।। जय श्रीराम ।।
एकदा परदेश दौ-यात असताना स्वामी विवेकानंदांना पाश्चात्त्य श्रोत्यांनी रामायणाच्या अस्तित्वाबद्दल विचारले, त्या वेळी त्यांनी उत्तर देताना रामायणाचा गौरवोल्लेख हा 'भारताचा सांस्कृतिक इतिहास' असा केला!
विवेकानंदांचे ते उद्गार आजही सार्थक वाटतात. कारण आजही भारताच्या हिमालयापासून ते आसेतू टोकापर्यंत जागोजागी येथील रामायणातील घटनाक्रमांतील स्थानांची तीर्थक्षेत्रे' म्हणून सामोरी येतात.
येथील सभ्यतेमध्ये रामायणातील तात्त्विक आचरण हे खोलवर भिनलेले आहे व त्याचे दर्शन येथील संस्कृतीतून नित्य घडत असते. कारण इथे व्यक्ती कोणत्याही जाती, धर्म, पंथ, संप्रदायाची असो परंतु त्याला 'राम' ही संज्ञा सत्य, संयम, प्रेम, त्याग, सात्त्विकतेमुळे स्वतःतीलच अविभाज्य घटक वाटत राहतो.
- मनीषा बाठे
खरं तर, रामायण (राम+अयन). अयन म्हणजे जाणे, गती. अर्थात रामाची यात्रा, रामाची भ्रमंती. हाच अर्थ ‘चर’ या शब्दाचाही होतो. त्यामुळे रामायण म्हणजे रामचरित. चरित अर्थात चालचलन, वागणूक. ‘अयन’ शब्दाचा दुसरा अर्थ ‘स्थान’ आहे.
या संदर्भातून ‘राम ज्याचा केंद्रबिंदू आहे ते रामायण’ असा होतो. ‘रामायणकथेत’ उद्धृत संस्कृती ही शिक्षण, अर्थकारण, वाङ्मय, कला, विज्ञान, धर्मकारण, राजकारण व समाजकारण या सर्वच पैलूंना स्पर्श करते. तसेच त्यातील ‘व्यापक तत्त्वज्ञानातून’ समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला आपापल्या प्रकृतीनुसार ‘जीवनकला’ देत राहते.
भारतीय संस्कृती ही निसर्ग सुसंगत व परिवर्तनशील असली तरी, सभ्यता आकारण्यात-विकसित होण्यासाठी शतकांचा प्रदीर्घ काळ लागला आहे. त्यामुळे येथील संस्कृतीतील रूढी, प्रथा, म्हणी, वाक्प्रचार अर्थातच साहित्यासह कला, संगीत, विविध संस्कार या प्रचलनांत समाजमन सहज अनुभवता येते.
कारण या प्रचलनांत समाजातील बहुजनांत रूढ तत्त्वज्ञान, श्रद्धा व उपासना इत्यादींचा निश्चितच प्रभाव असतो. अशाच मोजक्या प्रभावांपैकी एक म्हणजे ‘श्रीराम व रामायण’, यांबद्दलचे सर्व समाजावरील गारुड हे भारतीय भाषावैज्ञानिक प्रवासही दर्शविते.
भारताच्या चोवीस भाषांतील ‘सामायिक’ वाक्प्रचारांमधील एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘रामराज्य’ - हा वाक्प्रचार समानार्थी आहे. रामराज्य येणे अर्थात सामाजिक सर्वोच्च सुख, राजा आणि प्रजा यांत भेद नाही.
सामुदायिक सुखातील ‘सुख’ हा संस्कृत शब्दही बहुतांश भारतीय भाषांत जसाच्या-तसा वापरला जातो. अन् या सर्वच भाषेच्या साहित्यात ‘सामुदायिक सुखांची’ व्याख्याही ‘रामराज्य’ या समानार्थीच उल्लेखलेली दिसते. अगदी गोस्वामी तुलसीदासही रामचरितात रामराज्याची व्याख्या देतात-
राज म्हणजेच ‘राज्य’, हा संस्कृत शब्द- मराठी, पंजाबी, हिंदी, गुजराती, बंगाली, असमीया, ओडिया, तेलुगू, तमीळ, मल्याळम्, कन्नड भाषांमध्ये तत्सम म्हणून तसाच वापरला जातो. भारतीय भाषांमध्ये समान वाक्प्रचारांत येणाऱ्या रामायणातून आलेल्या ‘रामराज्य’ याप्रमाणेच- भरतभेट किंवा भरत-मिलाप,
रामबाण, दशमुखी (रावणामुळे), नाक कापणे (प्रतिष्ठा जाणे), दाता-राम किंवा कर्ता-राम अशा प्रकारचे वाक्प्रचार भाषांच्या मर्यादा तोडून सर्व भारतीय भाषांमध्ये ‘सांस्कृतिक वाक्प्रचार’ म्हणून प्रचलित दिसतात.
