परमभक्त हनुमान

रामायणात हनुमंतांचे स्थान अटळ आहे, त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. ते आदर्श भक्त आहेत. श्रीरामांचे जीवनकार्य अवतार घेऊन रावणाला मारणे एवढेच मर्यादित नव्हते.
Hanuman Jayanti
Hanuman Jayantisakal
Updated on

भक्ती कशी करावी, तर हनुमानांसारखी. हनुमानांचा अंतरात्मा श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी इतका व्यापलेला होता, की त्यांच्या हृदयात दुसऱ्या कशाला स्थानच नव्हते. आजच्या (ता. २३) हनुमान जयंतीनिमित्ताने...

रामायणात हनुमंतांचे स्थान अटळ आहे, त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. ते आदर्श भक्त आहेत. श्रीरामांचे जीवनकार्य अवतार घेऊन रावणाला मारणे एवढेच मर्यादित नव्हते. आपल्यात राम असतो तसा आपल्यात रावणही असतो. आपल्यात असलेल्या दुर्वृत्ती, वाईट सवयी हाच तो रावण. या सगळ्यांतून तावून सुलाखून आपण ध्येयाप्रत म्हणजे परमतत्त्वाकडे गेल्यास उत्तम; अन्यथा सीता-रामाचा वियोग ठरलेला असतो. असे लक्षात घेऊन रामायणाचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे ‘श्रीरामविश्र्वपंचायना’मध्ये याचे संदर्भ आहेत. लंकादहनाच्या अंगाने आज आपण श्रीहनुमंतांना समजून घेऊ.

मारिचाने सुवर्णमृगाचे रूप घेतले, त्याच्या बाह्यस्वरूपावर सीता आकर्षित झाली. सीतेने रामाला, तसेच लक्ष्मणरूपी मनालाही मारिचामागे पाठवले. मारिच आपले काम करून मरून गेला; पण सीतेचे रावणाने (अहंकाराने) हरण केले. सीतेला शोधायला मारुतीरायांना पाठवले. हनुमंत प्राणांचे स्वरूप होत. हनुमंत ही बुद्धीची-शक्तीची देवता. त्यांनी विचार केला की रावणाचे पारिपत्य करण्यासाठी युद्धाआधीच रावणाची शक्ती कमी केली पाहिजे. म्हणून हनुमानांनी लंका जाळली व रावणाची अर्धी ताकद कमी केली.

गीतरामायणात म्हटले आहे, या शिखराहून त्या गेहावर कंदुकसा तो उडे कपिवर... आपल्यातील अहंकाररूपी रावण नेहमीच शिखरावर असतो, त्यामुळे आपल्याला राग येतो. या शिखराहून त्या गेहावर म्हणजे आपल्याला रागावर, अहंकारावर काम करायचे असल्यास डोके खाली टेकवणे आवश्‍यक असते. पूजा-अर्चा, भक्ती, योग, प्राणायाम केला; पण अहंकार बाळगला तर उपयोग नाही. मग राम-सीतेचे म्हणजे जाणीव-शरीराचे मिलन कसे होणार? आपल्यातील राम एकीकडे, तर शरीर दुसरीकडे असल्याने हातून चुकीच्या गोष्टी घडत राहतात.

राम, लक्ष्मण, सुग्रीव वगैरे उंच टेकडीवर उभे राहून निरीक्षण करीत होते. गच्चीमध्ये रावण दिसला. सुग्रीवाने झेप घेतली व हल्ला केला. सुग्रीव जखमी होऊन परत आला. श्रीरामांनी त्याची कानउघाडणी केली, सुग्रीवा, हे साहस असले, भूपतीस तुज मुळी न शोभले. ज्याला नीट जगायचे आहे, शरीराचा-मनाचा-संसाराचा ज्याला नीट आनंद घ्यायचा आहे त्याने अविचाराने काहीही करू नये. आतल्या रामाला विचारावे, ‘‘रामा, यावर आपले काय म्हणणे आहे?’’ म्हणजेच अंतर्मनाशी थोडी सल्लामसलत केल्यास काम यशस्वी होते. अहंकारावर भिस्त ठेवल्यास तो आपल्यालाच संपवेल.

‘मी रोज दर्शनाला जातो,’ असा अहंकार आपण बाळगतो, तेव्हा आपल्यातील भक्त दर्शनाला जात नसतो, दर्शनाला जातो अहंकार. मंदिरात आपण मंदिरात प्रेमाने जातो का, यावर लक्ष ठेवणे आवश्‍यक. थोडी जाणीव उत्पन्न झाल्यावर आपल्याला भगवंत दिसू शकतील. तुकाराम महाराजांना मंदिरात जायची बंदी करण्यात आली, तेव्हा प्रत्यक्ष देव बाहेर आले ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. हा भक्तिमहिमा.

