडयांपासून रेखीव अशी दिवटी विणली जाते. ही एक प्रकारची गवती दीपमाळच असते. पहिल्या दिवशी एक याप्रमाणे पाच दिवस दिवे विणले जातात. रोज वरच्या दिवटीने गुरांना ओवाळायचं, अशी प्रथाच आहे. दिवटीत दिवा ठेवण्याचा त्रिकोणी गवती भाग खोल असतो. अन त्यात मातीची पणती ठेवली जाते. पणतीत शेणाच्या गोवरीचा तुकडा गोडया तेलाने भिजवून ठेवतात. पेटवल्यावर दिवटी उजळते. हे दिवटया बनवणारे गुराखी मोहदळ गवतापासून गुराढोरांसाठी आखीव-रेखीव दागिने बनवतात.
गवताच्या सहा फूट उंचीच्या काडया ठेचून त्या लवचिक करतात. या लवचिक काडयांवर सुतळी किंवा आंबाडीचे सोल कलात्मक पद्धतीने गुंफून कलात्मक पट्टे बनवले जातात. या गवतापासून गुरांचे पाय आणि शिंगांसाठी गोल तोडेही केले जातात. या अलंकारांना पिवळाधम्मक रंग आणि चकाकी येण्यासाठी ते दिवसभर गोमूत्रात भिजवून ठेवले जातात. हा रंग कित्येक महिने तसाच राहतो. दिवाळीच्या 20 दिवस आधीपासून हे पट्टे बनवायला घेतले जातात. गुराख्यांची गायी-गुरांची पूजा करण्याची पद्धत निराळी आहे. धनत्रयोदशीपासून गाईच्या माथ्यावर दही लावून तर म्हशींच्या पुढच्या पायांवर दह्यांचा चंद्र आणि मागच्या पायावर सूर्य काढून पूजा करण्यात येते.
या दिवसात लहानलहान मुली आपल्या आजीला सोबत घेऊन पाच दिवस गोठयावर गाईच्या शेणाच्या छोटे छोटे पुतळे बनवून त्यांची पूजा केली जाते. पहिल्या तीन दिवशी गवळणी असतात. त्या घरकाम करतांना दाखवतात. तर चौथ्या दिवशी दुधाचे हंडे घेऊन जाणा-या गवळणी दाखवतात आणि पाचव्या दिवशी 5 पांडव केले जातात.
त्यांची रोज पूजा करून दही-भात आणि गुळ-खोबरं याचा उपहार दाखवला जातो. तर पाडव्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पाचव्या दिवशी केलेले शेणाचे पांडव दिवाळीच्या अमावास्येला शेतात जाळले जातात. त्यावर दूध ऊतू जाईपर्यंत ते तापवलं जातं. त्यामुळे शेतं चांगली पिकतात, असा समज आहे. या दिवसापासून पुढच्या हंगामातील शेतीला सुरुवात होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.