कुर्डुवाडी : निसर्गातील सुंदर हिरवा गालिचा, नयनरम्य परिसर, श्री महादेव मंदिरातील प्रसन्न वातावरण यामुळे सोलापूरच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटकांना माढा तालुक्यातील चिंचगाव टेकडी परिसर खुणावत असतो. विशेषतः श्रावण महिन्यात हजारो भाविक या ठिकाणी येतात. चिंचगाव टेकडीपासून काही किलोमीटर अंतरावर धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणांसह धरण परिसर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
कुर्डुवाडी शहरापासून बार्शी रस्त्यालगत सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगाव टेकडी येथे छोटे मंदिर होते. सुमारे ६५ वर्षांपूर्वी स्व. रामानंद सरस्वती महाराज येथे आले. त्यांनी येथे श्री महादेवाचे भव्य मंदिर व सभामंडपाची उभारणी केली. मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री गणेश, श्री विठ्ठल व श्री दत्त यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा केली. ध्यानमंदिरात ध्यानधारणा करण्यासाठी सोय उपलब्ध आहे. मंदिराच्या शिखरावर आकर्षक असे कोरीव काम केले आहे. शिखर, भव्य सभामंडपातील खांब, अनेक ठिकाणी केलेली कलाकुसर आकर्षक आहे.
दर पौर्णिमेला हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. मोफत आरोग्य शिबिरे, संतांच्या जयंती, पुण्यतिथींचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर राज्यांतील भाविकांसह पंचक्रोशीतील लाखो भाविक या ठिकाणी येतात. शिवचरणानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे सत्संग मंडळ, धर्मरक्षक दल आदी सतत या कार्यक्रमासाठी तत्पर व कार्यरत आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या चिंचगाव टेकडी येथे राहण्यासाठी भव्य भक्त निवासाची उभारणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो.
चिंचगाव टेकडीला जाण्याची सोय
कुर्डुवाडी, बार्शी येथून एसटी बस उपलब्ध आहेत.
कुर्डुवाडी येथे रेल्वेने आल्यानंतर तिथून चिंचगाव येथे जाण्यासाठी खासगी गाड्या, बसची सोय.
जवळपासची पाहण्यासारखी ठिकाणे
चिंचगाव येथून सुमारे १५ किमी अंतरावर माढा येथील ऐतिहासिक किल्ला. कसबा पेठेतील सुप्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिर
चिंचगाव येथून सुमारे २५ किमी अंतरावर अरण- संतशिरोमणी श्री संत सावतामाळी यांचे मंदिर
चिंचगाव येथून सुमारे १७ किमी अंतरावर लऊळ- संत श्री कुर्मदास मंदिर
चिंचगाव येथून सुमारे ३० किमी अंतरावर उजनी धरण, बॅकवॉटर, बोटिंग, फ्लेमिंगो पक्षी
माढा तालुक्यातील सुमारे २२ किमी लांबीचा भीमा-सीना जोडकालवा
माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले बेंद ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण
चिंचगाव टेकडी मंदिर येथे श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात. भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास व महाप्रसादाची उत्तम सोय आहे.
- ज्योतिबा उबाळे, विश्वस्त, श्री महादेव मंदिर सत्संग आश्रम, चिंचगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.