नवी दिल्ली - आम आदमी पक्षाला २०१४ ते २०२२ या कालावधीत विदेशातून सात कोटी आठ लाख रुपयांचा निधी मिळाला असून हा निधी विदेशी देणगी नियामक कायद्याचा (एफसीआरए), लोकप्रतिनिधी कायदा व भारतीय दंड संहितेचा (आयपीसी) भंग झाल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे.
‘ईडी’च्या दाव्यानुसार, ‘आप’ला हा निधी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि ओमान या देशांमधून मिळाला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये ‘आप’ने अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कॅनडामध्ये २०१६ मध्ये निधी उभारणीसाठी केलेल्या कार्यक्रमाचा समावेश आहे. हा निधी उभारण्यासाठी ‘आप’चे आमदार दुर्गेश पाठक यांनी पुढाकार घेतला होता.
‘ओव्हरसीज आप इंडिया’चे प्रमुख अनिकेत सक्सेना यांनी पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. ‘एफसीआरए’च्या कायद्यातून पळवाट काढण्यासाठी ‘आप’ने बराच निधी बेनामी नावाने गोळा केल्याचे तपासात उघड झाल्याचा दावाही ‘ईडी’ने केला आहे. अनेक वर्गणीदारांचे ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व क्रेडीट कार्डसुद्धा एकसारखेच असल्याचे तपासात दिसून आल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.
कॅनडातील एका नागरिकाने ‘आप’ला ५१ लाख रुपये दिले आहेत. यामुळे ‘एफसीआरए’ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. परदेशातून देणगी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. यात देणगी देणाऱ्यांची ओळखही लपविल्याचा आरोप केला जात आहे.
निधीसाठी लक्ष्य ठरवून दिले
‘ईडी’ने केलेल्या दाव्यानुसार, ‘आप ओव्हरसिज इंडिया’ या नावाने वर्गणी गोळा करण्यासाठी काही स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती. यांच्याकडून प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलिया देशातून देणगी गोळा करण्यात आली आहे. या स्वयंसेवकांना ५० कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य दिले होते. निधी उभारण्यासाठी ‘आप ओव्हरसिज इंडिया’चे अनिकेत सक्सेना व ‘आप’चे तत्कालीन समन्वयक कुमार विश्वास यांच्या ईमेलच्या माध्यमातून संवाद साधला गेला.
केजरीवाल यांना ठार मारण्याची धमकी; सुरक्षेवरून आप नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल
दिल्लीतील राजीव चौक व पटेल चौक या मेट्रो स्टेशनमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठार मारण्याची धमकी देणारा मजकूर आढळला आहे. यावरून आपच्या नेत्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्री केजरीवाल यांना ठार मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप ‘आप’च्या नेत्यांनी केला आहे.
सोमवारी दिल्लीतील वर्दळीच्या कॅनॉट प्लेसमधील राजीव चौक मेट्रो स्टेशन व तेथून जवळच असलेल्या ल्यूटन्स झोनमधील पटेल चौक मेट्रो स्टेशनमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांन ठार मारण्याचा इंग्रजीतील मजकूर आढळून आला आहे. हाच मजकूर आरोपींनी सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे. मेट्रो स्टेशनमध्ये सीआयपीएफची सुरक्षा असताना धमकीचा मजकूर कसा लिहिला गेला, असा सवाल दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी उपस्थित केला आहे.
खासदार स्वाती मालिवाल प्रकरणातून काहीही हाती न लागल्याने भाजपने आता केजरीवाल यांना जिवे मारण्याच्या धमक्यांचे सत्र सुरू केले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचा आम्ही आरोप करीत आहोत. आज आढळून आलेल्या धमक्यांनी या आरोपांची पुष्टी झाल्याचा दावा आतिशी मार्लेना यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मुख्यमंत्र्यांच्या घरातील व्हीडिओ समोर आल्यानंतर मालिवाल प्रकरणातील हवा निघून गेली आहे. केजरीवाल यांच्या विरोधात एका खोट्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन देऊन भाजपच्या साऱ्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.
या सर्व योजना अयशस्वी झाल्यानंतर आता धमक्या देऊन मुख्यमंत्र्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. मालिवाल यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्परता दाखविणारे दिल्ली पोलिस मात्र मूग गिळून असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.