रामायण तात्त्विकदृष्ट्या केवळ मौखिक परंपरेत नव्हते, परंतु ग्रंथाच्या पारायणावरूनही विविध प्रांतांमध्ये पारायण स्वरूपात गत सहस्रकात प्रचलनात असावे. याचे प्रमाण म्हणजे एक मराठी म्हण -
बारा वर्षे रामायण ऐकले, अन् रामाची सीता कोण? (अर्थ- अनेक प्रयासांनीही अज्ञानीच) याच आशयाच्या इतर भारतीय प्रांत-भाषांतील म्हणी म्हणजे-
सगळी रामायन सुण''र पूछो कै
सीता कुण ही? (मेवाडी-राजस्थानी)
रामायणु पूरो थी व्यो पोइ थो
पूछे त सीता केर हुई। (सिंधी)
कथा ए तो मिथ्या, पण भमरगीता
कोणी दीकरी? (गुजराती)
सात कांड रामायण प''ड़े
सीता कार बाबा। (बंगाली)
सात काण्ड रामायण पढ़ि
सीता कार बाप? (असमीया)
इरामुळुदुम् रामायणम् केट्टुच्
शीतैक्कु रामन् एन्न एन्र कदै (तमीळ)
रामायणमन्ता विनि रामुडिकि सीता एमि कावलेनु अनि अडिगाडट (तेलुगू
बेळतनक रामायण केळि
सीतागू रामनिगू एनु संबंध (कन्नड)
अशा भारतीय म्हणी अनेक आहेत. थोडक्यात उदाहरणादाखल दोन-तीन प्रांतांतील म्हणींमधील साम्य पाहूयात- मराठीतील म्हण- देव तारी त्यास कोण मारी! (देव किंवा राम रक्षण करायचे ठरवितो तेव्हा तो आळशी असो वा सज्जन तो सर्वांचेही रक्षण करतो.)
ही होते- राम रक्षे तेने कोण भक्षे (गुजराती), अजगरेर दाता राम (बंगाली), अजगरकु दाता राम, मुखे बोले राम राम। (ओड़िसा), अज़गर के दाता राम (हिंदी) यांतून श्रीरामाची सर्वांबद्दलची समदृष्टी जनमानसांत अंकित झालेली दिसते.
असेच उत्तर-भारतातील एकूण अठरा लोकभाषांमध्ये एक सामुदायिक भावनावाचक काही ‘भाषिक संज्ञा’ रूढ आहेत, त्यात- ‘रामदुहाई’ (रामाचा डंका, पुकार, घोषणा), ‘रामभरोसे’ (दैवावर सोडलेले) इत्यादी अनेक आहेत.
हे शब्द दिवसामागे किमान दहा-बारा वेळा येथील स्थानिक मंडळी उच्चारतात. उत्तर-भारतात तर जंगली जायफळाच्या सालाससुद्धा ‘रामपत्री’ अन् औषधी वनस्पतीचे नाव ‘राम-बास’, फळांचीही नावे ‘सीताफल’ ही प्रचलित दिसतात.
अगदी येथील विवाहात वधूच्या पायात घालायच्या आभूषणालादेखील ‘रामझुल’, उत्तम जोडप्याच्या स्तुतीलाही- राम मिलाई जोड़ी, लग्नाच्या पारंपरिक वाद्यांतही ‘राम-सींघा’ (लहान तुतारीसारखे वाद्य) अन् लग्नात गाणाऱ्या पारंपरिक लोकसंगीतातील चैती-गीतांतही-(वसंतामध्ये राजा रामाबरोबर विलासणाऱ्या सीतेच्या वर्णनाची गाणी) अन् गवय्यालाही
संबोधतात- रामिशी. तसेच गायनातील रागांच्या नावातही ‘रामकली, राम-गीरी’ आहे. येथील सोळा संस्कारांत गायल्या जाणाऱ्या पारंपरिक गीतांमधील ‘रामकथा’ गात-गात, पुढे व्यक्तीच्या वृद्धापकाळीदेखील ‘अध्यात्माचा शांत’ रस म्हणून ‘रामधुन’ नामक ‘रामाचे भजन’ असे संपूर्ण जीवनचक्र ‘राममय’ होत सप्तसुरांत झंकारत राहते. असेच अनेक शब्द, संज्ञांमधून ‘राम’ हा शब्द उत्तर-भारतीय संस्कृतीत सहज प्रवाहित दिसतो.
वास्तविक पाहता श्रीरामाच्या चरित्राचे स्मरण महाराष्ट्रात रामाची तपोभूमी/वनवासाची भूमी (नाशिक) म्हणून मराठी भाषिकांमध्येही रामकथेचा प्रभाव हा काही कमी नाही. कारण आजही मराठीत रोजच्या व्यवहारात - लंकेत सोन्याच्या विटा (अर्थ-दुसऱ्याच्या संपन्नतेचा उपयोग नाही), मारुतीची शेपूट (अर्थ-लांबत गेलेली गोष्ट),
ताकापुरते रामायण (अर्थ-प्रासंगिक स्वार्थ), जुलमाचा रामराम (अर्थ-सक्तीने खुशामत करविणे), त्यात काही राम नाही (अर्थ-निष्प्रभ), दानवाच्या घरी रावण देव (अर्थ-भाव तसा देव), रामाशिवाय रामायण व कृष्णाशिवाय महाभारत
(अर्थ-मुख्य गोष्टींचा अभाव), घरचा भेदी लंका दाही (अर्थ-घरचा फुटीर) इत्यादी अनेक म्हणी, वाक्प्रचार प्रचलित आहेत. तसे भारतीय प्रांतवार-भाषांच्या प्रदेशांतील एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे आजही बहुतेक जण ‘राम-राम’ हे अभिवादन केल्यावर आदराने ते नमस्कार घेतात व देतात.
