दिनविशेष : २८ सप्टेंबर - इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

दिनविशेष : २८ सप्टेंबर - इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
Updated on

पंचांग -२८ सप्टेंबर २०२१ - मंगळवार : भाद्रपद कृष्ण ७, चंद्रनक्षत्र मृगशीर्ष, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२४, चंद्रोदय रात्री ११.३६, चंद्रास्त दुपारी १२.२७, गजगौरी व्रत (हादगा-भौंडला), सप्तमी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन ६ शके १९४३.

दिनविशेष - 28 सप्टेंबर

1746 - ब्रिटिश प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित सर विल्यम जोन्स यांचा जन्म. 1784 मध्ये त्यांनी "एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल' या संस्थेची स्थापना केली. भारतात न्यायाधीश म्हणून येण्यापूर्वी त्यांनी अनेक भाषांचा अभ्यास केला. त्यांनी "शाकुंतल' नाटकाचे, "गीतगोविंद', "ऋतुसंहार' या साहित्यकृतींचे इंग्रजी भाषांतर केले.

1898 - स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार शंकर रामचंद्र ऊर्फ मामाराव दाते यांचा जन्म. हिंदू महासभेचे कार्यकर्ते, "काळ'चे संपादक, मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपी बसविणारे तंत्रज्ञ म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. "सकाळ'च्या उभारणीत त्यांनी डॉ. नानासाहेब परुळेकर यांना सहकार्य केले. भागानगर सत्याग्रह, हिंदुस्थान इतिहास, हिंदुधर्म स्वरूप, भारतीय समाजवाद, मुद्रण स्वरूप ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

1929 - गेल्या सहा दशकांहून अधिक काळ असंख्य माणसांच्या अंतःकरणात आपल्या सुमधुर स्वरांनी नादमुग्ध करणाऱ्या विख्यात गायिका स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म. भारतीय संगीतातील स्वरमाधुर्य आणि नादमाधुर्याची पताका अवघ्या विश्वभर फडकविण्याचे विलक्षण कार्य त्यांच्या हातून घडले आहे. जगात सर्वाधिक गाणी गायिलेली सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस' मध्ये नोंद झाली. भारतरत्न, अनेक फिल्मफेअर ऍवॉर्डस, महाराष्ट्रभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आदी सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले. "आनंदघन' या टोपणनावाने मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं, तांबडी माती या चित्रपटांना संगीत दिले. तसेच मराठीतील "वादळ', हिंदीतील "लेकिन' या चित्रपटांची निर्मिती केली.

1970 - इजिप्तचे अध्यक्ष, अरब लीगचे सूत्रधार व अलिप्ततावादी चळवळीचे पुरस्कर्ते गमाल अब्देल नासर यांचे निधन.

1992 - पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ काळ झगडलेले मेजर (निवृत्त) ग. स. ठोसर यांचे निधन.

1997 - भूतपूर्व औंध संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत श्रीपतराव भगवंतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.
2000 - भारतीय नौदलाची प्रहारक्षमता वाढविणारी चौथी क्षेपणास्त्रवाहू नौका "प्रबल' चे समारंभपूर्वक जलावतरण. "प्रबल' ही "नाशक' वर्गातील नौकांपैकी एक आहे.

2000 - सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.

2002 - वक्त, धूल का फूल, इन्साफ का तराजू, इत्तेफाक या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक धरम चोप्रा यांचे निधन. चित्रपटांबरोबरच त्यांनी दूरचित्रवाणीवरील काही मालिकांचेही छायालेखन केले. महाभारत, बहादूरशहा जफर या मालिकांचे त्यांनी केलेले छायालेखन रसिकांच्या पसंतीस उतरले होते.

2003 - शाहीर बाबासाहेब देशमुख यांचे निधन. "शिवाजीमहाराज', "गड आला; पण सिंह गेला',"भारत-चीन', 'भारत-पाकिस्तान लढाई', "बांगलादेशाचा रणसंग्राम', "इंदिरा गांधी व राजीव गांधी', "धर्मवीर संभाजीमहाराज', "महाराष्ट्राची लोकगीते', "विष्णूबाळा', "उमाजी नाईक', "डॉ. बाबासाहेब आंबेडकर', "क्रांतिसिंह नाना पाटील' या त्यांच्या पोवाड्यांच्या ध्वनिफिती राज्यभर गाजल्या.

2003 - मराठी वैद्यक पत्रकारितेला मानाचे स्थान मिळावे यासाठी अहर्निश झटणारे आणि विविध वृत्तपत्रांमधून तब्बल तीन दशके आरोग्यशिक्षण व आरोग्यविषयक स्तंभलेखन करणारे डॉ. सुरेश नाडकर्णी यांचे निधन.

2003 - भारताच्या अतिप्रगत "इन्सॅट 3 ई' या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गियानातील कोरू तळावरून यशस्वी प्रक्षेपण. युरोपीय अवकाश संशोधन संस्थेच्या "एरिअन 5' या उपग्रहवाहकातून हे प्रक्षेपण झाले. "इन्सॅट'बरोबरच या वाहकात "युटेलसॅट'चे "ई-बर्ड' आणि युरोपीय अवकाश संस्थेचा "स्मार्ट 1' हे अन्य दोन उपग्रहही होते. "इन्सॅट 3 ई' उपग्रहामुळे दूरसंचार आणि दूरचित्रवाणी सेवा अधिक कार्यक्षम होणार आहे.

2003 - धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-2 असा पराभव करून क्वालालंपूर येथे झालेल्या आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत प्रथमच अजिंक्‍यपद पटकावले.

2003 - ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मो. ग. तपस्वी यांचे नाशिक येथे निधन.

2004 - विचारवंत कादंबरीकार डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन. "अनटचेबल' ही कादंबरी त्यांनी लिहिली. महात्मा गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी या कादंबरीचे पुनर्लेखन केले. एकोणीस प्रकाशकांनी परत केलेली ही कादंबरी ई. एम. फॉर्स्टर यांच्यामुळे प्रसिद्ध होऊ शकली आणि त्यानंतर ती अनेक विक्रम करीत राहिली. चोवीस भाषांमध्ये या कादंबरीचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. "कुली', "टू लीव्हज अँड ए बड', "दि व्हिलेज', "ऍक्रॉस द ब्लॅक वॉटर', " दि प्रायव्हेट लाइफ ऑफ ऍन इंडियन प्रिन्स' व "दि रोड' या कादंबऱ्यांनी भारतीय वास्तवाचे दर्शन घडविले. "रिमेंब्रन्स ऑफ दि पास्ट' हे त्यांचे नऊ खंडात्मक आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. चंडीगडच्या पंजाब विद्यापीठात टागोर अध्यासनाचे प्रमुख, "मार्ग' या कलेला वाहिलेल्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे संपादक, साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण सन्मानाने गौरविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.