``चीन पद्धतशीरपणे तिबेटी बौद्ध धर्म नष्ट करीत आहे. त्याच उद्देशाने त्यांनी तिबेटमधील पद्मसंभव बौद्धाचा पुतळा गेल्या मार्चमध्ये नष्ट केला,’’ असा आरोप तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी नुकत्याच बोधगया ला ‘दिलेल्या भेटीत केला.
त्या ही पुढे जाऊन ते म्हणाले, की डिसेंबर 2021 पासून चीनने केलेले बौद्ध मूर्तीचे हे तिसरे उध्वस्तीकरण होय. ``जानेवारी 2022 नंतर तिबेटमधील ड्रॅगो परगण्यामध्ये दुसरी मूर्ती नष्ट करण्यात आली.’’
ते म्हणाले, ``केवळ मूर्ती नष्ट केल्याने बौद्ध धर्म नष्ट होणार नाही. कारण, या धर्माचे असंख्य अनुयायी आज खुद्द चीनमध्ये आहेत.’’ परंतु या कृतीवरून चीनचे तिबेटमधील धर्म व त्यावर आधारलेली संस्कृती नष्ट करण्याचा डाव आहे.
बोध गयाच्या भेटीत त्यांनी तेथील कालचक्र मैदानाला भेट देऊन जगाला करोनामुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. दलाई लामा यांचा हा आरोप नवा नाही. चीनने तिबेटवर आक्रमण केले, तेव्हापासून तेथील बौद्ध धर्मियांचा छळ त्यांनी चालविला आहे.
काही वर्षापूर्वी मी चीन व तैवानच्या दौऱ्यानंतर धर्मशाला येथे जाऊन दलाई लामा यांची भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी तो आरोप केला होता. ते म्हणाले होते, की तिबेटमध्ये `बॉन’ बौद्ध धर्माचे पालन केले जाते.
तो नष्ट करण्याचे काम चीनने हाती घेतले आहे. त्याच प्रमाणे चीनच्या हान वंशाच्या (90 टक्के लोक चीनमध्ये त्या वंशाचे आहेत) लोकांचा जास्तीजास्त भरणा करून त्यांची लोकसंख्या वाढवून तिबेटी लोकांना अल्पसंख्य करण्याचे काम चालू आहे.
ते म्हणाले होते, की ज्या घरात माझी छायाचित्रे लावली आहेत, तेथे चीनी पोलीस व गुप्तचर अधिकारी जातात व ती छायाचित्रे नष्ट केली जातात. तिबेटी लोकांना जे सर्वात वंद्य आहेत, त्या दलाई लामा अथवा त्यांच्या अनुयायांचा लवलेशही तिबेटमध्ये ठेवायचा नाही, हे उद्दिष्ट ठेवून कारवाई केली जात आहे.
त्याचमुळे, असंख्य लोकांनी आत्मदहन करून घेतले आहे. चीनमध्ये असलेला बौद्ध मठही नष्ट करण्यात आला. दुसरीकडे चीनने तिबेटपर्यंत रेल्वे लाईन बांधल्याने चीनचे सैन्यही भारतीय सीमेपर्यंत आले आहे.
याच प्रकारचे धोरण चीनने इशान्ये कडील शिंजियांग प्रांतात आखले असून, तेथील उईघूर मुस्लिमांचे पद्धतशीरपणे चीनीकरण चालविले आहे. तेथील मुस्लिमांना दाढी ठेवणे, आपल्या मुलांची मुस्लिम नावे ठेवणे यास मनाई आहे.
काही वर्षांपूर्वी मी रशियाच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा तो सोव्हिएट रशिया होता. त्या काळात त्याच्याशी सल्ल्गन असलेल्या मुस्लिम बहुल आर्मेनिया, कझाखस्तान, ताजिकिस्तान, किरगिजिस्तान, अझरबैझान, किरगिजिस्तान आदी राज्यातही रशियाने रशियन भाषेची सक्ती करून त्यांच्या मुस्लिम चालीरिती, धर्म आदी बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आणला होता.
1991 नंतर सोव्हिएत रशियाचे विभाजन झाल्यावर हे प्रांत स्वतंत्र राष्ट्रे होऊन त्यांना आपापला धर्म राखण्यात यश आले. स्पेनवर शेकडो वर्षे राज्य करणाऱ्या मोगल राजेशाहीचे आता तेथे केवळ अवशेष उरले आहेत. स्पेनच्या एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांचे प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के उरले आहे.
