नवी दिल्ली : दिल्लीत नागरी सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांचे (कोचिंग क्लासेस) केंद्र असलेल्या जुन्या राजेंद्र नगर भागातील राऊज आयएएस स्टडी सेंटरमध्ये तळघरातील ग्रंथालयामध्ये पाणी साचल्याने दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी करोलबाग मेट्रोस्टेशन भागात निदर्शन केली. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि विरोधी पक्ष भाजप व काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दिल्लीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या राजेंद्र नगर भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच भागात असलेल्या राऊज आयएएस स्टडी सेंटरच्या तळघरात असलेल्या ग्रंथालयामध्येही पाणी शिरणे सुरू झाले. त्यामुळे तेथे अभ्यास करत असलेले विद्यार्थी अडकून पडले. काही मिनिटातच तब्बल बारा फुटापर्यंत पाहणी साचल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही. यामुळे उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या या दोन विद्यार्थिनी तसेच केरळमधील नेविन डॅल्विन या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएचडी करणारा नेविन हा राजेंद्र नगर भागामध्ये आठ महिन्यांपासून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता.
अन् बायोमॅट्रिक बंद पडले
राऊज आयएएस स्टडी सेंटरचे ग्रंथालय दर शनिवारी सायंकाळी बंद असते. परंतु काल सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने बहुतांश विद्यार्थी बाहेर पडण्याऐवजी ग्रंथालयातच बसून होते. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने येथील रस्त्यावर पाणी साचले आणि ग्रंथालयात पाणी शिरले. ग्रंथालयाच्या शेजारील कूपनलिका फुटल्याचा काही जणांकडून व्यक्त केला जात आहे. ग्रंथालयाचे दार हे बायोमॅट्रिक पद्धतीने अर्थात विद्यार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठशांनी उघडते मात्र पाणी शिरल्याने बायोमॅट्रिक यंत्रणा बंद पडली आणि विद्यार्थ्यांना बाहेर पडणे अवघड झाले, असा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी ग्रंथालयात ३० ते ३५ विद्यार्थी होते असे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढले. काहींना बाहेर काढण्यासाठी दोरीही लावली होती. मात्र यात तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यात अपयश आले. या भागातील काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
दिल्ली सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपालसिंह यांना अटक केली आहे. दिल्ली महापालिकेने शहरात तळघरात सुरू असलेल्या सर्व शिकवणी वर्गांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
या दुर्घटनेमुळे दिल्लीतील शिकवणी वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या भागातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी करोलबाग मेट्रोस्टेशन परिसरात एकत्र आले होते. तेथेच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. हा अपघात नव्हे तर निष्काळजीपणामुळे घडलेली दुर्घटना असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
राजकीय आरोपप्रत्यारोप
या दुर्घटनेनंतर सत्ताधारी आप, विरोधी पक्ष भाजप व काँग्रेस यांच्यात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्लीतील आप सरकारवर नाराज असलेल्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट द्वारे ‘विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची’, असा सवाल केला. तसेच नाराज विद्यार्थ्यांना भेटून त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र या विद्यार्थ्यांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. तत्पूर्वी, दिल्लीच्या मुख्यसचिवांना या घटनेची चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
असल्याचे आप सरकारच्या मंत्री आतिशी यांनी समाज माध्यमातून सांगितले आहे. . दिल्लीतील गटारांची साफसफाई न केल्यामुळे तळघरात पाणी साचल्याचा दावा दिल्लीतील भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी केला. ‘‘येथील नागरिकांकडून आठवडाभरापासून मागणी याबाबत सुरू होती, मात्र ‘आप’ आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप बांसुरी स्वराज यांनी केला.
पायाभूत सुविधांचा ऱ्हास झाला असून असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नगर नियोजन आणि संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक चुकवत आहेत.
-राहुल गांधी,
लोकसभेतील विरोधी पक्षनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.