Lord Ganesha : गणेशाच्या हातातील आयुधांचा अर्थ

गणपती विघ्नहर्ता असल्यामुळे सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये दहा प्रकारची आयुधे
Meaning of weapons in lord Ganesha hands culture india
Meaning of weapons in lord Ganesha hands culture indiaSakal
Updated on

- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

गणपती विघ्नहर्ता असल्यामुळे सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये दहा प्रकारची आयुधे आहेत, असे सांगितले आहे. वज्र, शक्ती, दंड, खड्ग, पाश, अंकुश, गदा, त्रिशूल, पद्म आणि चक्र ही ती दहा आयुधे आहेत. यामध्ये विशेषतः पाश आणि अंकुश या दोन आयुधांचा उल्लेख प्रामुख्याने अनेक गणपतीच्या ध्यानांमध्ये सापडतो. ‘पाश’ शस्त्राबद्दल विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये सांगितले आहे. ‘पाशस्सप्तफणस्सर्पपुरुष: पुच्छसंयुत:।’ अर्थात सात फण्यांनी युक्त असा सर्पाकार आणि शेपटीने युक्त असा तो पाश असतो, असे सांगितले आहे.

गणपतीच्या हातातील प्रत्येक आयुध प्रतिकात्मक आहे. गणपतीने हातात धरलेला ‘पाश’ हा संसार बंधनाचे प्रतीक आहे. परशुचा उल्लेख गणपतीच्या काही ध्यानांमध्ये आहे. भगवान परशुरामांना ‘परशुराम’ हे नाव आणि ‘परशु’ हे शस्त्र भगवान गणेशांनी वरदान म्हणून दिल्याचा उल्लेख गणेश पुराणात खालीलप्रमाणे आलेला आहे. ‘परशुं मे गृहाण त्वं सर्वशत्रुनिबर्हणम्। नाम ते परशुरामेति त्रैलोक्ये ख्यातिमेष्यति॥’ परशु म्हणजे तर्कशास्त्र व तर्क विद्येचे द्योतक आहे, असे संत ज्ञानेश्वर सांगतात.

गणेशाच्या हातातील दुसरे प्रमुख आयुध म्हणजे ‘अंकुश’ होय. ‘नीतिभेदु अंकुशु।’ असे वर्णन माऊलींनी करून अंकुश या आयुधास न्यायशास्त्राची उपमा दिलेली आहे. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांत भेद हा दुसऱ्या हातातील अंकुश होय. गणपतीच्या हातातील मोदकास, ब्रह्मानंद देणारा वेदांताचा महारस असे माऊलींनी संबोधले आहे.

गणेशाच्या हातातील खड्ग आयुध श्याम वर्णाचे असल्याचा उल्लेख विष्णुधर्मोत्तर पुराणात असून अज्ञानरूपी अंध:काराचा नाश करणारे असे हे खड्ग आयुध होय. त्रिशूल आयुध सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या पलीकडे असलेले गणेश तत्त्व सुचवते. तीन गुणांच्या पलीकडे साधक गेल्याशिवाय गणेशतत्त्वाचा खरा साक्षात्कार होणे शक्य नसते. त्याचे द्योतक हे त्रिशूल होय. शक्ती हे आयुध मूलाधार चक्रात सुप्त असलेल्या कुंडलिनी शक्तीचे द्योतक आहे. अशा प्रकारे गणपतीच्या हातातील प्रत्येक आयुध हे विशिष्ट गोष्टींचे द्योतक सांगितलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.