वयाची साठ वर्ष पूर्ण झाली की आपल्याकडे कामावरून निवृत्ती घेतली जाते. यानंतर बरेच जण आपला वेळ छंद जोपासण्याकडे किंवा आपल्या नातवंडांसोबत घालवतो. पण वयाच्या ६३ व्या वर्षी अधुनिक पद्धतीने शेती व्यावसायाला सुरूवात करत त्यामधून चांगले पैसे देखील मिळवल्याची घटना आपण क्वचितच पाहातो. गृहिणी असलेल्या शुभा भटनागर या ६३ वर्षीय महिलेने स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर हे करून दाखवलं आहे.
शुभा भटनागर यांनी मे २०२३ रोजी आपल्या कुटुंबातील सदस्यांना बंद खोलीत केशर लागवड करून त्यामुधून जवळपासच्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देण्याबद्दलचं स्पव्न सांगितलं. विशेष म्हणजे त्यांच्या या कल्पनेला कुटुंबातील सदस्यांनी देखील लगेच पाठिंबा दिला. मग पुढे सुरू झाला वयाच्या ६३व्या वर्षी पहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे राहाणाऱ्या शुभा यांच्या घरात त्यांचा मुलगा आणि सून हे दोघे इंजिनीयर आहेत तर त्यांचे पती हे कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय करतात. आयुष्यभर गृहिणी म्हणून घरातली कामे करत राहिलेल्या शुभा यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील मोठी मदत केली.
काही आठवडे-महिने या कुटुंबात नेमकी बंद खोलीतील नियंत्रीत वातावरणात केशराची लागवड कशी करता येईल? आणि त्यांसाठी आवश्यक असे वातावरण कसे तयार केले जाऊ शकते? यावर चर्चा होत राहिली.
कारण खूप मौल्यवान असलेले केशर हे फक्त काश्मीरमध्ये लावले जाते. तेथील विशिष्ट प्रकारची माती आणि वातावरण त्यासाठी पोषक मानले जाते. पण प्रयत्नामागून प्रयत्न करत शुभा यांनी काश्मीरसारखं वातावरण त्यांच्या मैनपुरी येथील कोल्ड स्टोरेजच्या खोलीत तयार केले.
यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी अस्सल केसर बल्ब मागवल्या आणि कोल्ड स्टोरेज चेंबरमध्ये त्यांची २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात लागवड केली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात त्यांना पहिलं पीक मिळालं.
'शुभावनी स्मार्टफार्म'स नावाने सुरू केलेल्या या व्यावसायात त्यांनी उगवलेल्या पहिले दोन किलो केसराची त्यांनी या वर्षीच्या सुरूवातीला मार्केटमध्ये विक्री केली. आतापर्यंत त्यांनी आठ लाख रुपयांहून जास्तीचे केसर विक्री केले आहे. इतकेच नाही तर त्यांच्या या व्यवसायामुळे २५ इतर महिलांना रोजगार देखील मिळाला.
शुभा यांनी हिंदीमधून एमए केल्यानंतर शुभा यांचं लग्न झालं आणि त्या मैनपुरी येथे स्थायिक झाल्या. पुढची वयाची ४० वर्ष त्यांनी आपल्या संसारासाठी आणि मुलांची काळजी घेण्यात घालवली.
पण गेल्या काही वर्षांपासून आपण काहीतरी व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटू लागले. मला माझ्याकडे असलेल्या वेळेचा काहीतरी सदउपयोग करायचा होता. मी तंदरुस्त असल्याने मी शाररीक श्रम देखील करू शकत होते. या वळणावर मला आयुष्याला काहीतर अर्थ द्यायचा होता, असेही शुभा यांनी 'बेटर इंडिया'ला बोलताना सांगितले.
केशर लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर शुभा यांचे कुटुंब काश्मीरला गेले, येथे त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि लागवडीची प्रक्रिया शिकून घेतली. यासोबतच काय करावे आणि काय करू नये याबद्दल स्थानिकांकडून योग्य मार्गदर्शन मिळवलं. याकाळात २५ ते ३० काश्मीरी शेतकऱ्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरहून परत आल्यानंतर शुभा यांनी ५६० स्केअर फूट कोल्ड स्टोरेज उभारलं आणि २००० किलो केशर बल्ब लागवडीपासून सुरूवात केली. आता शुभा या कामातून लाखो रुपये कमवत आहेत सोबतच त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना रोजकार देखील मिळवून दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.