उपरोक्त मागोवा हा प्रांतभाषांतील ‘राम व रामायणाचा’ सांस्कृतिक प्रवास दर्शवितो. तसेच भाषा ठरावीक मैलांवर जशा बदलतात, तशाच त्यांच्या साहित्य-संस्कृतीच्या छटाही बदलतात. त्यामुळे प्रत्येक प्राकृत भाषेतील नव्याने रचलेले ‘रामायण’ हे बहुतांश वाल्मीकी रामायणावरच आधारित असले, तरी त्यात विभिन्न संस्कृतीमुळे प्रांतवार काहीसा फरकही दिसतो. त्याचा गोषवारा थोडक्यात पाहू-
बाराव्या शतकात : कंबन महाकवीकृत ‘कम्ब रामायण’ हे तमीळ भाषेतील रामायण ‘इरामावतारम्’ आहे. यात सात काण्डे, १०,०५० पद्ये आहेत. तसेच यातील राम हा दैवीशक्तीचा अवतारी पुरुष आहे.
चौदाव्या शतकात- माधवदेव कवीकृत ‘माधवकंदली’ हे असमिया भाषेतील रामायण. यात सात काण्ड व १८७ अध्याय आहेत. कवी गोपबुद्ध रेड्डीकृत ‘रंगनाथ रामायण’ हे तेलुगू रामायण. याला द्विपदरामायणही म्हणतात. यात सातव्या काण्डात तत्कालीन आंध्र प्रदेशातील वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेचे पडसाद व रावणाच्या दुर्गुणांसह गुण-शौर्य-औदार्यांच्या बाजूंचे वर्णनही येते.
पंधराव्या शतकात : सारलादासकृत महाभारतातील ‘रामकथा’ हे उडिया भाषेतील रामायण. हे वनपर्वात विलंकेच्या राजाला अगस्त्यांनी सांगितलेली कथा म्हणजे ‘रामायण.’ संत एकनाथकृत ‘भावार्थ रामायण’ हे मराठी भाषेतील रामायण. याची सात कांडे, २९७ अध्याय व ४०,००० ओव्या आहेत. कृत्तिवासकृत ‘रामायणपांचाली’ हे बंगाली रामायणही रामायणाच्या गौडी पाठावर आधारित आहे.
सोळाव्या शतकात : कुमार वाल्मीकीकृत तोरवे रामायण हे कन्नड भाषेतील रामायण. यात काही प्रसंग विष्णुपुराणानुसार असून त्यात बिभीषण व कुंभकर्णाच्या नवीन प्रसंगांची भरही आहे. मोलंबाकृत ‘मोल्ल रामायण’ हे तेलुगू भाषेतील रामायण. हे काव्य मोलंबा या कुंभार समाजातील साध्वीवृत्तीच्या तापसीचे असून त्यात अनेक लोककथांचा समावेश दिसतो. बलरामकृत ‘उत्कल वाल्मीकी’ हे उडिया रामायण. यात सीतेचा लक्ष्मणाला शाप, रामाचे मुनींना गोपी होण्याचे वरदान अशा नवीन गोष्टींची भरही आहे. गोस्वामी तुलसीदासकृत ‘रामचरितमानस’ हे अवधी भाषेतील रामायण.
अठराव्या शतकात : गिरधरकृत ‘रामचरित्र सम्मत वाल्मीकी नाटकधारा’ हे गुजराती भाषेतील रामायण. सात कांडे, २९९ अध्याय व ९५५१ चौपाया आहेत. प्रकाशराम कुर्यग्रामीकृत ‘रामावतारचरित’ हे डोंगरी काश्मिरी भाषेतील रामायण. सात कांडे २९९ अध्याय व ९५५१ चौपाया आहेत.
वरील विस्तारासह अनेक उपलोकभाषांमध्ये रामायणाच्या कित्येक विस्तार कथा गत हजारो वर्षांमध्ये लिहिलेल्या दिसतात. यांशिवाय लोकसाहित्यासह रसखान, मुहम्मद जायसीसारख्यांच्या उर्दू काव्यातही रामगुण व रामायण प्रसंगांचे उल्लेख दिसतात.
गोस्वामी तुलसीदासांनीही ‘रामायण शतकोटि अपारा’ म्हणजे अपार असा उल्लेख केला आहे. तथापि हे ‘रामकथेचे’ बीज कोट्यवधींच्या मनामनांतून विस्तारत आहे, जे आजही जनाजनांतून जाणवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.