देवी सप्तशृंगी : अठरा पुराणांपैकी 6 पुराणांमध्ये भगवतीच्या आयुधांचा उल्लेख

Saptashringi devi
Saptashringi deviesakal
Updated on


नाशिक :
आदिमाया-आदिशक्ती भगवतीला आयुधे कोठून मिळाली? ही आयुधे कोणत्या देव-देवतांनी दिली? या प्रश्‍नांची उत्तरे नाशिकचे स्मार्त चुडामणि शांतारामशास्त्री भानोसे यांनी दिली. अठरापैकी सहा पुराणांमध्ये भगवतीच्या आयुधांचा उल्लेख आढळतो.

त्यात श्रीदुर्गा सप्तशतीमधील अध्याय दुसरा, श्रीउत्स वैकृतिक रहस्यमधील श्‍लोक ७-१३, श्रीमार्कंडेय, श्रीविष्णू धर्मोत्तर, श्रीदेवी भागवत, ब्रह्मवैवर्त या पुराणांचा समावेश असल्याचे श्री. भानोसे यांनी सांगितले.

Saptashringi devi
सह्याद्रीचा माथा : आदिमाया, आदिशक्ती, अष्टादशभुजा श्री सप्तश्रृंग निवासिनी...


महिषासुरमर्दिनी अष्टादशभुजा रूप धारण केलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवतीच्या मूर्तीकडे प्रदक्षिणा क्रमानुसार उजव्या बाजूला खालून वरच्या भागात आणि नंतर डावीकडून वरून खालील भागात पाहिल्यावर आपल्याला आयुधांची निश्‍चित माहिती मिळते. लांब पल्ल्यासाठी वापरले जाते ते अस्त्र आणि कमी पल्ल्यासाठी वापरले जाते ते शस्त्र. अशा अस्त्र अन् शस्त्रांना आयुध संबोधले जाते. या आयुधांचा देवीच्या उजव्या बाजूने खालून वरच्या भागात पाहावयाचा क्रम पुढीलप्रमाणे असून (पुराणातील उल्लेखानुसार कंसात ते आयुध दिलेल्या देवांचे नाव दर्शवते) : वज्र (इंद्र), चक्र (भगवान विष्णू), मुसळ (विश्‍वकर्मा), बाण (वायुदेवता), त्रिशूल (शंकर), मुदगल (विश्‍वकर्मा), अंकुश (विश्‍वकर्मा), परशू (विश्‍वकर्मा), तलवार (कालदेवता). देवीच्या डाव्या बाजूने वरील भागातून खालील भागातील आयुधांचा क्रम पुढीलप्रमाणे असून (पुराणातील उल्लेखानुसार कंसात ते आयुध दिलेल्या देवांचे नाव दर्शवते) : ढाल (कालदेवता), कालदंड (यम), पाश (वरुणदेवता), तर्जनी (विश्‍वकर्मा), डमरू (शंकर), धनुष्य (वायूदेवता), घंटा (इंद्र), पानपात्र (कुबेर), शक्ती (अग्निदेवता). श्री. भानोसे यांना पुराणाचा अभ्यास आणि संशोधनातून ही माहिती मिळाली आहे.

Saptashringi devi
सप्तशृंगदेवीचे मूळ स्वरुप डामर तंत्रात


मूळ मूर्तीमधील आयुधांचा क्रम बदलून मधल्या कालखंडातील मूर्तीच्या आयुधांचा क्रम केव्हापासून अस्तित्वात आला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते गूढ आहे. कोणतीही गोष्ट तर्काने अथवा अनुमानाने सिद्ध होत नाही. निश्‍चित सिद्धांत होत नाही. विद्वान त्यावर संशोधन करत आहेत. लवकरच त्यासंबंधीचे सिद्धांत पुढे येतील, अशी आशा करू या. तरीसुद्धा मूळ मूर्तीच्या हातांमधील आयुधे डामर तंत्रानुसार आणि मधल्या कालखंडातील मूर्तीच्या हातातील आयुधे ही श्री वैकृतिक रहस्य ग्रंथानुसार शास्त्रोक्त आहेत. त्यामुळे दोन्हीही वेळच्या आयुधांच्या मूर्ती या शास्त्रोक्त आणि नित्यपूजेतील पूजनीय आहेत. म्हणून दोन्हीही रूपे पूजनीय आहेत. मूळ मूर्तीचे रूप त्रिशूळाने महिषासूर वध करतानाचे आहे. भगवतीच्या पायाखाली महिषासुराचे धड आणि शीर हे पाचशे पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूला आहे, असेही श्री. भानोसे यांनी स्पष्ट केले.

