पूजाविधी, धार्मिक कार्यक्रमांत देव-देवतांना हळद-कुंकू वाहिले जाते. कोणत्याही मंगलप्रसंगी कुंकू लावले जाते. कुंकू लावणे हे सौभाग्याचे लेणे, स्त्रियांच्या सोळा शृंगारांपैकी ते एक समजले जाते. कुंकू लावण्याची प्रथा आहे. कुंकू सौंदर्य खुलविते तसे मनाची एकाग्रता वाढविण्याचे कार्य करते.
पूजाविधी, सौभाग्यचिन्ह, सौंदर्यप्रसाधन आदींतील आवश्यक लेणं म्हणजे कुंकू. सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा वापर करतात. कुंकू कपाळावर लावतात, तसेच भांगामध्येही भरतात. कुंकुमम् या संस्कृत शब्दावरून मराठीत कुंकू हा शब्द आला. मूळ शब्दाचा अर्थ ‘केशर’ असा आहे. गृहिणी सीमा कुलकर्णी म्हणाल्या, कुंकू लावण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली हे सांगता येणार नाही, मात्र कोणत्याही मंगलप्रसंगी कुंकू लावून औक्षण केले जाते. विवाहित स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात, भांगामध्ये कुंकू भरतात. कुंकू लावल्याने महिलांच्या सौंदर्यात भर पडते अर्थातच सौंदर्य खुलून दिसते. स्त्रियांच्या सोळा शृंगारांपैकी एक शृंगार कुंकू समजला जातो. कुंकू लावणे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
दडलंय विज्ञानही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून निवृत्त झालेल्या व सध्या परदेशात वास्तव्याला असलेल्या रश्मी भारस्वाडकर म्हणाल्या, कुंकू लावण्याची प्रथा असली तरी त्यामागे विज्ञान दडलेले आहे. कुंकामध्ये पारा असतो. त्यामुळे कपाळावर कुंकू लावल्याने ताण दूर होतो. डोके शांत राहते. दोन्ही भुवयांच्यामध्ये आज्ञाचक्र असते. या आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. कपाळावर बोटाने कुंकू लावताना हलकासा दबाव पडतो तेव्हा त्वचेला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे स्नायू सक्रिय होतात. यामुळे चेहरा तेजस्वी होतो. हळद, नागरमोथ्यापासून कुंकू तयार केले जात असल्याने त्याचेही गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
कुंकवाची अशीही महती
धार्मिक विधी, मंगलकार्यांत हळदीकुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याशिवाय घरोघरी नित्य पूजाविधी आणि घरी आलेल्या महिलांच्या स्वागतासाठीही हळद-कुंकू वापरले जातेच. त्यामुळे हळदकुंकवाची महती मोठी आहे. ती घरोघरी बिंबलेली आहे. मंदिरांत दर्शनासाठी गेल्यावरही टीळा लावण्याची पद्धत आहे. एवढेच नव्हे तर कुंकू हा शब्द आणि त्याच्या आशयाशी निगडित अनेक मराठी चित्रपटही गाजलेले आहेत! (Woman and Tradition News)
मेण आणि कुंकवाचे नाते….
पूर्वी महिला आधी कपाळावर मेण लावून त्यावर कुंकू लावत. याविषयी रामकुंवरबाई घुकसे म्हणाल्या, मेणावर लावलेले कुंकू चोवीस तास नव्हे तर दोन तीन दिवस कपाळावर ठसठसीतपणे दिसायचे. कारण ते मेणावर पक्के बसलेले असायचे. जर कुंकू भेसळीचे असेल, आणि मेणावर लावले असेल तर ते त्वचेसाठी बाधक नसायचे. मधमाश्यांच्या पोवळ्यात ज्या ठिकाणी मध असतो, तेवढाच भाग मध काढून झाल्यानंतर मेण तयार करण्यासाठी वापरला जातो. मध काढून घेतल्यावर राहणारा चोथा बारीक करून तो तेलात कढवतात. पातळ कपड्यात कढवलेले मेण टाकून वाटीतील पाण्यात पिळून मेण वाटीतील पाण्यात टाकावे लागते. थंड पाण्यावर लोण्यासारखा मेणाचा थर जमा होतो.
शुद्ध आणि बनावट कुंकू
पंढरपूर येथील अण्णा ऐतवाडकर यांनी सांगितले, विठ्ठल मंदिराजवळ कुंकवाची होलसेल विक्री करण्याचा आमचा पिढीजात व्यवसाय होता, तो वडिलानंतर बंद केला आहे. हळकुंड, पारा, नागरमोथा यांपासून कुंकू तयार केले जाते. चांगले कुंकू लाल असते, मात्र खूप लालभडक किंवा काळपट लाल नसते. बोटांच्या चिमटीत धरून पाहिल्यानंतर बोटाला बारीक रव्यासारखे लागले तर ते शुद्ध कुंकू असते आणि पिठासारखे मऊ लागणारे हे भेसळीचे कुंकू असते. म्हणून जाणकार दोन बोटाच्या चिमटीत घेऊन कुंकू पाहतात. पाण्यात कुंकू ओले केल्यानंतर बोटाने लावतो. नंतर बोट धुतल्यानंतर ते निघून जाते ते शुद्ध कुंकू असते. जर बोटाचे निघत नसेल तर ते भेसळीचे असते, असे समजावे.
हळदीकुंकूसाठी महत्त्वाचे सण
चैत्रगौरी
वटपौर्णिमा
श्रावण: नागपंचमी मंगळागौरी, सत्यनारायण
भाद्रपदः हरितालिका, गौरी पूजन
नवरात्रोत्सव
कोजागरी पौर्णिमा
दिवाळी लक्ष्मीपूजन
मार्गशीर्ष गुरुवार व्रत
मकरसंक्रांत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.