महत्त्व वटपौर्णिमेचे

भारतीय आणि परंपरा तसेच साजरे केले जाणारे उत्सव, सणवार यांच्यात मूळ कल्पना दिसते ती आरोग्यरक्षण व निसर्गाशी सात्मीकरण करण्याची.
vat purnima
vat purnimasakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

भारतीय आणि परंपरा तसेच साजरे केले जाणारे उत्सव, सणवार यांच्यात मूळ कल्पना दिसते ती आरोग्यरक्षण व निसर्गाशी सात्मीकरण करण्याची. अर्थातच या सगळ्यांचा विचार आयुर्वेदिक परंपरेनुसार केलेला दिसतो. भारतीय परंपरेत एक महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी उपवास करावा, वटवृक्षाच्या सान्निध्यात राहावे, मैत्रिणींबरोबर हसत-खेळत वेळ घालवावा, अशी परंपरा दिसते.

वडाचे मोठे झाड असते. भारतातील सर्व प्रांतांत वडाचे झाड दिसते. हे झाड १५ ते २० मीटर उंच असते. याच्या खोडाचा परीघ खूप मोठा असतो. याचे मूळ सगळ्या वृक्षांमध्ये वेगळे असते. हे वृक्षातून लोंबकळत खाली येऊन जमिनीत रोवले जाते, यामुळे वृक्षाला बळकटपणा मिळतो. हळूहळू हे झाड विस्तृत होत जाते. वडाचे झाड साधारण १०० वर्षे टिकते म्हणून याला अक्षयवट असेही म्हटले जाते. म्हणूनच कदाचित अक्षय आयुष्याचा विचार करणारा आयुर्वेद या झाडाला खूप महत्त्व देतो. तसेच आपल्या परंपरेत हे झाड पवित्र समजले जाते.

वटो रूक्षो हिमो ग्राही कषायो योनिदोषहृत्।

वर्ण्यो व्रणविसर्पघ्नः कफपित्तहरो गुरुः।।

वटः शीतः कषायश्र्च स्तम्भनो रूक्षणात्मकः।

वडाचे झाड रसात कषाय, गुणांमध्ये गुरू व रूक्ष असते आणि याचा विपाक कटू असतो, वीर्य शीतल असते. वड पित्तशामक, त्वचाविकारांमध्ये मदत करणारा, मुख्यत्वे विसर्प म्हणजे नागिणीमध्ये मदत करणारा, वर्ण्य (त्वचेचे सौंदर्य वाढविणारा– त्वचा नितळ-तेजस्वी करणारा), योनीदोषहर (स्त्रीरोगांमध्ये मदत करणारा), व्रण (जखम भरून येण्यास मदत करणारा), कषाय व ग्राही (मलप्रवृती बांधून येण्यास मदत करणारा असल्यामुळे ग्रहणीसारख्या रोगांमध्ये मदत करणारा), स्तंभक (रक्तपित्त, जुलाब थांबविण्यास मदत करणारा) असतो.

योनीदोष हरण करण्याच्या याच्या गुणामुळे कदाचित वटवृक्षाची पूजा आपल्याकडे प्रत्येक स्त्रीला करायला सांगितलेली आहे. आधुनिक संशोधनात असेही समजलेले आहे की, वडाच्या झाडात असे विशेष जीन्स असतात, ज्यामुळे ते झाड वातावरणात होणाऱ्या कुठल्याही बदलांशी जुळवून घेऊ शकते, त्यामुळे वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते. हाच प्रभाव स्त्रीवर व्हावा यासाठी स्त्रियांना वडाच्या झाडाची पूजा सांगितलेली असावी.

वडाचे उपयोग

  • वडाची साल, वडाची कोपल (नवीन पाने), निर्यास या सगळ्यांचा वापर आरोग्यासाठी करता येतो.

  • वडाच्या झाडाचा निर्यास जखमेवर व सुजेवर लावल्यास लगेच फायदा होतो.

  • तसेच दंतरोगातही हा निर्यास लागण्याचा फायदा होतो.

  • स्त्रियांमध्ये अतिप्रमाणात अंगावरून पांढरा स्राव जात असला, पाळीच्या दिवसांत जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असला, दोन पाळ्यांमध्ये रक्तस्राव वा स्पॉटिंग होत असले तर वडाच्या सालीचा काढा घेतल्याचा फायदा होतो. एवढेच नव्हे तर या काढ्याचा योनीधावन करण्यासाठीही वापरता येतो.

