Maha Shivaratri 2023 : महाशिवरात्रीचा महोत्सव

आज आहे महाशिवरात्रीचा पावन उत्सव. यातील ‘शिव’ हा शब्द स्वच्छतेचा, पवित्रतेचा निदर्शक आहे. अस्वच्छतेचा नाश झाला, की जे उरते ती स्वच्छता, शुद्धता.
Maha Shivaratri 2023 lord shankar Samudra Manthana
Maha Shivaratri 2023 lord shankar Samudra Manthanasakal
Updated on

‘शव’ हे जडाचे निदर्शक आणि ‘इ’ हा शक्तीचा निदर्शक ध्वनी. या दोन्हींचे मिलन झाल्यावर तयार होतो अवतारस्वरूप शिव-शंकर-महादेव, म्हणजे तेव्हा जीवन सुरू होते. ‘ऱ्हीं’, ‘क्लीं’ अशा मंत्रामध्ये टाकलेला ‘इ’ हे शक्तीचे रूप असते. शक्तीची अनेक रूपे असतात. शिव-शक्तीचे मिलन ही महाशिवरात्र!

- श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

आज आहे महाशिवरात्रीचा पावन उत्सव. यातील ‘शिव’ हा शब्द स्वच्छतेचा, पवित्रतेचा निदर्शक आहे. अस्वच्छतेचा नाश झाला, की जे उरते ती स्वच्छता, शुद्धता. भौतिक अशुद्धता सहजपणे काढून टाकता येते. पण मनाची व आत्म्याची अपवित्रता (प्रोग्रॅमध्ये असलेला व्हायरस) काढून टाकणे अवघड असते.

महादेवांच्या उपासनेमध्ये मनातील, आत्म्यातील अशुद्धी दूर करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच देवदानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा अमृताच्या आधी निघालेले हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केले आणि आपल्या कंठात साठवले ही कथा सर्वज्ञात आहे.

जीवनाचा संघर्ष हे सुद्धा एक समुद्रमंथन होय. सूर्यनाडी, चंद्रनाडी किंवा इडा-पिंगला यांच्यातून होणाऱ्या संदेशाचे व चेतनेचे चलनवलन झाल्यामुळे मेरुदंडरूपी मेरुपर्वत घुसळला जाऊन शरीरातील संपूर्ण रससागर ढवळला जातो.

त्यातून जशा सिद्धी प्राप्त होतात, तसे काही अंशी धोकेही निर्माण होतात. पण या धोक्यांपासून संरक्षण करण्याची क्षमता शिवोपासनेमध्ये असते. ‘शव’ हे जडाचे निदर्शक आणि ‘इ’ हा शक्तीचा निदर्शक ध्वनी. या दोन्हींचे मिलन झाल्यावर तयार होतो अवतारस्वरूप शिव-शंकर-महादेव म्हणजे तेव्हा जीवन सुरू होते. ‘ऱ्हीं’, ‘क्लीं’ अशा मंत्रामध्ये टाकलेला ‘इ’ हे शक्तीचे रूप असते. शक्तीची अनेक रूपे असतात. शिव-शक्तीचे मिलन ही महाशिवरात्र.

जो मानवाच्या, निसर्गाच्या भल्यासाठी काम करतो व जो प्रत्येकाला जीवन जगण्याचे स्फुरण देतो, जो अनेक प्रकारे देणारा असतो, त्याला आपण देव म्हणतो. हा देव कशातही असू शकतो. तो विशिष्ट आकारात किंवा विशिष्ट गुणांचा असेल, असे नसते. मासा, कासव, नरसिंह, पूर्ण पुरुषोत्तम अशा सगळ्यांतून तोच प्रकट झालेला आहे.

सध्या आपण संगणकाच्या युगात राहत असल्यामुळे आपल्याला असा विचार करणे सोपे होऊ शकेल, की कोणीतरी एक प्रोग्रॅम लिहिलेला असतो, तो प्रोग्रॅम आपल्याला समजू शकत नाही. परंतु त्याची स्पंदने सॅटेलाईटमार्फत टॉवरपर्यंत येतात व नंतर ही स्पंदने घरात असलेल्या संगणकापर्यंत, मोबाईलपर्यंत प्रकट होतात. ही योजना लक्षात घेतली तर देवतांची कल्पना लक्षात येईल.

