गो संवर्धनातून जमीन सुपीकतेचा ध्यास

वाजगाव (ता. देवळा, जि. नाशिक) येथील बाळासाहेब देवरे आणि भावंडांनी आई- वडिलांच्या कष्टापासून प्रेरणा घेत शेती आणि देशी गोवंश संवर्धनाचा प्रेरणादायी वसा जपला आहे.
Cows
CowsSakal
Updated on

वाजगाव (ता. देवळा, जि. नाशिक) येथील बाळासाहेब देवरे आणि भावंडांनी आई- वडिलांच्या कष्टापासून प्रेरणा घेत शेती आणि देशी गोवंश संवर्धनाचा प्रेरणादायी वसा जपला आहे. सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत जमिनीची सुपीकता वाढविण्यासह फलोत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारले आहे.

नाशिक जिल्हा हा प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो. वाजगाव (ता. देवळा, जि. नाशिक) येथील बाळासाहेब देवरे आणि त्यांच्या भावंडांनी वडील कडूजी आणि आई पार्वतीबाई यांच्या शेतीमधील कष्टापासून प्रेरणा घेत शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. वाजगाव शिवारातील शेतीमध्ये केवळ, बापूसाहेब, बाळासाहेब, शिवाजी, संजय आणि राजाराम यांचे एकत्रित कुटुंब राबत आहे. शेतीची प्रमुख जबाबदारी बाळासाहेब यांच्याकडे आहे. कालानुरूप बदल स्वीकारत देवरे कुटुंबीय १९९० पासून पारंपरिक पिकांकडून फलोत्पादनाकडे वळले. यापुढील टप्यात गेल्या दहा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती नियोजनाची दिशा पकडली आहे. शेतीसह व्यावसायिक क्षेत्रात देवरे बंधूंची प्रगती वाखाणण्याजोगी आहे.

देशी गोवंशाचे संगोपन

आई-वडिलांना गाईंचा लळा होता. १५ ते २० गाईंचे संगोपन ते करायचे. ‘‘आपली काळी आई आणि देशी गाय ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती आहे’’ हा वडिलांचा विचार. सुरुवातीला अवघी ४० एकर जमीन असताना कष्टातून ती ७० एकरांवर गेली. हे सर्व श्रेय कुटुंबाच्या एकी व कष्टाचे आहे. माझे वडील म्हणायचे, ‘‘जोपर्यंत हयातीत गाईची जोपासना शक्य आहे, तोपर्यंत करावी, आयुष्यात गोमातेची सेवा केल्यास कधी कमी पडणार नाही.’’ वडिलांचा हाच आदर्श विचार समोर ठेवून गेल्या ४० वर्षांपासून देशी गोवंशाचे संगोपन केल्याने शेतीमध्ये बरकत आल्याचे बाळासाहेब अभिमानाने सांगतात.

देवरे यांच्या गोठ्यात सत्तरहून अधिक देशी गायी आहेत. गाव परिसर किंवा कुठलाही पशुपालकाला देशी गाय सांभाळण्यात अडचणी असल्यास देवरे कुटुंब असे गोवंश आनंदाने स्वीकारून संगोपन स्वखर्चाने करतात. देवरे यांनी १०० जनावरांसाठी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. गाईंसाठी तीन एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने चारापिके घेतली जातात. देवरे यांच्या घरातील आबालवृद्ध गायींची सेवा करतात. गाईचे दूध हे धार न काढता लहान वासरांना पाजले जाते. गाईचे शेण आणि गोमूत्र फक्त आपल्या शेतीसाठी या पद्धतीने नियोजन आहे.

शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट खतनिर्मिती

शेतीसाठी सेंद्रिय खताची वर्षभर उपलब्धता होण्यासाठी गायीचे शेण, कोंबडी खत, नागरी क्षेत्रातील कंपोष्ट खत आणि शेतातील कुजणारे टाकाऊ सेंद्रिय घटक एकत्र संकलित करून डेपो केला जातो. हे घटक एकसारखे मिसळून चाळणी केल्यानंतर शेतात वापरण्यापूर्वी त्यामध्ये पीएसबी, केएसबी यांसारखे उपयुक्त जिवाणू संवर्धक मिसळून गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते. दरवर्षी अशा पद्धतीने १०० ट्रॉली सेंद्रिय खताची निर्मिती होते.

