नवी दिल्ली : भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा स्पेक्ट्रम लिलाव सोमवारी (ता. १) संपला. सात दिवसांच्या लिलावात (Auction) १.५ लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या 5G टेलिकॉम स्पेक्ट्रमची (5G Spectrum) विक्रमी विक्री झाली. लिलावात अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपनीने (Jio) सर्वाधिक बोली लावली. लिलावात एकूण १,५०,१७३ कोटींच्या बोली लावण्यात आल्या. (5G Spectrum Auction News)
हायस्पीड इंटरनेटसाठी ऑफर केलेल्या 5G स्पेक्ट्रमची (5G Spectrum) लिलाव रक्कम गेल्यावर्षी विकल्या गेलेल्या ७७,८१५ कोटींच्या ४G स्पेक्ट्रमच्या जवळपास दुप्पट आहे. २०१० मध्ये 3G लिलावात मिळालेल्या ५०,९६८.३७ कोटींच्या तुलनेत ही रक्कम तिप्पट आहे. 4Gच्या तुलनेत 5G मध्ये १० पट जास्त स्पीडने इंटरनेट सेवा उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. रिलायन्स जिओने 5G स्पेक्ट्रम रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी सर्वाधिक बोली लावली. त्यानंतर भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडचा क्रमांक लागतो.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अदानी समूहाने खाजगी दूरसंचार नेटवर्क उभारण्यासाठी २६ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतला आहे. मात्र, स्पेक्ट्रम कोणत्या कंपनीने विकत घेतला याचा तपशील लिलावाची आकडेवारी पूर्ण झाल्यानंतरच कळेल. सरकारने १० बँडमध्ये स्पेक्ट्रम ऑफर केले होते. परंतु, ६०० मेगाहर्ट्झ, ८०० मेगाहर्ट्झ आणि २,३०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये स्पेक्ट्रमसाठी कोणतीही बोली प्राप्त झाली नाही. सुमारे दोन तृतीयांश बोली 5G बँड (३,३०० MHz आणि २६ GHz) साठी होती. एक चतुर्थांपेक्षा जास्त मागणी ७०० MHz बँडमध्ये आली होती. हा बँड मागील दोन लिलावांमध्ये (Auction) (२०१६ आणि २०२१) विकला गेला होता.
गेल्यावर्षी झालेल्या लिलावात रिलायन्स जिओने (Jio) ५७,१२२.६५ कोटींचे स्पेक्ट्रम घेतले होते. भारती एअरटेलने (Airtel) सुमारे १८,६९९ कोटींची बोली लावली होती आणि व्होडाफोन आयडियाने १,९९३.४० कोटीचे स्पेक्ट्रम खरेदी केले होते. यावर्षी किमान ४.३ लाख कोटींच्या एकूण ७२ GHz रेडिओ लहरी बोलीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
राखीव किंमत वाजवी
5G लिलावावरून असे दिसून येते की मोबाइल उद्योगाचा विस्तार व्हायचा आहे. तो विकासाच्या टप्प्यात दाखल झाला आहे. स्पेक्ट्रमसाठी निश्चित केलेली राखीव किंमत वाजवी आहे. लिलावाच्या निकालावरून ते सिद्ध होते, असे लिलावाबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितले होते.
देशातील १३ प्रमुख शहरांत सेवा
लिलाव संपल्यानंतर मोबाईल कंपन्यांना त्यांच्या बोलीचे पैसे जमा करावे लागणार आहेत. यानंतर ज्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मिळाले आहे त्यांना एअरवेव्हचे सरकार वाटप करेल. यानंतर कंपन्या सेवा सुरू करतील. मोबाईल कंपन्या आधीच त्याची चाचणी घेत आहेत. तथापि, 5G सेवा देशात एकाच वेळी उपलब्ध होणार नाही. कारण, जिथे चाचणी झाली आहे तिथे ही सेवा सुरू होईल. या यादीत देशातील १३ प्रमुख शहरांची नावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.