- शशांक दीडमिशे
पशुधनाच्या आरोग्याचा लेखाजोखा माहिती असणे पशुपालकांसाठी अत्यंत गरजेचे असते. ही माहिती पशुपालकांकडे नसल्यास त्याचा उत्पादनावर थेट परिणाम होऊ शकतो. पशुपालकांची ही गरज ध्यानात घेऊन अशा पद्धतीची सेवा देण्याचे काम ब्रेनवायर्ड हे स्टार्टअप करते. ब्रेनवायर्ड स्टार्ट ॲपची ओळख करून देणारा लेख...
‘वी स्टॉक’ या ब्रॅंडच्या माध्यमातून ब्रेनवायर्डकडून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे टॅगिंग केले जाते. या टॅगच्या माध्यमातून दुधाळ जनावरांच्या आरोग्यासंबंधित माहिती गोळा करण्यात येते. तसेच, जनावरांच्या आजारांचे मूल्यमापन ही केले जाते. त्यामुळे जनावराच्या आरोग्याची सद्यःस्थिती जाणून घेणे सोपे होते. जनावरांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये होणारे बदल, कृत्रिम रेतनासाठीची योग्य वेळ आदी माहिती संबंधित पशुपालकाकडे असलेल्या अॅपवर पाठविली जाते. त्यामुळे विविध आजारांमुळे होणारे जनावरांचे मृत्यू रोखता येऊ शकतात. पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित डेटा (माहिती) नवे तंत्रज्ञान वापरून एकत्र केला जातो. जनावरांच्या कानावर एक डिजिटल टॅग बसविला जातो. या टॅगच्या माध्यमातून संबंधित जनावराची सर्व प्रकारची माहिती संग्रहित केली जाते, जी पशुपालकांना अॅपवर उपलब्ध करून देण्यात येते.
दुधाळ जनावरांच्या आरोग्याशी निगडित सर्व प्रकारचा डेटा उपलब्ध होत असल्याने संबंधित जनावराला कुठल्या प्रकारचा चारा द्यायला हवा, त्याच्या आरोग्याच्या समस्या समजल्याने त्यावर उपचार करता येतो. जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. यामुळे दूध उत्पादन वाढविण्यासाठीच्या उपाययोजना करणे त्या पशुपालकाला शक्य होते. त्यामुळे दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढविणे शक्य होते.
ब्रेनवायर्ड अॅपची वैशिष्ट्ये
१) आरोग्यविषयक
दुधाळ जनावराच्या आरोग्याचे जन्मापासूनचे रेकॉर्ड
लसीकरणाची माहिती
झालेल्या आजारांची माहिती
२) कृत्रिम रेतन -
जनावर कधी आणि किती वेळा गाभण राहिले?
कृत्रिम रेतन करण्याची योग्य वेळ
३) जनावराच्या सर्व हालचालींची माहिती (लाइव्ह ट्रॅकिंग)
४) दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन आणि अन्न पचविण्याचा कालावधी
५) जनावरांचे तापमान, आजारांमुळे आलेला लुळेपणा
६) पशुवैद्यकीय तज्ज्ञांची माहिती
७) कॉल सेंटरद्वारे ऑनलाइन सल्ला सेवा
दोन तरुणांचे स्टार्टअप
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पशुधनाच्या आरोग्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ब्रेनवायर्ड या स्टार्टअपची दोघा तरुणांनी निर्मिती केली. केरळमधील रोमियो जेरार्ड आणि श्रीशंकर हे ब्रेनवायर्डचे संस्थापक. त्यांनी घरातील व्यवसायाला मदत म्हणून २०१८मध्ये ब्रेनवायर्डची सुरवात केली. या दोघांचीही कुटुंबे डेअरी क्षेत्राशी निगडित असल्यामुळे या व्यवसायातील अडचणी दोघांनीही जवळून पाहिल्या होत्या. त्या अडचणींवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांतून ब्रेनवायर्ड स्टार्टअपचा जन्म झाला. पुढे या त्याचे रूपांतर कंपनीत झाले.
महाराष्ट्र सरकारकडून गौरव
महाराष्ट्र सरकारकडून २०२०मध्ये उत्कृष्ट स्टार्टअपचा पुरस्कार ब्रेनवायर्डला मिळालेला आहे. महाराष्ट्रात काम करण्यासाठीचे १५ लाखांचे कंत्राटही या स्टार्टअपला राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून मार्च महिन्यात ब्रेनवायर्डचा गौरव करण्यात आला. ब्रेनवायर्डची स्थापना झाली त्याच वर्षी (२०१८) या स्टार्टअपने असोचॅमतर्फे आयोजित नव्या स्टार्टअपसाठीच्या स्पर्धेत बाजी मारली होती.
गुंतवणुकीचा ओघ वाढला
ब्रेनवायर्डची स्थापना झाल्यापासून सुरुवातीच्या काळात केरळ स्टार्टअप मिशनने या स्टार्टअपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर मागील वर्षी गुरुग्राममधील हडल या इंक्यूबेटरने ‘ब्रेनवायर्ड’मध्ये गुंतवणूक केली. जुलै २०२० मध्ये मुंबई एंजल इन्व्हेस्टर आणि इंडिया ॲक्सिलरेटरने ‘ब्रेनवायर्ड’मध्ये गुंतवणूक केली. अवघ्या तीन वर्षांत कंपनीने मोठ्या, प्रसिद्ध गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले.
‘ब्रेनवायर्ड’ची व्याप्ती
मागील वर्षीच्या जून महिन्यापर्यंत ‘ब्रेनवायर्ड’चे कामकाज तीन संगणक अभियंते सांभाळत होते. त्यानंतर त्यात आणखी दहा अभियंत्यांची भर पडली. ताज्या माहितीनुसार ब्रेनवायर्डने आत्तापर्यंत दोन हजार जनावरांचे टॅगिंग केले आहे. ही कंपनी केरळमधील चार शहरांत काम करते. यंदा महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांत प्रवेश करण्याचा ब्रेनवायर्डचा मानस आहे. त्याचबरोबर विविध राज्य सरकारांबरोबर हातमिळवणी करण्याचाही ब्रेनवायर्डचा प्रयत्न सुरू आहे. बंगळूरमधील स्टेलॅप्स हे स्टार्टअप ब्रेनवायर्डचे मुख्य स्पर्धक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.