देशातील हिजाब, मांस, मशिदींमध्ये अजान यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ध्रुवीकरणासाठी अन्न आणि धार्मिक श्रद्धांचा वापर केला जात असे सांगत एका संयुक्त निवेदनाद्वारे 13 विरोधी पक्षांच्या सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
या निवेदनाद्वारे अलीकडच्या काळात झालेल्या जातीय हिंसाचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच समाजातील सर्व घटकांना शांतता राखण्याचे आणि धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न करणाऱ्यांचे नापाक हेतू हाणून पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये, समाजात द्वेष पसरवण्याच्या आणि हिंसाचार भडकवण्याच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे मौन हे आश्चर्यचकित करणारे आहे, असे म्हटले आहे.
या पक्षांनी देशातील अनेक भागात जातीय हिंसाचार आणि द्वेषयुक्त भाषणाबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. समाजात ध्रुवीकरणाला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने खाण्याच्या सवयी, पेहराव (हिजाब), धार्मिक श्रद्धा, सण, भाषा यांचा वापर सत्ताधारी वर्गाकडून केला जात आहे, तो चिंताजनक आहे, असे म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन चिंताजनक असून ते अशा द्वेषपूर्ण वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात एक शब्दही उच्चारण्यात अपयशी ठरले आहेत, असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. अशा प्रकारचा हिंसाचार पसरवणाऱ्या लोकांचा किंवा संघटनांचा निषेध करण्यात आल्याचे पंतप्रानांच्या वक्तव्यात किंवा कृतीत असे काहीच दिसून येत नाही, यावरुन अशा खाजगी सशस्त्र संघटनांना सत्तेचे संरक्षण आहे हे उघड होतं असा आरोपही करण्यात आला आहे,
या पक्षांनी सामाजिक एकतेसाठी एकत्रितपणे काम करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. अशा द्वेषपूर्ण विचारसरणीचा सामना करण्यासाठी आणि लढण्यासाठी आम्ही एकजूट आहोत, ही विचारसरणी समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.
विशेष म्हणजे रामनवमीच्या दिवशी देशातील मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसारख्या अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उसळला होता. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्हा आणि गुजरातमधील खंभात येथे झालेल्या हिंसाचारानंतर शेकडो आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र योग्य कारवाई न करता सर्व आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवल्याची टीकाही होत आहे.
तसेच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मशिदींमधील भोंग्यांचा मुद्दा देखील तापला आहे. भाजप, मनसे सारखे पक्ष मशिदींवर लावलेल्या भोंग्यांना विरोध करत आहेत आणि त्याच्या निषेधार्थ भोंगेलावून हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. अलीगढ, वाराणसीसारख्या काही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भोंगे लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी, कर्नाटकपासून सुरू झालेल्या यूपीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देशात हिजाबचा मुद्दा गाजत राहीला होता. कर्नाटकातील मुलींना शाळांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली होती, न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला आहे. तरीही हिजाबवरून जातीय उन्माद आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.