जळे धडधडा ओळ घरांची,

राख कोसळे प्रासादांची

आपले शरीर हे अहंकाराचा प्रासाद आहे. त्याला नष्ट करायचा प्राणाने चंग बांधला पाहिजे. सीता-रामाचे मिलन, शिव-शक्तीचे मिलन हा निसर्गाचा नियम. त्यासाठी आपण मदत केली नाही, तर नाना तऱ्हेचे आजार होतात. श्रीराम जाणीव आहेत, सीता शरीर आहे, लक्ष्मण मन आहे तर हनुमान प्राण आहेत. प्राणायामाचा, हनुमंतांच्या उपासनेचा मोठा फायदा आहे. गुडघा दुखत असल्यास तेथे प्राण न्यावा हे समजत असले, तरी प्राण तेथे जात नाही. त्याला मुद्दाम तेथे न्यावे लागते. आपली जाणीव म्हणजे राम. जाणीव जेथे जाईल तेथे हनुमंत म्हणजे प्राण आपसूक पोचतात. हनुमंत प्रसन्न झाल्यावर आपणच थेंबे थेंबे गोळा केलेला अहंकार गळून पडतो. तसे होणे हे महत्त्वाचे.

रावणाची पत्नी मंदोदरी त्याच्या बाजूला नव्हती. सीताहरण तिला मान्य नव्हते, मुळात रावण सीतास्वयंवराला गेला हे तिला मान्य नव्हते. रावणबंधू बिभीषण रामाला मिळाला होता. कुंभकर्णाने रावणाला विचारले, ‘परस्त्रीवर वाईट नजर ठेवणे चूकच, शेवटी तू मरणार हे नक्की.’’ पण भावाचे म्हणणे रावणाने ऐकले नाही. याचा अर्थ अहंकार नेहमी एकटा पडतो. आम जनतेबरोबर तुम्ही असलात तर तुमची रामाची बाजू; एकटे असलात तर तुमच्यातील अहंकार वर आला आहे, असे समजावे. त्याला खाली आणणे महत्त्वाचे.

कुणी जळाले निजल्या ठायी,

जळत पळत कुणी मार्गी येई

अहंकार झोपेमध्येही माणसाला त्रास देतो. आपण रुईची पाने-फुले हनुमंतांला चढवतो. छातीतील कफविकारांवर शांती तेल लावून रुईच्या पानांनी शेकण्याचा फायदा होतो, बोटे वाताने वेडी-वाकडी झाली असता शांती तेल लावून रुईच्या पानांनी शेकले तर सरळ होतात. रुईच्या पानांचा शेक हा वातविकारावरचा उत्तम इलाज आहे.

कुणी भीतीने अवाक होई,

ओळखी नुरल्या प्रलयात

आपण पाहतो की मुलगा वडिलांना वडील म्हणायला तयार नसतो. नवरा बायकोला बायको म्हणायला तयार नसतो. हे होते अहंकारामुळे. ज्याला कोणाची किंमत उरलेली नसते त्याचा अहंकार पराकोटीला चालला आहे, असे म्हणावे. अल्झायमर्ससारख्या रोगात माणसे स्वतःचे नावही विसरतात. मेंदूला अहंकाराचे वजन सहन न झाल्याने असे होते. मी-मी असे करण्याने जी उष्णता तयार होते व या उष्णतेमुळे मेंदूतील जल नासून जाते, विस्मृती सुरू येते.

माय लेकरा टाकून धावे,

लोक विसरले नाती-नावे, उभे तेवढे पडे आडवे

सध्या स्त्रीभ्रूणहत्येची समस्या तयार झालेली आहे. अहंकारापायी नाते तोडले की नवजात बालके कचऱ्याच्या पेटीत टाकली जातात. कुठली आई आपल्या मुलाला असे टाकू शकेल? पण एकदा तिच्यावर अहंकाराने ताबा मिळविला की ती असे करू शकते. आईने मुलाला सोडणे ही राक्षसी प्रवृत्ती.

उभे तेवढे पडे आडवे,

अचानक आला कल्पांत

संपूर्ण विश्र्व नष्ट होऊन सगळीकडे पाणी होणे म्हणजे कल्पांत असे आपण समजतो. आज आपण भीतीपायी रोज मरत आहोत. समाजात चाललेले राक्षसी चाळे बंद व्हायला हवेतच, एक एक करून मी माझ्यातल्या राक्षसी वृत्ती कमी करेन, असा प्रत्येकाने निश्र्चय केला तर खूप मोठे काम होईल.

खड्गे ढाली पार वितळल्या,

वीरवृत्ती तर सदेह जळल्या

आपल्यावर कोणी हात टाकणार नाही, असे व्यक्तिमत्व हवे. यासाठी शरीरातील अग्नी (हॉर्मोनल सिस्टीम) नीट राहणे आवश्‍यक असते. आज ६०-७० टक्के लोकांमध्ये हॉर्मोनल असंतुलन दिसते. शरीरातील अग्नी बेताल झालेला आहे, तो सगळी जाळपोळ करत आहे. हनुमंताला शरण यायला हवे. प्राणायाम करून राक्षसी वृत्तींवर ताबा मिळवायला हवा. एक एक करून वाईट सवयी सोडायला हव्या. असे झाले तर ‘लंकादहन’ होईल. शांती मिळेल, राम-सीतेचे मिलन होईल.

भक्ती कशी करावी, तर हनुमानांसारखी. हनुमानांचा अंतरात्मा श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी इतका व्यापलेला होता, की त्यांच्या हृदयात दुसऱ्या कशाला स्थानच नव्हते. अशा अवस्थेला पोचलेल्या भक्तावर रामकृपा होणारच. आपणही या परमभक्ताची उपासना केल्यास त्यांच्या आशीर्वादामुळे मोहमायारूपी सागराला उल्लंघून आपल्यावर परमात्म्याने सोपविलेले कार्य पूर्ण करण्यास समर्थ होऊ.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.