स्वयंभू देवता सदाशिव ही निर्गुण, निराकार, न समजणारी देवता आहे. याच्या एक पायरी खाली आले तर तेथे शिव-शंकर-महादेव असतात. याच्याही खाली आले तर आपल्या शरीरात हीच संकल्पना असते. आपल्याला टॉवरपर्यंतची कल्पना समजू शकते, त्याच्या पलीकडे असलेल्या तरंगांची कल्पना आपल्याला येत नाही; तसे शिव-शंकर-महादेव याच्यापलीकडे असलेले आपल्याला समजू शकत नाही.

शिवाचा अवतार असलेला भैरोबा, भैरव, काळभैरव वगैरे देवता पृथ्वीवर प्रकट होऊन कार्य करून गेलेल्या आढळतात. पण रुद्र-सदाशिव या देवता स्वयंभू आहेत. या स्वयंभू देवतांच्या कथाही उपलब्ध आहेत, पण त्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसून त्या आपल्याला देवतांचे अस्तित्व समजवण्यासाठी उदाहरणादाखल सांगितलेल्या आहेत हे समजून घ्यायचे असते.

अन्यथा कथांचे विपरीत अर्थ लावल्याने आपल्या विचारांची व उपासनेची भटकंती होऊ शकते. तसे पाहता प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र असते आणि या प्रत्येक दिवशी मनुष्याला त्या संकल्पनेत विलीन व्हायची संधी असते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी उपलब्ध असलेली संपूर्ण विश्र्वाच्या रेडिएशनमधून निघालेली शक्ती या संकल्पनेपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी पडत नाही. आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रयत्न केला तर साधक महाशिवांपर्यंत पोहोचण्याची शक्यता उत्पन्न होते.

स्पंदने दोन प्रकारची

शरीराची सर्व प्रकारची चलनवलन शक्ती म्हणजे स्पंदने दोन प्रकारची असतात. या दोन स्पंदनांमुळे शरीर जिवंत असते. कुठल्याही कर्मासाठी इंद्रियांना हलविण्याचा विचार मेरुदंडाच्या वरच्या टोकावर असलेल्या पॉन्स या ग्रंथीत संतुलित होतो. या ग्रंथीच्या आत काहीही हलनचलन होत नसते,फक्त तेथे येणाऱ्या सर्व शक्तींचे व येणाऱ्या संवेदनांचे नियोजन केले जाते व त्या शक्ती वा संवेदना हव्या त्या ठिकाणी पोचविल्या जातात.

या स्थानाला ‘लिंग’ असे नाव दिलेले आहे. लिंग म्हणजे बाण, एक छोटीशी गोळी. या लिंगाच्या आत काही हालचाल नसते परंतु त्याचा सगळ्यावर अंकुश असतो. सध्या या लिंगाचा संबंध अनेकांनी मनुष्य लिंगाशी जोडलेला दिसतो, परंतु शिव व मनुष्यजननेंद्रिय यांचा काहीही संबंध नाही. शिवाचा आकार किंवा स्वरूप हे लिंगस्वरूप आहे असे म्हणताना मनुष्याच्या लिंगाचा काहीही संबंध नाही. परंतु अनेकांनी या कुठून तरी आलेल्या विचाराचा, अविचाराने प्रचार करून शिवाचे पावित्र्य घालवले आहे.

आपल्याला लक्षात घ्यायला हवे की शिवग्रंथी शरीरात आहे व या ग्रंथीला प्रसन्न करण्यासाठी, तिला उपयोगात आणून शिवस्वरूप होण्यासाठी उपासना करता येते. यासाठी वेगवेगळे मंत्र आहेत. यातील सोप्यात सोपा मंत्र ‘ॐ नमः शिवाय’. या मंत्राच्या ध्वनींनी उपासना करता येते किंवा विशिष्ट हालचालींच्या योगे, मुद्रांच्या योगे शिवग्रंथीच्या ठिकाणी स्पंदने देता येतात. अशी स्पंदने दिल्यावर ग्रंथी उत्तेजित होऊन प्रतिक्रिया मिळतात. या दृष्टीने शिव हा नटेश्र्वर आहे. भुवया, चेहऱ्याच्या स्नायूंच्या, हातापायाच्या विशिष्ट हालचाली साधण्यासाठी नृत्याची कल्पना केलेली आहे. यामुळेही शिवग्रंथीला प्रसन्न करून शिवाची उपासना केली जाते.

