शुद्धी ही उपासनेची पहिली पायरी समजायला हरकत नाही. पंचकर्म आदींद्वारा भौतिक शरीराची शुद्धी करता येते. भटकणाऱ्या मनाला शांत करण्याचे इलाज महत्त्वाचे. यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवोपासनेला सुरुवात करावी, अशी कल्पना आहे, ज्यामुळे शिवशक्तीचा उपयोग करून घेता येईल.
आज आहे महाशिवरात्रीचा पावन उत्सव. यातील ‘शिव’ हा शब्द स्वच्छतेचा, पवित्रतेचा निदर्शक आहे. शिव म्हणजे शुद्धता, शिव म्हणजे संपूर्ण मांगल्य आणि शिव म्हणजे पूर्ण कल्याण. ‘शव’ हे जडाचे निदर्शक आणि ‘इ’ हा शक्तीचा निदर्शक ध्वनी. ‘ऱ्हीं’, ‘क्लीं’ अशा मंत्रामध्ये असलेला ‘इ’ हे शक्तीचे रूप असते. या दोन्हींचे मिलन होते तेव्हा तयार होतो अवतारस्वरूप शिव-शंकर-महादेव म्हणजे तेव्हा जीवन सुरू होते.
शक्तीची अनेक रूपे असतात. शिव-शक्तीचे मिलन ही महाशिवरात्र. शक्तीच्या तीन पातळ्या असतात. शंकर ही संहाराची देवता आग असे मानले जाते, पण शिव ही नाशक शक्ती नसून ती मदतीचा हात देऊन मनुष्याला पुढच्या पातळीवर नेते.
भौतिक पातळीवर शरीराचे क्षरण होत असते. आतील जिवाला उत्क्रांतीकडे घेऊन जाण्यासाठी, शरीर सुटल्यावर त्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणारी शिव ही देवता. त्यामुळे शिव स्मशानात आधार देण्यासाठी वेशीवर (बॉर्डरवर) उभे असतात, जेथे भौतिकाची पहिली पायरी सुटते व दुसरी पायरी सुरू होते. येथे शिव जिवाला हात देऊन पुढे नेतात.
अस्वच्छतेचा नाश झाला की जे उरते ती स्वच्छता, शुद्धता. भौतिक अशुद्धता सहजपणे काढून टाकता येते. पण मनाची व आत्म्याची अपवित्रता (प्रोग्रॅमध्ये असलेला व्हायरस) काढून टाकणे अवघड असते.
शंकरांनी सगळ्यात जहाल विष पचवले, त्या विषाचा परिणाम होऊ दिला नाही, त्यातील चांगला भाग तेवढा घेतला. यामुळे शंकरांना ‘नीलकंठ’ नाव पडले हे आपल्याला माहीत आहे. महादेवांच्या उपासनेमध्ये मनातील, आत्म्यातील अशुद्धी दूर करण्याचे सामर्थ्य आहे.
देव व दानव यांनी अमृतप्राप्तीच्या इच्छेने समुद्रमंथन केले असता सर्वप्रथम हलाहल विष बाहेर आले. या विषाने सर्व सृष्टीचा नाश होण्याची वेळ आली. काय करावे, असा प्रश्र्न सर्वांसमोर उभा राहिला. श्री शंकरांनी सृष्टीच्या हितासाठी विषाचा स्वतः स्वीकार केला, विष पचवले.
ज्या विषामुळे सर्व सृष्टीचा नाश होऊ शकला असता असे समुद्रमंथनातून निघालेले हलाहल भगवान श्री शंकरांनी प्राशन केले व सृष्टीला संहारापासून वाचवले. नंतर समुद्रमंथनातून मिळालेली सर्वच्या सर्व मानवकल्याणाची चौदा रत्ने इतरांना वाटली.
जीवनाचा संघर्ष हे सुद्धा एक समुद्रमंथन होय. सूर्यनाडी, चंद्रनाडी किंवा इडा-पिंगला यांच्यातून होणाऱ्या संदेशाचे व चेतनेचे चलनवलन झाल्यामुळे मेरूदंडरूपी मेरूपर्वत घुसळला जाऊन शरीरातील संपूर्ण रससागर ढवळला जातो. त्यातून जशा सिद्धी प्राप्त होतात तसे काही अंशी धोकेही निर्माण होतात. पण या धोक्यांपासून संरक्षण करण्याची क्षमता शिवोपासनेमध्ये असते.
गव्हाचा एक दाणा पेरल्यानंतर त्यातून तयार होतात अनेक गहू. ‘पेरावेसे वाटणे’ या क्रियेमुळे गहू तयार होत असले तरी त्या दाण्यामध्ये (बीजामध्ये) असलेल्या गुणप्रवृत्तीमुळे, सध्याच्या भाषेत बोलायचे झाले तर त्यात असलेल्या प्रोग्रॅममुळे अनेक गहू तयार होतात, विस्तार होतो.
