नवी दिल्ली : अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगात एकमेव सदस्य उरला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्तांच्या नेमणुकीसाठी येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. तत्पूर्वी अरुण गोयल यांनी आयुक्तपदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे आता आयोगात आयुक्तपदाची दोन पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी येत्या १५ तारखेला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक होऊ शकते. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी हेही या निवड समितीत आहेत.
येत्या तीन दिवसांत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे राज्यांचे दौरे पूर्ण होणार आहेत. दौरे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. मात्र तत्पूर्वी नवीन निवडणूक आयुक्त नेमणे सरकारसाठी क्रमप्राप्त आहे. एप्रिल-मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू होईल. आयुक्तपदाचा राजीनामा दिलेल्या गोयल यांची नेमणूक वादग्रस्त ठरली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नेमणुकीवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. २०१७ मध्ये गोयल यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र कोणतेही कारण न देता त्यांनी गेल्या शनिवारी राजीनामा दिला. विशेष म्हणजे त्यांचा हा राजीनामा राष्ट्रपतींनी तातडीने मंजूरही केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.