मृतांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालण्यास सुरवात केली. तसेच हॉस्पिटलमधील बेड आणि उपकरणांची तोडफोडही केली. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्स यांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला.
तिरुपती : आंध्र प्रदेशच्या तिरुपती येथे ऑक्सिजन अभावी ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजन टँकरला हॉस्पिटलला पोहोचण्यास काही मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे श्री वेंकटेश्वर रामनारायण रुइया सरकार हॉस्पिटलमध्ये सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी सदर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांपैकी ९ जण कोरोना पॉझिटिव्ह होते, तर ३ रुग्ण हे सामान्य रुग्ण होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनचा दाब कमी होऊ लागला. चेन्नईहून ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर वेळेत पोहोचला नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. परिणामी ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.
मृतांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालण्यास सुरवात केली. तसेच हॉस्पिटलमधील बेड आणि उपकरणांची तोडफोडही केली. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्स यांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली, अशी माहिती चित्तूरचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायणन यांनी दिली.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून ऑक्सिजनचा पुरवठा नियमित करण्यात आला आहे. हॉस्पिटलकडे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून ऑक्सिजनचे आणखी टँकर सकाळी पोहोचणार आहेत. ऑक्सिजनचा टँकर रात्री दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. हॉस्पिटलमध्ये कुठलीही तांत्रिक चूक नव्हती, असंही जिल्हाधिकारी हरी नारायणन यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. तिरुपतीमधील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये गेल्या २४ तासात १४ हजार ९८६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात १३ लाख २ हजार ५८९ कोरोना संक्रमित आढळून आले असून ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ लाख ८९ हजार ३६७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.