तुळशी व भोगावती नदीच्या पवित्र संगमावर धार्मिक श्रद्धास्थान असलेले कसबा बीड (ता. करवीर) येथे महादेवाचे प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. करवीर काशीतीर्थ क्षेत्रात पवित्र व वैभवशाली पुण्यस्थान आहे. ते भोज राजाची राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे अकराव्या शतकातील शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर उभारले आहे. ते वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. देव-देवतांच्या कोरीव मूर्ती, भव्य नक्षीकाम व विरगळ यांच्या प्राचीन वैभवाचे येथे दर्शन घडते. सोन्याचा पाऊस पडणारे गाव म्हणून ओळखले जाते.
कोल्हापूरच्या पश्चिमेस अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. इतिहासाच्या अनेक प्राचीन मूर्ती, विरगळ व मंदिर नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले पुरातन गाव इसवीसन पूर्व शतकात झालेल्या शिलाहार राजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याकाळी कोल्हापूर पन्हाळ्याचा प्रदेश या राजधानीच्या अमलाखाली होता. प्राचीन काळात या मंदिराला ‘बिडेश्वर’ असे संबोधले जात होते. या नावावरूनच या गावाचे नाव ‘कसबा बीड’ असे झाले आहे. बिडेश्वराचे महादेव मंदिर, एक पाषाण गणेशमूर्ती, शिवयोगी मठ, कल्लेश्वर मंदिर, लक्ष्मी तलाव, गणेश तलाव, ढोकमाळातील रानबावी, गजेंद्र लक्ष्मी मंदिर इत्यादी ठिकाणी कोरीव बांधकाम व मूर्ती आहेत. गावाच्या मध्यभागी बिडेश्वर महादेवाच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. अकराव्या शतकात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.
‘सोन्याचा पाऊस पडणारे गाव’ अशी कसबा गावाची आख्यायिका सर्वदूर परिचित आहे. हे खरंही आहे. कारण या गावाच्या परिसरात आजही सोन्याची नाणी सापडतात. विशेषतः येथील सोन्याचा माळ यासाठी प्रसिद्ध आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर ही नाणी शक्यतो लोकांना सापडतात. यावर त्रिशूल, महादेवाची पिंड अशा छाप असणाऱ्या शंभर टक्के सोन्याच्या या मुद्रा असतात. गावात असंख्य लोकांकडे या पाहायला मिळतात. त्यांचे घरातील देव्हाऱ्यात पूजन करण्यात येते. काही हौशी लोकांनी हा ‘भेडा’ गळ्यातील सोन्याच्या चेनमध्ये, अंगठीत बसवून घेतला आहे. पावसाळ्यात या नाण्यावरील माती धुवून गेल्यावर ती चमकतात व लोकांना सापडतात. म्हणून सोन्याचा पाऊस पडतो असे म्हणतात.
इथून सात किलोमीटरवर सातेरी महादेव मंदिर आहे. अलीकडे या मंदिराचा परिसर विकसित करण्यात आला आहे. मंदिरापर्यंत रस्ता झाला आहे. तसेच येथील निसर्ग सौंदर्य मनाला मोहवून टाकणारे आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढलेली आहे; पण सोईसुविधांचा अभाव जाणवत आहे. श्री महादेव मंदिर पूर्वाभिमुख असणारे हे मंदिर कातळात कोरलेल्या गुहेमध्ये वसले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. या शिवलिंगावर वेटोळे घातलेल्या नागाची पितळेची मूर्ती नंतर बसवण्यात आली आहे, तर याच्या मागे श्री. शंकराचे आयुध त्रिशूळ ठेवण्यात आले आहे. या गुहेच्या छतावर अगदी मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते. तीन स्तरांची ही रचना एखाद्या फुलाप्रमाणे दिसते. कालौघात त्याची बरीच झीज झालेली आहे. पायऱ्यांवरून वर जाता जाता डाव्या बाजूला आपणास एक विहीर दिसते. अंदाजे ३० ते ४० फूट खोल ही विहीर सध्या रिकामीच आहे. पूर्वी वर डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी कातळातील भेगांमुळे या विहिरीत साठवले जात होते. काही वर्षांपूर्वी या डोंगरावर ही विहीर एकमात्र पाण्याचा स्रोत होती. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली दिसते, तर त्याच्या आत ठिकठिकाणी खोबण्या करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या पिछाडीस पार्वती मातेचे मंदिर आहे. सभोवती लहान-मोठ्या गुहा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.