Lakshmi Puja 2021 : लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण गुरुवारी ४ नोव्हेंबर रोजी आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी(Lakshmi) नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने खर्च होणाऱ्या संपत्तीला ' लक्ष्मी ' असे म्हणतात. भ्रष्टाचार, अनीतीने मिळविलेले पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे !
Lakshmi Puja Muhurat 2021: आज प्रदोषकाळी लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. प्रथम ' प्रदोषकाळ ' म्हणजे काय ते पाहूया. रात्रीमानाचे पंधरा भाग केले तर एका भागाला ' मुहूर्त ' म्हणतात. (Lakshmi Pujan Muhurat 2021) सूर्य मावळल्यापासून पुढे तीन मुहूर्त ' प्रदोषकाल ' मानला जातो. यावर्षी आज गुरुवारी सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत प्रदोषकाल आहे. आज या वेळेत लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे.(Lakshmi Ganesh Pujan Muhurat 2021) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. नवीन वस्त्रालंकार घालून आनंदोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करावयाची असते. (Diwali Maha Lakshmi Puja Shubh Muhurat) व्यापारी लोक आपल्या हिशेबांच्या वह्यांवर ' श्री ' अक्षर लिहून वहीचे पूजन करतात.
पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रीयता , श्रम असतील तेथेच लक्ष्मी आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मी हा शब्द ' लक्ष्म ' म्हणजे चिन्ह यावरून बनलेला आहे. मात्र कोणत्या चिन्हावरून लक्ष्मीचा बोध होतो हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. लक्ष्मीचाच पर्यायी शब्द म्हणजे ' श्री ' होय. आणि श्री हे अक्षर स्वस्तिकापासून तयार झालेले आहे. श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आहेत. श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्रीसूक्तात कमळ, हत्ती, सुवर्ण आणि बिल्वफळ या गोष्टी लक्ष्मीशी निगडीत असल्याचे म्हटले आहे." लक्ष्मी हत्तीच्या आवाजाने जागी होते. बिल्व तिचा वृक्ष आहे. ती सुवर्णाची आहे. ती आल्हाददायक आहे. ती स्वत: तृप्त असून तृप्ती देणारी आहे. तिचा वर्ण कमलासारखा असून ती कमलावरच बसलेली आहे. "
श्रीसूक्तात लक्ष्मीची प्रार्थना करताना तिचे काव्यात्मक सुंदर वर्णन केलेले आहे. "कमलात वास्तव्य करणाऱ्या , कमल हाती धरणाऱ्या , अतिधवल वस्त्र , शुभ्र चंदन आणि शुभ्र पुष्पे यांनी शोभणाऱ्या , विष्णूची प्रियवल्लभा असणाऱ्या , सुंदर आणि त्रैलोक्याची समृद्धी करणाऱ्या हे भगवती लक्ष्मी , तू मजवर प्रसन्न हो. ".
आपण नारळाचा ' श्रीफळ ' म्हणून उल्लेख करतो ते चुकीचे आहे. बिल्व वृक्षाचे फळ म्हणजे 'श्रीफळ ' होय. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची आठ रूपे असल्याचे म्हटले आहे. (१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी (८) राज्यलक्ष्मी ही आठ रूपे पूजनीय ठरली आहेत. बल आणि उन्माद हे लक्ष्मीचे दोन पुत्र आहेत. परंतु हे पुत्र भावात्मिक असावेत. कारण ज्याच्या घरी लक्ष्मी येते तो बलवान होतो आणि पुष्कळदा उन्मत्तही होतो असा अनुभव येतो. आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे लक्ष्मीचे चार पुत्र असल्याचे श्रीसूक्तात म्हटले आहे.
Kuber Pujan: महाभारतात कुबेराचा उल्लेख पुलस्त्याचा पुत्र असा केलेला आहे. मात्र अथर्ववेदात कुबेराचा वैश्रवण असा उल्लेख आहे. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य; पुलस्त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असल्याचे म्हटले आहे. म्हणून कुबेराला वैश्रवण असे नाव मिळाले. कुबेराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केले व त्याच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. नंतर कुबेराने विश्वकर्म्याने बांधलेल्या सुवर्णतटमंडित लंकेवर अधिकार मिळवला आणि तेथेच तो राज्य करू लागला. कुबेराकडे पुष्पक विमान असल्याचाही उल्लेख आढळतो. पुढे रावणाने कुबेराचे सर्व हिरावून घेतले. नंतर कुबेर हिमालयातील अलका नगरीत जाऊन राहिला. लक्ष्मी-कुबेर पूजनाच्यावेळी लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून त्याची पूजा व प्रार्थना करतात.
अलक्ष्मी निस्सारण (Alakshmi Story)
अलक्ष्मी(Goddess Alakshmi) ही अशुभाची दुर्भाग्याची देवता मानली जाते. हिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळे वस्त्र नेसवून तिची पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असावे आणि अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये यासाठी आज तिचेही पूजन करून तिला गावाबाहेर नेऊन विसर्जित केली जाते. समुद्र मंथनातून कालकूट नंतर परंतु लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी बाहेर आली. म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण समजले जाते. तिचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते. हिच्या शरीरावर म्हातारपणीच्या खुणा होत्या. समुद्रमंथनातून बाहेर आल्यावर अलक्ष्मीने देवांना विचारले " मी कुठे राहू ?" त्यावर देव म्हणाले, " जिथे केस, कचरा, कलह, अनीती भ्रष्टाचार , असत्य भाषण ,सज्जनांची निंदा ,परद्रव्यहरण, आळस, व्यभिचार असेल तेथे तू रहा. "
अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू आहे. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक झाडूची पूजा करतात. लक्ष्मी-अलक्ष्मीसंबंधी एक कथा आहे.
एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघीही एका ऋषींकडे गेल्या. त्या दोघींनी ऋषींना विचारले," मुनीवर्य , आमच्या दोघींपैकी सुंदर कोण दिसतेय् ? आणि पहाणाऱ्याला आनंद वाटतोय् ? "ऋषीना या दोघींपैकी कुणालाच नाराज करावयाचे नव्हते. ते म्हणाले " तुम्ही दोघीही समोरच्या झाडाला हात लावून इथे या. मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो." दोघीही पळत पळत झाडाला हात लावून परत ऋषींकडे आल्या. ऋषी म्हणाले,"अलक्ष्मी तू इथून जात असताना सुंदर दिसत होतीस. लक्ष्मी तू इथे येत होतीस त्यावेळी सुंदर दिसत होतीस." दोघींचे समाधान झाले. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जाते त्यावेळी आपणास आनंद होते. लक्ष्मी म्हणजे संपत्ती घरात येते त्यावेळी आपणास आनंद वाटतो. सर्वांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जावो आणि घरात लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य राहो यासाठी सर्वाना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.