आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता, त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगटं,नेसायला जाडें भरडे,राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत.
पुढे श्रावण महिन्यांतील पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली, ते कुठं जात आहेत ? अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. नावडतीने विचारलं त्याने काय होतं ?भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं,मुलबाळ होतं,नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ? नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते.नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली.
काय आहे शिवामूठीचा वसा..
नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या, नावडतीने विचारलं काय बोलताय, तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामूठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं ? मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी. गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा,नणंदाजावा,भ्रतरा,नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा.पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग,चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीकरीता घ्यावे.
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावा नणंदानीं तिला उष्टं माष्टं पान दिलं ते तीनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला , नावडतीने घरातून सर्व सामान घेतला, पूढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली, आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या,दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे .मलख आवडती कर रे देवा, असे म्हणून तिळ वाहिले.
संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं,दूध पिऊन निजून राहिली, संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे. नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत कांटे कुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली,घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली.नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करूणा आली.
नागकन्या, देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरादेवा,सासूसासऱ्या,दिराभावा,नणंदाजावा, नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली.
राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतिची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं ?
सूनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.