बिहारमध्ये जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान विविध जिल्ह्यात स्नान करताना 43 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 37 मुले आणि 6 महिलांचा समावेश आहे. तसेच तीन जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने गुरुवारी ही माहिती दिली. बुधवारी उत्सवादरम्यान राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या. जीवितपुत्रिका उत्सवात महिला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास ठेवतात. यामध्ये नदी किंवा तलावात स्नान करून पूजा सुरू होते. यावेळी या घटना घडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नद्या आणि तलावांमध्ये आंघोळ करताना 37 मुले आणि 6 महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. सणाच्या वेळी बहुतेक जण पवित्र स्नानासाठी नदी किंवा तलावावर गेले. येथे झालेल्या अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार जितिया व्रत दरम्यान झालेल्या अपघातात 43 जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली असून, आतापर्यंत 8 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवान सतत शोध मोहीम राबवत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाईल, जी अशा प्रकरणांमध्ये भरपाईसाठी राज्य सरकारने मंजूर केली आहे. या अपघातामुळे जितिया उत्सव शोकसागरात बदलला आहे. औरंगाबादमध्ये सर्वाधिक लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. याशिवाय कैमूर जिल्ह्यातील भाबुआ आणि मोहनिया पोलीस ठाण्यातील सात मुलांचा दुर्गावती नदी आणि तलावात आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला.
पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कैमूर, बक्सर, सिवान, रोहतास, सारण, पाटणा, वैशाली, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, गोपालगंज आणि अरवालमध्ये जितिया सणावर बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके या परिसरात सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत.आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे की, कोणतीही आपत्ती उद्भवल्यास लोक हेल्पलाइन क्रमांक 0612-2294204 आणि टोल फ्री क्रमांक 1070 वर संपर्क साधू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.