  • नाकातून रक्तस्राव होत असल्यास वडाची साल व दूर्वा यांचा कल्क मधाबरोबर घेण्यास चरकाचार्यांनी सांगितलेले आहे.

  • स्वेदन गुणामुळे वडाची ताप कमी करण्यासही मदत होऊ शकते. तांदूळ शिजत असताना त्यात भरपूर पाणी व वडाची २-३ पाने घालावी, शिजल्यावर गाळून घेऊन सूपसदृश पेय रुग्णाने घेतल्यास घाम येऊन ताप उतरायला मदत मिळते.

  • वडाला जेव्हा नवीन पाने येतात त्या पालवीला वटांकूर म्हणतात. वटांकूर सुरुवातीला लाल रंगाचे असतात. हे शुक्रधातुवर्धक असून गर्भाशयाची ताकद वाढवतात. त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी वटांकूर उत्तम सांगितलेले आहेत. ताजे वटांकूर स्वच्छ धुवून वाटावे व या कल्काची एक छोटी गोळी तूप-साखरेबरोबर घेऊन वर दूध प्यावे. यामुळे गर्भधारणा व्हायला मदत होते. हा उपाय वैद्यांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर.

  • वरचेवर तोंड येत असल्यास वड व उंबराच्या सालीच्या काढ्याने चूळ भरण्याने व याचा कवल करण्यानेही फायदा मिळू शकतो.

  • वडाचे झाड अँटिऑक्सिडंट असते. याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारची पोषकद्रव्ये असतात. फ्लॅव्होनाइड्स, ग्लुकोसाइड्स्, फायटोस्टेरोनिन, लिग्निक ॲसिड वगैरेंसारखी महत्त्वाची घटकद्रव्ये या झाडात असतात.

  • वटपैर्णिमेचा उपवास करता आला नाही तरी या वृक्षाचे महत्त्व समजून घेऊन त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल जागरूक होणे आवश्यक आहे.

  • स्त्रियांच्या शरीरातील हॉर्मोन्सच्या संतुलनासाठी अशा प्रकारचे लंघन अर्थात उपवास अधून मधून करणे अत्यंत गरजेचे आहे. क्लिनिकमध्ये येऊन बऱ्याच स्त्रिया म्हणतात, ‘‘अहो डॉक्टर, आम्ही दोघे एकच जेवण जेवतो. यांच्या वजनात काहीच फरक पडत नाही, माझे वजन मात्र लगेच वाढते.’’ त्यामुळेच आपल्या परंपरांमध्ये स्त्रियांसाठी लंघन अर्थात उपवास याला महत्त्व दिलेले आहे.

लंघनाचे बरेच प्रकार असतात, यातील एक प्रकार आहे तहान व भुकेचा वेग थांबवून ठेवणे. वस्तुतः तहान, भूक थांबवून ठेवणे चुकीचे सांगितलेले आहे. पण शरीरात कुठेही कफ व पित्तदोषात विकृती असली, वातामुळे त्वचेचे रोग असले, लघवीच्या ठिकाणी सतत त्रास होत असला, वजन वाढत असले तर अशा वेळी लंघनचिकित्सेचा फायदा होतो असे सांगितलेले आहे.

त्यामुळे अधून मधून आपल्या शक्तीनुसार लंघन अर्थात उपवास केल्याने स्त्रियांमध्ये चयापचय क्रिया सुधारली जाऊ शकते. यालाच आजच्या काळात intermittent fasting म्हणतात, याचे चांगले फायदे अनुभवाला येतात तसेच याचे फायदे संशोधनातूनही सिद्ध झालेले आहेत. Intermittent fasting बद्दल अधिक माहितीसाठी मालविका तांबे यू-ट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पहावा.

आयुर्वेदानुसार उचित लंघन केल्यास पाचनाग्नी सुधारतो, चयापचय क्रिया सुधारते, आम कमी होतो, शरीरातील प्रवाहातील अडथळे व गतिरोध ( ब्लॉक्स) सुधारते, शरीराला लघुता प्राप्त होते, आरोग्यसंपन्नता वाढते, कुठलाही रोग सुरुवातीलाच थांबवता येऊ शकतो, पचनसंस्थेचे कार्य सुधारते, तसेच सगळ्या धातूंची शुद्धी होते.

अशा प्रकारे परंपरा, आयुर्वेदिक ज्ञान व आरोग्य यांचा परस्परसंबंध जाणून घेऊन नियम पाळल्याचा आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com