आज जगात कुठेतरी वाढदिवस साजरा केला जात असेल तर दुसरीकडे कोणीतरी शेवटच्या घटका मोजत असेल. कोणी प्रियकराला विरहानंतर भेटून परमोच्च आनंदात असेल तर दुसरीकडे कोणाचा तरी प्रेमभंग होत असेल. एकाच हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म होत असेल आणि जवळच कोणीतरी असाध्य रोगाने ग्रस्त असेल. एकीकडे कोणाला नवीन नोकरी मिळण्याचा आनंद असेल तर दुसरीकडे कोणीतरी परीक्षेत नापास झालेला असेल. कुठे पक्वानांची पार्टी चालली असेल तर दुसरीकडे खायला अन्न मिळत नाही म्हणून माणसांचा भूकबळी होत असेल. एकीकडे शेतकरी शेतात राबून थकून दुपारची भाकरी खात असेल तर दुसरीकडे कोणी अन्नाची नासाडी करत असेल. कोणी व्यवसायात चांगला नफा झाल्याच्या आनंदात असेल तर कोणी प्रचंड नुकसान झाल्याने आयुष्य संपवण्याच्या विचारात असेल..
Life is too short
आयुष्य खूप छोटं आहे. आपल्याला वाटतो तितका आयुष्याचा प्रवास दीर्घ नसू शकतो. अनेकदा तो समजेपर्यंत रस्ताच संपून जातो. आपण ऐकतो साठीनंतर, रिटायरमेंटनंतर देव-देव किंवा अध्यात्माचा वेळ असतो, हा गैरसमज आहे! समाजाच्या या धारणेतच मुळात दोष आहे. आध्यात्मिक गुण व दृष्टिकोन ठेवून जीवनात जे फायदे मिळणार आहेत ते शेवटी समजून काय उपयोग? आयुष्याचा विरोधाभास समजून तो पचवायला जी आंतरिक शक्ती विकसित करायला हवी ती साठी-सत्तरीनंतर येऊन त्याचे फळ मिळणार कधी? आयुष्याचा अर्थ काय, आपण कोण आहोत, आपला उद्देश काय आहे, कोणत्या दिशेने जायचंय, काय महत्त्वाचं, काय धरून ठेवायचं आणि काय सोडायचं याचं आकलन होऊन ते आचरणात आणायला रिटायरमेंटनंतर उरलेलं आयुष्य अर्थातच कमी पडतं. त्याआधी संपूर्ण आयुष्य चाचपडत घालवावं लागतं. आपले विचार, आपल्याला भावना, परस्परांमधील संबंध, अडथळे, कठीण काळ, वेळोवेळी येणारे टप्पे, अनाकलनीय परिस्थिती या व इतर अनेक प्रसंगांमध्ये आपला साथ देतो तो योग्य दृष्टिकोन आणि जागरूकतेने जगणं. वेगवेगळ्या टप्प्यांवर आपले आई-वडील, मित्र-मैत्रिणी, विविध विषयांमधील शिक्षक व मार्गदर्शक हे साथ देतातच. परंतु त्या सगळ्यांनासुद्धा मर्यादा आहेत कारण तेही त्यांच्या जीवनात शिकत आणि विकासाकडे जात असतात. परंतु आध्यात्मिक ग्रंथ आणि गुरू हे आपल्याला कुठल्यातरी एकाच विषयात नाही तर कोणत्याही परिस्थितीत काय 'सेंट्रल थीम' घेऊन पुढे जायचं असा संपूर्ण आयुष्याचं सारच सांगतात.
जितक्या लवकर म्हणजे समज आलेल्या वयातच जर थोडा थोडा अभ्यास सुरू केला तर अध्यात्म शास्त्र हे कशाही परिस्थितीत मार्ग दाखवणारी मशाल आणि आपल्याला कोलमडू न देणारी ढाल बनते. लोकमान्य टिळक व सावरकरांना तुरुंगात पराकोटीचे जे हाल सोसावे लागले त्यात सुद्धा त्यांची शारीरिक-मानसिक ऊर्जा, कार्याप्रतीची निष्ठा, चिकाटी आणि ध्येयं टिकली याचं कारण त्यांची आध्यात्मिक बैठक. कित्येक क्रांतिकारक फासावर चढले ते हातात भगवद्गीता घेऊन! दोन-तीन महिने लॉकडाऊनमध्ये आपल्याला वेड लागायची पाळी आली होती. पण लोकमान्य टिळकांनी तुरुंगात 'गीता रहस्य' नावाचा गीतेतील कर्मयोगावर आधारित ग्रंथ लिहिला. आपण मात्र रोज नवीन नवीन रेसिपी बनवून दिवस ढकलले. एक योगीच आजूबाजूच्या परिस्थितीपलीकडे जाऊन मूळ उद्देशाकडे पाहू शकतो. हे अध्यात्म शास्त्राचा अभ्यास आणि योगसाधना असल्याशिवाय अशक्य आहे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.