Manipur Violence : प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल केल्यास कारवाई; मणिपूर सरकारचा निर्णय

मणिपूरमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून यासंदर्भात अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे.
Manipur
Manipursakal
Updated on

इंफाळ - मणिपूरमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून यासंदर्भात अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे. त्यामुळे हिंसाचाराचे आणि मालमत्तेची हानी करणारे व्हिडिओ व्हायरल करू नये, अशी आज सरकारने तंबी दिली आहे.

समाजात अस्थिरता पसरविणारे व्हिडिओ व्हायरल केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मणिपूरच्या हिंसाचाराबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच दोन मैतेई युवकांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर कुकी भाषा बोलणाऱ्या एका गटाकडून त्याचा दफनविधी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवाय महिलांना विवस्त्र फिरविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.

अशा घटनांना चाप बसण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली असून वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याचे ठरविले आहे. मणिपूरच्या गृहविभागाने दिलेल्या आदेशात म्हटले, सध्याच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर यापुढे राज्यात वादग्रस्त, आक्षेपार्ह चिथावणीखोर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होऊ नये यासाठी कडक कारवाईचा निर्णय घेतला.

नागरिकांनी मोबाईलमध्ये वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओ बाळगू नयेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्याही वेळी तपासणी करून अशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो ताब्यात घेऊ शकतात. तसेच एखाद्याने सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर शिक्षा दिली जाईल आणि त्यावर आयटी कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

राज्यातील स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वादग्रस्त व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होऊ नयेत याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात इंफाल खोऱ्यात दोन बेपत्ता युवकांच्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मणिपूरची सुव्यवस्था पुन्हा बिघडली. आंदोलकांनी निदर्शने करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सुरक्षा दलांनी केलेल्या लाठीमारात अनेक जखमी झाले होते.

पूर्व इंफाळमध्ये दोन गटांत गोळीबार

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये शांतता असताना आज पहाटे पुन्हा दोन गटांत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. गोळीबाराची घटना पूर्व इंफाळ आणि उखरुल जिल्ह्याच्या सीमाभागात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळविल्याचे सांगितले जात आहे.

आज पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास संशयित मैतेई सशस्त्र समाजकंटकांनी आणि कुकीचे सशस्त्र समुदायात गोळीबार सुरू झाला. यावेळी वीस ते तीस फैरीचे आवाज ऐकू आले. सकाळच्या वेळी गोळीबार थांबला. मात्र त्यानंतर पुन्हा नऊच्या सुमारास संशयित मैतेई सशस्त्र गुंड आणि कुकी सशस्त्र गुंडांत गोळीबार सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.