तिबेट स्वतंत्र होता, तेव्हा तेथे `बॉन’ या बौद्ध धर्माचे पालन होत होते. याला `युंगद्रुंग बॉन’ असेही नाव आहे. इसवीसन आठव्या शतकात तिबेटमध्ये भारतातून बौद्धधर्माच्या चालीरिती, धर्मग्रंथ आदी जाण्यास सुरूवात झाली.
तिबेटपिडियानुसार, चिंघाय तिबेटमध्ये या धर्माचा प्रसार झाला. त्याला `बोनपो’ असेही नाव आहे. भारतातील हिमाचल प्रदेशातील ताशी मेनरी मठातही या धर्माचे पालन केले जाते. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती होण्यापूर्वी या धर्माचे पालन करणारे, बुद्ध भिख्खंना प्रशिक्षण देणारे सुमारे तीनशे मठ होते.
त्यापैकी आता केवळ बोटावर मोजण्याइतके उरले आहेत, असे तिबेटी अभ्यासकांचे म्हणणे आहे. दलाई लामा यांच्या मृत्यूची प्रतीक्षा चीन करीत आहे, याची कल्पना खुद्द दलाई लामा यांना ही आहे.
परंतु, त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याचा चीनने प्रयत्न केला, तरी तिबेट व जगातील तिबेटी जनता त्यांना स्वीकरणार नाही, हे ही तितकेच खरे. त्यामुळे चीन पंचन लामाची नेमणूक करो, की अन्य कुणाची त्याला औपचारिक मान्यता मिळणे कठीण.
दुसरीकडे बौद्ध धर्माचे आपण रक्षण करीत आहोत, असेही चीन जगाला, चीनला भेट देणाऱ्या पर्यटकांना दाखविण्याचा सतत प्रयत्न करीत असते. बीजिंग, शांघाय, ग्वांगझाव आदी शहरातून अनेक बौद्ध मंदिरे आहेत.
तेथे उदबत्यांचा जुडगा वाहणारे, अनेक चीनी कुटुंबे पाहावयास मिळतात. तसेच, चीनच्या चोंचिंग नजिक दाझू जिहल्यात एका टेकडीवरील बौद्ध लेणी जगातील पर्यटकांना दाखविण्याची खास सोय चीनी पर्यटन खात्याने केली आहे.
ती दाखवितांना चीनने बौद्ध धर्म व त्यांची लेणी कशी टिकवून ठेवली आहेत, हे अभिमानाने सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी चीनच्या दौऱ्यात आम्हाला ही लेणी दाखविण्यास नेण्यात आले होते. या लेण्यांना युनेस्कोने 1999 मध्ये जागतिक ठेव्याचा दर्जा दिला असून, ती अतिशय देखणी आहेत.
येथील `स्लीपिंग’ बुद्धाचे शिल्प अतिशय भव्य, तर पद्मासनावस्थेत ध्यानस्थ बसलेल्या अनेक बौद्धमूर्ती प्रेक्षकाला आकर्षून घेतात. हजारो वर्षापूर्वी शिल्पकारलेल्या या रंगीत लेण्या, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य. इसवीसनोत्तर 7 व्या शतकातील ही लेणी एक आश्चर्य होय. लेण्यांच्या शिल्पांवर बौद्ध, कॉन्फ्युशियनिझम व ताओईझम यांचा प्रभाव पाहावयास मिळतो.
दाझू येथील लेणी चोंचिग शहरापासून 165 कि.मी, अंतरावर असून, त्यात सुमारे पन्नास हजार मूर्ती व 75 संरक्षित स्थळे आहेत. त्यापैकी बेईशान, बौडिंगशान, नानशान, शिझुआनशान व शिमेनशान या उल्लेखनीय आहेत.
प्रश्न आहे, तो तिबेटमधील बौद्ध धर्माचे भवितव्य काय आहे, हा. त्याचे उत्तर सहज मिळणे शक्य नाही. 1950 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण करून राजधानी ल्हासा ताब्यात घेतली. त्यानंतर 72 वर्षे लोटली आहेत.
चीनने तिबेटमध्ये दमनचक्र चालवूनही तेथील व जगातील तिबेटी बौद्ध धर्म चीन पूर्णपणे संपुष्टात आणू शकलेला नाही, व तो पूर्णपणे नष्ट होऊ नये, यासाठी दलाई लामा यांचा आवाज त्यांच्या हाती कोणतेही शस्त्र नसताना चीनची झोप उडविणारा ठरत आहे. भारताने त्यांना दिलेला आश्रय आजही चीनच्या डोळ्यात खुपतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.