दरवर्षी फळपिकांना आणि इतर पिकांना सेंद्रिय खत दिले जाते. पाचटाचे आच्छादन केले जाते. यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यासह बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत आर्द्रता टिकून ठेवली जाते. तण नियंत्रण आणि पाणी बचत होते. गेल्या २० वर्षांपासून सुरू ऊस लागवड केल्यानंतर सलग पाच वर्षे खोडवा घेण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अखेरच्या खोडव्याला ६० टन उत्पादन मिळाले आहे.

शेतीची साचेबद्ध आखणी

संरक्षित पाण्यासाठी पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे, एक एकरावर शेडनेट, शेतमाल हाताळणी व प्रतवारीसाठी पॅक हाउस, कांदाचाळ, पक्की बांधणी व जाळीच्या झाकणासह विहिरी, संपूर्ण क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाचा अवलंब, आधुनिक परिपूर्ण शेती-यांत्रिकीकरण, शेतमजुरांना निवास व्यवस्था, संपूर्ण क्षेत्रालगत कुंपण, शेतांतर्गत पक्के मुरूम रस्ते, शेतीची देखरेख करण्यासाठी बांधलेला मनोरा, शेताच्या कानाकोपऱ्यातील स्वच्छता देवरे यांच्या शेतीस भेट देणाऱ्या प्रत्येकास मोहून घेते.

फलोत्पादन शेतीचे प्रयोगशील मॉडेल

१९९० पासून देवरे कुटुंबीयांनी द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत आर्थिक सुबत्ता मिळविली. सुमारे ४८ एकरांवर डाळिंब लागवड झाली, परंतु तेलकट डाग रोगामुळे डाळिंब क्षेत्र कमी करत आधुनिक संकल्पनांची सांगड घालून पेरू, सीताफळ, नारळ, आंबा लागवडीवर भर दिला. यासह प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद, काजू, सुपारी, मसाला पिके, संत्री, मोसंबी, जांभूळ लागवडदेखील केली आहे. बाजारपेठेचा अंदाज घेत टोमॅटो, वाल, कांदा, मिरची, कोबी, काकडी, सिमला मिरची, आले लागवड केली जाते. शेतीमालाची विक्री प्रामुख्याने नाशिक, मुंबई, सुरत मार्केटमध्ये केली जाते.

सात हजारांहून अधिक जणांच्या भेटी

देवरे यांच्या शेतीला कृषिमंत्री दादा भुसे, यासह आजी-माजी मंत्री, उच्च पदस्थ अधिकारी, शेतकरी अशा जवळपास सात हजारांपेक्षा आधिक जणांनी भेट दिली आहे. त्यांच्या नोंदी व्हिजिटर बुकमध्ये आहे. याशिवाय दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक सहली त्यांच्या शेतावर येतात.

प्रयोगशील कुटुंबाचा नावलौकिक

सामाजिक उपक्रमात सहभागी आणि समाजाशी एकरूप अशी देवरे कुटुंबाची नाशिक जिल्ह्यात ओळख आहे. शेतीमध्ये प्रयोगशीलता जपल्याने १९९८ मध्ये कृषी विभागाने बाळासाहेब देवरे यांच्या आई पार्वतीबाईं यांना तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते ‘जिजामाता कृषिभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब यांना अन्नधान्य-गळीत धान्य पीक स्पर्धेत जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. २०१९ मध्ये राज्य सरकारच्या कृषी विभागाचा ‘उद्यानपंडित’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

गोवंश हीच जमीन सुपीकेतची ताकद

एकूण ७० एकर क्षेत्रावर रासायनिक खतांचा फारसा वापर न करता सेंद्रिय व जैविक खते वापरण्यावर त्यांचा भर असतो. गोमूत्र संकलित करण्यासाठी २० हजार लिटर क्षमतेची सिमेंट टाकी बांधली आहे. गोमूत्रात विविध उपयुक्त जिवाणू संवर्धक मिसळले जाते. हे द्रावण आणि जिवामृत मड पंपांच्या साह्याने उपसा करून पिकांना दिले जाते. त्यामुळे रासायनिक खतांचा खर्च बऱ्यापैकी कमी होऊन पीक उत्पादन वाढले.शेतीमालाची गुणवत्ता सुधारल्याने व्यापाऱ्यांकडून बांधावरच जास्तीत जास्त फळांची खरेदी होते.

(बाळासाहेब देवरे - ९४०३४ ०२६४३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()