Shravan 2024 : हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सण-उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण-उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय. या श्रावण महिन्याला विशेष असे महत्व आहे.
भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतींची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांनाच समर्पित आहे. ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते, अशी धार्मिक मान्यता आहे.
उत्तर भारतीय पंचांगानुसार २२ जुलैला श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार ५ ऑगस्ट २०२४ ला श्रावण मासारंभ होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना ५ ऑगस्टपासून (सोमवारी) सुरू होणार असून, यावेळी ५ श्रावणी सोमवार येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात याविषयी सविस्तर.
यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. ५ ऑगस्टला (साोमवारी) श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर ३ सप्टेंबर २०२४ ला श्रावण अमावस्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. यंदा श्रावण महिन्यात ५ श्रावणी सोमवार आहेत.
सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे. त्यामुळे, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात. भगवान शंकरांची मनोभावे पूजा करतात. हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण, याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शितला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे महत्वाचे सण-उत्सव आहेत. या सर्व सण-उत्सवांमुळे या श्रावण महिन्याचे महत्व अधिक वाढते.
श्रावण महिन्यात दरवर्षी ४ श्रावणी सोमवार येतात. परंतु, यंदाच्या श्रावण महिन्यात ५ श्रावणी सोमवार आहेत. या काळात देशातील भगवान शंकरांच्या १२ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवांची मनोभावे पूजा करतात.
यंदा ५ ऑगस्ट २०२४ ला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे. त्यानंतर, १२ ऑगस्टला दुसऱ्या श्रावणी सोमवारचा उपवास केला जाईल आणि १९ ऑगस्टला तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे. त्यानंतर, चौथा श्रावणी सोमवार हा २६ ऑगस्टला आहे आणि शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार हा २ सप्टेंबर २०२४ ला साजरा केला जाईल. याच दिवशी श्रावणी अमावस्या देखील आहे.
पहिला श्रावणी सोमवार – ५ ऑगस्ट २०२४
दुसरा श्रावणी सोमवार – १२ ऑगस्ट २०२४
तिसरा श्रावणी सोमवार – १९ ऑगस्ट २०२४
चौथा श्रावणी सोमवार – २६ ऑगस्ट २०२४
पाचवा श्रावणी सोमवार – २ सप्टेंबर २०२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.