पुणे : भारतीय हवाई दलाला आता नवा ‘लढाऊ (कॉम्बॅट) गणवेश देण्यात आला आहे. नवीन गणवेश शत्रूला चकमा देण्याबरोबर वाळवंट, बर्फाळ आणि डोंगराळ भागात हवाईदलातील योद्धांचे संरक्षण कवचही ठरेल. हवाई दलाच्या ९०व्या हवाईदल दिनानिमित्त चंडीगड येथील एअरफोर्स स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी या नवीन लढाऊ गणवेशाचे अनावरण केले.
युद्धाचे बदलते स्वरूप, संरक्षणाच्या वाढत्या जबाबदाऱ्या तसेच लष्करी कारवायांना योग्यरीत्या पार पाडण्यासाठी लढाऊ गणवेशात हे बदल करण्यात आले आहेत. नवीन गणवेश विविध कामांदरम्यान तसेच मोठ्या काळातील प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त व किफायतशीर ठरणार आहे.
चंडीगड येथे झालेल्या कार्यक्रमात हवाईदलाचे विंग कमांडर कुणाल खन्ना आणि त्यांच्या चमूने हवाईदल दिनाच्या संचलनादरम्यान या नवीन लढाऊ गणवेशाला परिधान केले होते. हा गणवेश वजनाच्या दृष्टीने अतिशय हलका असून प्रथमच या गणवेशासोबत मॅचिंग ‘टी-शर्ट’ देखील तयार करण्यात आले आहे. तसेच या गणवेशाला उपयुक्त ठरेल असे पदवेश (बूट) देखील नव्याने तयार करण्यात आले आहे. सध्या भारतीय हवाई दलात नवीन गणवेश पद्धतीची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू झाले आहे.
लगेच निघणार गणवेशावरील ‘टॅग’
नवीन लढाऊ गणवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे हवाईदलाचा जवान शत्रूच्या हद्दीत गेल्यास त्या जवानाला गणवेशातील सर्व ‘टॅग’ लगेच काढणे शक्य होईल. अत्यंत हलक्या वजनाचे हे टॅग असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची खरी ओळख (नाव व इतर बाबी) शत्रूला कळणार नाही. त्याचबरोबर गणवेशासह पदवेशाचे (बूट) वजन ही हलके ठेवण्यात आले आहे.
वीस दिवसांत डिझाईन तयार
हवाईदलाच्या नवीन लढाऊ गणवेशाची रूपरेषा याबाबत हवाई दलाच्या स्थायी समितीद्वारे अनेक विचार आणि प्रयत्न करण्यात आले. इतर जवानांच्या नवीन गणवेशाच्या पॅटर्नचाही अभ्यास करण्यात आला. त्यानंतर हवाईदलाने नवीन गणवेशाची डिझाईन तयार करण्यासाठी सुमारे २० दिवस लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.