तसे या परमात्मा परमपुरुष बीजाचा विस्तार झाला व विश्व तयार झाले. गव्हाचे पीठ झाले व नंतर पिठाच्या पोळ्या, पराठा, पुऱ्या, फुलका झाला तरी या सर्व गोष्टी गव्हापासून झाल्या असे म्हणता येते. या सर्व गोष्टींचा माय-बाप असतो एक गव्हाचा दाणा.
ही कल्पना लक्षात घेऊन भारतीयांनी प्रत्यक्ष अभ्यासातून व अनुभवातून असे शोधून काढले की, मूळ परमात्मा (बीज) एक आहे व या बीजापासून सर्व विश्र्वाची उत्पत्ती झालेली आहे. या विश्र्वाच्या उत्पत्तीतून वेगवेगळ्या गोष्टी तयार झाल्या.
माणूसही यातूनच तयार झाला. जसे गव्हाच्या पिठात तेल, तूप, पाणी वगैरे मिसळून वेगवेगळ्या पाककृती बनवता येतात, तसे पंचमहाभूतांच्या माध्यमातून सृष्टीत वेगवेगळी अस्तित्वं तयार होतात. या सर्व योजनेचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे आनंदप्राप्ती.
शुद्धी ही या उपासनेची पहिली पायरी समजायला हरकत नाही. पंचकर्म आदींद्वारा भौतिक शरीराची शुद्धी करता येते. भटकणाऱ्या मनाला शांत करण्याचे इलाज महत्त्वाचे. यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवोपासनेला सुरुवात करावी अशी कल्पना आहे, ज्यामुळे या शिवशक्तीचा उपयोग करून घेता येईल.
भगवान श्री शंकरांच्या गळ्याभोवती सर्प असतोच पण त्यांच्या सर्व शरीरावर सर्प फिरत असतात. सर्प हा शरीराने थंड असतो, त्याच्यात सर्व उष्णता व त्यात असलेले विष सापाच्या एक पिशवीत एकवटलेले असते. विषामुळे उष्णता वाढते आणि वाढलेली उष्णता सर्वच इंद्रियावयवांना घातक असते.
महाशिवरात्रीच्या दिवशी शरीर व मन शांत ठेवण्याचा संकल्प करून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहे. यातून थंडाई पिण्याची पद्धत रूढ झाली असावी. अर्धा कप दूध घेतल्यास शरीरातील पित्ताचे शमन होऊन शरीर शांत होऊ लागते यासाठीच श्री शंकरांना दुधाचा अभिषेक प्रिय असावा.
शंकर ही कलेची देवता असून त्यांच्या हातात असलेल्या डमरूमुळे त्यांचा ताल व नादाशी असलेला संबंध समजून येतो. संगीताद्वारे शरीराचे तापमान, मनाची चंचलता, राग व उच्छृंखलपणा कमी करता येऊ शकतो, त्या दृष्टीने आरोग्य देणारे संगीत - स्वास्थ्यसंगीत - जीवनसंगीत हे आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरते.
महाशिवरात्र जवळ आली की आठवण होते थंडाई, भांग यांची. भगवान श्री शंकरांची समाधी व भांगेसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे येणाऱ्या तंद्रा या दोन गोष्टी अगदीच वेगळ्या असतात. भांग ही एक प्रकारची वनस्पती आहे. भांगेचा एक मोठा दोष म्हणजे ती स्मृतीचा एक लूप म्हणजे चक्र तयार करते त्यामुळे भांग घेतल्यावर मनुष्य त्याच त्याच ठिकाणी विचार करत राहतो.
भांग घेतलेला मनुष्य बसला तर बसून राहतो, हसायला लागला तर हसतच राहतो. भांगेच्या या गुणामुळे अनेकांचा असा समज असतो की, भांग घेऊन ध्यानाला बसले तर ध्यान चांगले लागते, पण अशा वेळी साक्षीभाव हरपलेला असल्याने अशा ध्यानाचा काही उपयोग नसतो.
भांगेत असलेल्या स्तंभन या गुणाचा उपयोग करून घेण्यासाठी आयुर्वेदाने तिची शुद्धी करण्याचे मार्गदर्शन केलेले आहे. याप्रमाणे शुद्ध केलेली भांग ही मनाची चंचलता दूर करण्यासाठी किंवा स्तंभनासाठी उपयोग करून घेता येतो.
आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने शरीर, मन शांत ठेवून शरीरातील विषद्रव्ये व मनातील विषारी विचार दूर करून नैतिकता पाळून सत्याच्या मार्गावर चालले तर ‘सत्यं शिवं सुन्दरम्’चा अनुभव नक्कीच घेता येईल.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.