नवी दिल्ली - देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम असून अतिउष्णतेमुळे तीन महिन्यांत आतापर्यंत ११० जणांचा बळी गेला आहे. तसेच, या वर्षी एक मार्च ते १८ जून या कालावधीत ४० हजारहून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी गुरुवारी सांगितले.
राष्ट्रीय उष्मा-संबंधित आजार आणि मृत्यूचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे (एनसीडीसी) संकलित केलेल्या माहितीनुसार उष्णतेच्या लाटेचा फटका उत्तर प्रदेशला सर्वांत जास्त बसला असून तेथे ३८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
बिहार, राजस्थान आणि ओडिशातही उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यांकडून अंतिम माहिती आली नसल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
‘एनसीडीसी’च्या माहितीनुसार १८ जून रोजी एका दिवसात उष्माघाताने सहा जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर आणि पूर्व भारत महिनाभरापासून उष्णतेच्या लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत असल्याने अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने रुग्णालयांना दिले आहेत.
उष्णतेमुळे आजारी पडणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी विशेष उष्माघात विभाग सुरू करण्याचा आदेश आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या सर्व रुग्णालयांना दिला आहे. देशभरातील परिस्थिती आणि रुग्णालयांची सज्जता याचा आढावा घेताना नड्डा यांनी रुग्णालयांमधील तयारीची पाहणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे.
नड्डा यांच्या निर्देशानुसार, आरोग्य मंत्रालयाने ‘उष्णता लाट हंगाम २०२४’बद्दल राज्य आरोग्य विभागासाठी आरोग्य विभागाने मार्गदर्शिका जारी केली आहे. यानुसार उष्माघात आणि उन्हामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी एक मार्चपासून दररोज सादर करण्याची सूचना हवामान बदल आणि मानवी आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रम (एनपीसीसीएचएच) मोहिमेतील अधिकाऱ्यांना केली आहे. उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखडा सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अन्य सूचना
भारतीय हवामान केंद्राने दिलेला पुढील चार दिवसांचा उष्णतेच्या लाटेचा अंदाज आरोग्य केंद्रे आणि जनतेपर्यंत पोहोचवावा
ओआरएसची पुरेशी पाकिटे, आवश्यक औषधे, आइस पॅक आणि उपकरणे यांची खरेदी आणि पुरवठा व्यवस्थित ठेवणे
सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे
उपचार कक्ष आणि रुग्णांसाठीच्या प्रतीक्षा कक्षात वातानुकूलनाची सोय करणे
उष्माघाताचा संशय असलेल्या रुग्णांवर प्राधान्याने आणि तातडीने उपचार करणे
वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी रुग्णालयांनी वीज वितरण महामंडळाच्या संपर्कात राहणे
हरित छत,थंडाव्यासाठी खिडक्यांना आडोसा करणे
जलपुनर्भरण, सौरीकरण आदी सोयी करणे
उष्णता जास्त असलेल्या प्रदेशात आरोग्य केंद्राबाहेर सावलीसाठी उपाय करणे
भारतातील ६८ जणांचा हज यात्रेदरम्यान मृत्यू
रियाध - हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीय नागरिकांपैकी ६८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरेबियाच्या वतीने देण्यात आली. यापैकी बहुतांश जणांचा मृत्यू हा उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या आजारांनी झाला आहे. तर काही जणांचा मृत्यू अन्य कारणांनीही झाला असल्याचे सौदी अरेबियाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, हज यात्रेसाठी जगभरातून आलेल्या यात्रेकरूंपैकी सुमारे हजार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहितीही सौदी अरेबियाने गुरुवारी दिली. यातील बहुसंख्य जणांचा मृत्यू हा उष्णतेशी संबंधित आजार उद्भवल्याने झाला आहे.
दिल्लीत १७ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली - राजधानीत पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचलेला असून उष्णतेमुळे गेल्या २४ तासांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. राम मनोहर लोहिया (आरएमएल) आणि सफदरजंग रुग्णालयांत ही नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत जणू सूर्य आग ओकत आहे, अशी स्थिती आहे. आज सकाळी पावसाच्या सरी पडल्याने दिल्लीवासियांना किंचित दिलासा मिळाला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची आणि त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सफदरजंग रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उष्णतेमुळे आजारी असलेल्या ३३ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यातील १३ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. ‘आरएमएल’मध्ये दाखल झालेल्या २२ रुग्णांपैकी चारजणांचा मृत्यू झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.