वायनाड : केरळच्या निसर्गसुंदर वायनाड जिल्ह्यावर आज आभाळ फाटले. मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजता चार गावांत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने १२३ जणांचा गाढ झोपेत मृत्यू झाला, तर १२८ हून अधिक जखमी झाले. या भूस्खलनात ही चारही गावे ढिगाऱ्याखाली अक्षरश: गाडली गेली. घर, पूल, रस्ते आणि गाड्या वाहून गेल्या. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून शंभराहून अधिक जणांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी उद्या (ता. ३१) घटनास्थळाला भेट देणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सर्व शासकीय यंत्रणांना मदतीसाठी पाठविले असून घटनास्थळी अन्नधान्यांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुडक्कई, चुरलमला, अट्टमला आणि नूलपुझ्झा गावासाठी मंगळवारची पहाट भयानक ठरली. चार तासांत तीन वेळा मोठे भूस्खलन झाले. या गावांतील शेकडो घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. एकट्या चुरलमला गावातील दोनशे घरांची पडझड झाली. शेकडो नागरिक अजूनही दलदलीत अडकले आहेत. नदीवर तरंगणारे मृतदेह, तुटलेले पूल आणि वाहून गेलेले रस्ते असे भयावह चित्र आज सकाळी या गावात दिसत होते.
या घटनेची माहिती समजताच प्रशासनाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या. कन्नूरहून लष्कराची २२५ जणांची तुकडीही दाखल झाली. यात वैद्यकीय पथकाचा देखील समावेश आहे. शिवाय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर देखील बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आले. मात्र हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरला कोझिकोडला परत आले. पाच वर्षापूर्वी २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे याच गावात भूस्खलन झाले होते. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. पाच जणांचा शोध अद्याप लागला असून ५२ घरांची हानी झाली होती. मुंडक्कई गावाला भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसला असून या ठिकाणी बचाव पथक पोचण्याचा प्रयत्न करत आहे. एनडीआरएफचे पथक पायवाटाने गावी पोचत आहे. मुंडक्कई येथे अडीचशेहून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून या ठिकाणी असंख्य घर वाहून गेले आहेत. या गावात ६५ कुटुंब असून तेथील चहामळ्यात काम करणारे ३५ कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. जिल्हा पंचायत अध्यक्ष समशाद मरईक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडक्कईला रस्ते मार्गाने सध्यातरी मदत पोचवता येणार नाही. मोबाईल नेटवर्कही ठप्प पडले आहे. काहींना वाचण्यात यश आले आहे. यात दोन परकी नागरिकांचा समावेश आहे. ते एका घरात थांबले हेाते. या ठिकाणी बचाव पथक प्रत्येक ठिकाणची तपासणी करत आहे.
रेड ॲलर्ट जारी
हवामान खात्याने वायनाडव्यतिरिक्त कोझिकोड, मल्लपुरम, कासरगोड येथे रेड ॲलर्ट जारी केला आहे. पावसाची शक्यता असून त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोचण्यात अडचणी येऊ शकतात. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी वेथेरी, कलपट्टा, मेप्पादी आणि मनंतवडी येथील रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. तसेच कोझिकोड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळावर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय ग्रेनाईटच्या खाणी देखील तात्पुरत्या बंद केल्या आहेत. केरळच्या आरेाग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चूरलमला येथे जखमींवर उपचार करण्यासाठी मशिद आणि मदरसा येथे तात्पुरते रुग्णालय उभारले आहे.
ठळक घडामोडी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याशी मदतकार्याबाबत चर्चा. यानुसार २२५ हून अधिक जवान घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती दिली. यात वैद्यकीय पथकाचाही समावेश आहे.
केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने हवाई दल, नौदल आणि लष्कराला वायनाड येथे बचाव आणि मदतकार्यात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार वायनाडमधील लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत.
३४ जणांचे मृतदेह सापडले, १८ जणांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द
४५ छावण्यांत तीन हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतर केले.
मुडक्कई गावातील १५० जणांना लष्कराने सुरक्षित ठिकाणी नेले
भूस्खलन कशामुळे
वायनाड केरळच्या ईशान्यकडील भागात असून पठार असलेला तो एकमेव भाग आहे. जिओलॉजिकल केरळचा ४३ टक्के भाग हा भूस्खलनप्रवण आहे. वायनाडचा ५१ टक्के भूभाग पर्वतरांगाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता अधिक असते. वायनाडमध्ये काबिनी नदी असून तिची उपनदी शिखरावरून उगम पावते. भूस्खलनामुळे या नदीला पूर येतो.
पंतप्रधानांकडून मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्राकडून केरळला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.