Sakal Relief Fund : ‘वायनाड’साठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून २५ लाख! समाजाला मदतीचे आवाहन

Kerala Wayanad Landslides: समाजाला मदतीचे आवाहन , आपत्तीग्रस्तांना आधार देण्यासाठी पुढाकार...केरळच्या वायनाडमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कुट्टमंगलम, आलाप्पुझा, केरळ : २०१८ मध्ये आलेल्या पुरात श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या पूरग्रस्त निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे सर्व सोयी-सुविधांयुक्त बांधण्यात आलेली दोन मजली शाळेची सुसज्ज इमारत.
कुट्टमंगलम, आलाप्पुझा, केरळ : २०१८ मध्ये आलेल्या पुरात श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या पूरग्रस्त निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे सर्व सोयी-सुविधांयुक्त बांधण्यात आलेली दोन मजली शाळेची सुसज्ज इमारत.sakal
Updated on

Kerala Wayanad Landslide Donation

पुणे : केरळच्या वायनाडमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून ‘सकाळ रिलीफ फंड’ सातत्याने सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य करत आहे. वायनाड येथील आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्थांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

वायनाड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुडक्कई, चुरलमला, अट्टमला व नूलपुझ्झा या चार गावांमध्ये ३० जुलैला पहाटे दोन वाजता मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यात चारही गावे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जवळपास २८१ वर पोहोचली आहे. तसेच १३० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, अडीचशेहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.

यापूर्वीही केरळसाठी मदत

केरळात २०१८ मध्ये आलेल्या पुरामुळे आलाप्पुझा जिल्ह्यातील दुर्गम अशा कुट्टमंगलम भागातील श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या १०० वर्षे जुन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. या शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’अंतर्गत जमा झालेल्या केरळ पूरग्रस्त निधीतून १ कोटी ३० लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. आज त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त दोन मजली शाळेची सुसज्ज इमारत निर्माण झाली आहे.

मदतीचे आवाहन

वायनाड जिल्ह्यातील प्रभावित चार गावांमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

मदत करण्यासाठी Kerala Wayanad Landslide how you can donate

१. सकाळ रिलीफ फंड

HDFC Bank

A/C No : 57500000427822

IFSC : HDFC0000103

Branch - FC Road , Pune.

या खात्यावर मदतीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता.

२. https://sakalrelieffund.com/ या संकेतस्थळावर जाऊन ‘डोनेट नाऊ’वर क्लिक करून आपली मदतीची रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व बँक ट्रान्सफरमार्फत पाठवू शकता.

३. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या सर्व आवृतीनिहाय कार्यालयात (रविवार वगळून) ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.

‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत सवलतीस पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

८६०५०१७३६६

लोकसहभागाच्या मदतीने ‘सकाळ रिलीफ फंड’चे कार्यSakal Relief Fund Projects

१. १९६१ मध्ये पानशेत धरणफुटीची दुर्घटना : १ लाख ५० हजार निधी जमा करून तातडीची मदत म्हणून दहा हजार लोकांना कपडे वाटप करण्यात आले.

२. १९७७ मध्ये आंध्र प्रदेशात चक्रीवादळ : तातडीची वैद्यकीय मदत म्हणून दोन लाख रुपये किमतीची औषधे पन्नास हजार लोकांसाठी पाठविण्यात आली होती.

३. १९९३ मध्ये मराठवाड्यात भूकंप : सहा हजार लोकांसाठी चार ठिकाणी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय १ कोटी २८ लाख रुपयांचा निधी संकलित करून प्रभावित सात गावांमधील शाळांचे नूतनीकरण, इमारत बांधकाम व मुला-मुलींसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले.

४. १९९९ कारगिल युद्ध : युद्धात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या पाच हजार भारतीय जवानांना १ कोटी १० लाख रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य व उपकरणांचे वाटप. याशिवाय पुणे, कोल्हापूर, अमरावती व रत्नागिरी या चार जिल्ह्यांमधील जवानांच्या मुलींसाठी २ कोटी ६० लाख रुपये खर्च करून वसतिगृहांची उभारणी करण्यात आली.

५. २००१ गुजरात भूकंप ः तातडीची मदत म्हणून १२ लाख रुपयांचा निधी जमा करून रक्त संकलन करण्यासाठी रुग्णवाहिका गुजरात राज्याला पाठविण्यात आली. याशिवाय ३ कोटी रुपये संकलित करून प्रभावित भागातील ७० शाळांचे नूतनीकरण, बांधकाम व एका वसतिगृहाची उभारणी करण्यात आली.

६. २०१४ माळीण दुर्घटना : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव डोंगरकडा कोसळून गाडले गेले होते. माळीण व आंबेगाव तालुका परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १ कोटी २५ लाख रुपये संकलित करून एका वसतिगृहाची उभारणी करण्यात आली. आजमितीस माळीण परिसरातील एकशे पंचवीसहून अधिक विद्यार्थी वसतिगृहाचा लाभ घेत आहेत.

७. २०१९ कोल्हापूर, सांगली महापूर : १ कोटी १८ लाख ८७ हजार रुपये संकलित करून तातडीची मदत म्हणून अन्नधान्य किट, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याशिवाय कोल्हापूर, सांगली भागातील ३९ शाळांना इमारत दुरुस्ती, शैक्षणिक व भौतिक साहित्य खरेदी, वर्गखोल्या बांधकाम व शाळांच्या नूतनीकरणासाठी मदतीच्या सात टप्प्यांत २ कोटी ४२ लाख २६ हजार रुपयांची मदत.

८. २०२३ इर्शाळवाडी दुर्घटना : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या आपत्तीग्रस्त ३१ शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.