मराठा कालखंडानंतर मोठे काम
भगवती मूर्तीच्या खालील बाजूला चौथरा संवर्धनाच्या कामात आढळून आला. हे काम इसवी सन १७६८ मध्ये झाल्याची नोंद पेशवेदप्तरात आहे. या चौथऱ्याकडे पाहताना डाव्या बाजूला कमळ, मध्यभागी पिंडी, वरील भागात दोन पोपट, मधल्या भागात गणपती आणि त्याखाली दोन गजराज, उजव्या बाजूला कमळ, त्यात मध्यभागी शंभू महादेवाचे वाहन वृषभ, त्यावर दोन पोपट असे सुंदर नक्षीकाम करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसते, असे सांगून श्री. भानोसे म्हणाले, की मराठा कालखंडानंतर प्रत्यक्ष भगवती मूर्तीच्या संबंधाचे मोठे काम आता झाले आहे. संवर्धन कामानिमित्त विविध पूजापाठ, आराधना करण्यात आली आहे. मूर्तीवरील लेपन काढण्यापूर्वी कलाकर्षण विधी झाला. मग मूळ मूर्तीचा कलातत्त्व पुनर्विन्यास विधी, उदक शांती, आघोर होम, मुख्य देवता मंत्रजप, मुख्य देवता मंत्रहोम, जीवकला न्यासविधी, तत्त्वन्यास होम, जीवकला न्यास होम, श्रीसहस्त्रकलश महाभिषेक विधी करण्यात आला. आता स्थानिक २४ पुरोहितांच्या माध्यमातून मूर्ती नित्यपूजन सुरू आहे. अनुष्ठान केले जात आहे. सोळाशे देवी अथर्वशीर्ष पाठ, प्रतिदिन सोळाशे नवार्ण मंत्रजप, नित्यदुर्गा सप्तशतीपाठ करण्यात येत आहे. शिवाय दहा हजार संख्या पूर्ण होईपर्यंत दुर्गा सप्तशतीचे पाठात्मक आयुत चंडी महानुष्ठान सुरू आहे. मग पुढे सहस्त्रचंडी यज्ञ केला जाईल.

Saptashringi devi
Astro Tips: 'या' पाच गोष्टी उशाखाली ठेवल्याने नशीब चमकेल

नित्यपूजनाच्या तीन पद्धती
भगवतीच्या मूळरूपाला नित्य पूजनात वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांमुळे हानी पोचू नये म्हणून नित्यपूजनाच्या तीन पद्धती उपलब्ध आहेत. त्यानुसार मूळ मूर्ती आरशात पाहून आरशावर नित्यपूजन करणे. त्याला ‘प्रतिबिंब पूजन’ असे म्हणतात. देशातील काही मंदिरांमध्ये ही पद्धत वापरली जाते. याशिवाय यंत्राचेही नित्यपूजन केले जाते. राज्यातील आदिमाया-आदिशक्तीच्या आद्यपीठ स्थानात वापरण्यात येणाऱ्या पद्धतीनुसार उत्सवमूर्ती तयार करून तिचे नित्यपूजन करता येऊ शकेल, असा मुद्दा आतापर्यंतच्या इथल्या मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने झालेल्या विचारविनिमयातून पुढे आला आहे. श्री सप्तशृंग निवासिनी विश्‍वस्त मंडळातर्फे उत्सवमूर्ती चांदीची तयार करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी भगवतीच्या मूळ मूर्तीची प्रतिकृती तयार केली जाईल. दरम्यान, समाजामध्ये सात्त्विकता वाढावी, या उदात्त हेतूने व भाविकांचे कल्याण व्हावे म्हणून पेशव्यांनी शास्त्रोक्त षोडशोपचार पूजा सुरू केली. ही शास्त्रोक्त पूजा त्रिकाळ नैवेद्य, आरतीसह यथासांग व्हावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Saptashringi devi
Astrology : तुमच्या हातावर आहे का 'अशा' रेषा? लग्नानंतर पडेल पैशांचा पाऊस

''श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्तीचे स्थान हे लेणी की गुहास्वरूप आहे, असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित होतो. पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांची माहिती आणि एकूणच भगवतीच्या मंदिराची रचना पाहता, अन्य शिल्प नसल्याने मंदिर हे लेण्यातील नाही. गुहा स्वरूपातील अखंड पाषणातील मंदिर आणि भगवतीच्या मूळ स्थानाची रचना आहे. त्याचप्रमाणे देशभरात पाषणातील मूर्ती मोठ्या आहेत, परंतु पूजेत असणारी देशातील सर्वांत मोठी मूर्ती श्री सप्तशृंग निवासिनी भगवतीची असल्याचा उल्लेख मूर्ती संवर्धनाचे काम सुरू असताना सातत्याने समोर आलाय.'' - शांतारामशास्त्री भानोसे, स्मार्त चुडामणि, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()