अंधारातून प्रकाशाकडे...

शक्तीचे वरच्या पातळीवर असणाऱ्या महाशिवाशी मिलन तेव्हाच होऊ शकते जेव्हा खालच्या पातळीवर मेरुदंडाच्या वरच्या टोकावर (मेरुशिखरावर) असणाऱ्या कैलासावर असणारे सदाशिव स्थिर असतील. या सदाशिवांचे शरीरात असलेल्या नाड्यांवर नियंत्रण आले तर वरून येणाऱ्या वैश्र्विक शक्तीचे व सदाशिवाचे मिलन होऊ शकते.

मेंदूजलात सर्व संवेदना असतात आणि त्या पॉन्स या ग्रंथीच्या आधिपत्याखाली मेरुदंडात उतरतात. शिंवलिंगावर दुधाच्या अभिषेकाचा संबंध हा मेंदूतील मेंदूजल व मेरुदंडाच्या वरच्या भागात असलेल्या चौथ्या नंबरच्या खाचेशी (फोर्थ व्हेंट्रिकल) लावता येतो. जननेंद्रियाशी त्याचा संबंध कसा लावणार? मेंदू म्हणजे शरीराचा वरचा तिसरा स्वर्गासारखा भाग. त्यातील गंगाजल मेरुदंडाद्वारा पॉन्स या ग्रंथीमागून शिवजटेतून बाहेर पडून पृथ्वीवर येते तेव्हा शरीरातील सर्व पेशी व इंद्रिये कार्यरत होतात.

हीच ती भगिरथाची कथा. हीच प्रक्रिया श्रीशंकरांच्या जटेतील गंगा या रुपकाच्या स्वरूपात समजावलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उगाच नशापाणी करणे, रात्रभर वेडावाकडा धिंगाणा करणे अपेक्षित नाही. सूर्यास्तानंतर अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याची क्रिया करण्यासाठी महाशिवरात्र हा उत्सव किंवा व्रत सांगितलेले आहे. आजपर्यंत या व्रताद्वारा अनेकांनी लाभ मिळविलेला आहे.

या व्रतातून त्यांना झालेल्या दिव्य अनुभवांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. सांगितलेल्या रूपकांचा, सांगितलेल्या उपमांचा विपर्यास केला व नुसते एका ठिकाणी दिवा लावून, फुले वाहून आपल्याला हवे तसे वागत राहण्याने चित्त शांत होत नाही किंवा मेरुशिखरावर शक्तीचे स्तंभन होणार नाही. यौनाशी किंवा स्त्री-पुरुषसंबंधाशी शिवाचा संबंध जोडून उगाच उच्छृंखल क्रिया करण्याने काहीही साध्य होणार नाही.

आपल्या भौतिक पातळीवर शिव-पार्वती म्हणजे शिव-शक्ती या देवस्वरूप व्यक्तिरेखा त्यांच्या उपासना, पूजन, ध्यान यांच्याद्वारा संतुलन साधणे, समाधी साधणे ही महाशिवरात्रीची साधना होय. शिव-शक्तीची संकल्पना नीट समजून घेतली तर होणाऱ्या आनंदातून वेगळी अनुभूती येऊ शकते.

त्यातून एक लक्षात येते की शिव कैलासावर समाधीत मग्न असतात म्हणजे त्यांची वृत्ती स्थिर असते, ते कशानेही विचलित होत नाहीत, अगदी कामदेवाच्या बाणवर्षावानेही. सगळ्याचा त्याग करून, आपल्याकडे असलेले सर्वांना वाटून टाकण्यात आनंद मानता आला तर ही पातळी साधणे शक्य आहे. देण्यातील आनंदाचा संबंध या देवतेशी जोडलेला आहे. मनुष्यमात्राची सेवा करणे, दान देणे, अन्नदान करणे यातून मिळणारे समाधान आपल्याला या ठिकाणी स्थिर करून शिव-शक्तीचा अनुभव देऊन परमात्म्यापर्यंत पोहोचवून एक वेगळी अनभूती देऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()