वायनाड : भूस्खलनामुळे शेकडो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले तर असंख्य वाहून गेले. अनेकांनी प्रसंगावधान राखून पोलिस अधिकारी, बचाव पथकाला फोन केले खरे, मात्र सर्वानांच सुरक्षित ठिकाणी जाता आले नाही. एका पोलिस अधिकाऱ्याने दोन पर्यटकांना वाचविल्यानंतर अन्य लोकांच्या मदतीसाठी ते पुढे सरकले, परंतु पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की त्यांना डोळ्यादेखत वाहून जाणारे लोक पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान, वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी भूस्खलनातील बेपत्ता लोकांच्या शोधार्थ दहा दिवसांपासून अथक मोहीम सुरू असताना आज लष्कराने अंशत: माघारी जाण्याचा निर्णय घेतला. पीडब्लूडी खात्याचे मंत्री पी. मोहंमद रियास यांनी काही प्रमाणात लष्कर माघार घेत असल्याची घोषणा केली.
वायनाडच्या भूस्खलनाला आठवडा लोटला असून त्यात असंख्य लोकांचा जीव गेला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. मात्र त्या भीषण रात्रीची आठवण आजही मेप्पादी पोलिस ठाण्याचे एक पोलिस अधिकाऱ्यास त्रास देत आहे. चुरलमला भागातील विनाशकारी भूस्खलनात जीव वाचविताना अपुऱ्या पडलेल्या मदतीची आठवण वेदनादायी ठरत असल्याचे ते म्हणतात. पोलिस अधिकारी जिबलू रेहमान यांनी भूस्खलनानंतर तातडीने कारवाई करत ओडिशाच्या दोन पर्यटकांना ढिगाऱ्याखालून वाचविले होते. त्या दिवशी रेहमान घटनास्थळी पोचले तेव्हा वाचवलेल्या लोकांपैकी एकाचा हात पाय मोडला होता, तर दुसऱ्याचे कपडे फाटलेले होते. ते मदतीसाठी आकांत करत होते.
त्यांनी मला आणखी दोन लोक वर अडकल्याचे सांगितले. मी त्यांना टी शर्ट आणि कोट दिला. तेथे तातडीने आलेल्या स्थानिक तरुणांकडे त्यांना सोपविले. नंतर मी दोघांच्या शोधार्थ वर गेलो. वरच्या दिशेने गेलो असताना तेथे मोठा आवाज ऐकू आला. मोठे भूस्खलन झाल्याचे माझ्या लक्षात आले. पण तेथे जाता येत नसल्याने सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मला आणखी वरच्या भागाकडे जावे लागले. तेव्हा पाणी वाहत होते आणि त्यात झाडे, चिखल होते. अनेक जणांना डोळ्यादेखत ढिगाऱ्यासह वाहताना पाहिले. परंतु त्यांना वाचविण्यासाठी काहीच करता येत नव्हते. आपण हतबल झालो होतो असे रेहमान म्हणतात. यादरम्यान तेथे अगोदरच वनखात्याचे गस्तीपथक आलेले होते. ते हत्तींना निवास क्षेत्रात घुसण्यासंदर्भात सूचना देण्याचे काम करत होते. मेप्पादी उप वन खात्याचे अधिकारी के. प्रदीप म्हणाले, स्थानिकांचा फोन आल्यानंतर आमचे पथक घटनास्थळी पोचले. आम्ही हत्तींना जंगलात सोडण्यासाठी तेथे गेलो. परंतु नदीची पातळी वाढत असल्याचे पाहून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. आम्ही जेव्हा परतत होतो, तेव्हा मोठा आवाज आला. तेव्हा ते पहिले भूस्खलन झाले. नागरिक सैरावैरा पळू लागले. ते पाहून आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सर्च लाइट आणि वाहनांची हेडलाईट सुरू ठेवली. वन खात्याच्या पथकाने ४५ पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले. बचाव कार्य सुरू होते. त्याचेवळी आणखी एक मोठा आवाज आला, अशी आठवण प्रदीप यांनी सांगितली.
मदतकार्याचा दहावा दिवस
वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनातील मदतकार्याचा आज दहावा दिवस होता. आज पुन्हा सनराईज व्हॅलीत बेपत्ता लोकांसाठी शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी श्वान पथकही सामील करण्यात आले. चुरलमला, मुंडक्कई, समलीमट्टममध्ये नियमित शोध मोहीम सुरूच राहणार आहे. भूस्खलनानंतर १६ मदत छावण्यात १९६८ नागरिक राहत आहेत. पण त्यांना आता स्थानांतरित केले जाणार असून त्यांच्यासाठी भाड्याने फ्लॅट, घर शोधण्याचे काम सुरू झाले आहे.त्याचे भाडे केरळ सरकारकडून दिले जाणार आहे. सध्या अनेक शाळांत नागरिक राहत आहेत. परंतु शाळा सुरू करण्यासाठी त्यांना अन्य ठिकाणी नेणे गरजेचे आहे. पुनर्वसनाच्या दुसऱ्या टप्प्यात भाड्याच्या घरातून त्यांना नव्याने निर्माण होणाऱ्या नागरी वसाहतीत कायमस्वरूपी नेण्यासाठी कार्यवाही सुरू होईल, असे केरळ सरकारने सांगितले. यादरम्यान, केरळ सरकारने बेपत्ता १३८ जणांची यादी जारी केली आहे. लष्कर आणि आपत्कालीन विभागाला चेलियार नदी आणि परिसरात ७ ऑगस्टपर्यतच्या शोध कार्यात १९२ अवयव सापडले.
दुर्गम भागात लष्कर काम करणार
वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पीडब्लूडी खात्याचे मंत्री रियास यांनी लष्कर माघारीबाबत माहिती दिली. भूस्खलनानंतर लष्कराने वायनाड जिल्ह्यातील चार गावांत राबविलेल्या शोध मोहिमेचे नेतृत्व केले आणि राज्यातील अन्य भागांशी तुटलेला संपर्क जोडण्यासाठी एक पूल देखील तयार केला. रियास यांनी वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागातील शोधकार्य पूर्ण झाल्याचे सांगितले. लष्कराने मुंडक्कई ते चुरलमला भागाला जोडणारा १९० फूट लांबीचा बेली पूल विक्रमी वेळेत तयार केल्याने तपास आणि शोधकार्याला वेग आला. तसेच जखमींना तातडीने औषधोपचार करण्यास मदत मिळाली. लष्कराच्या अतुलनीय मदतीबद्धल त्यांनी लष्कराचे आभार मानले. भूस्खलनामुळे या भागांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता, परंतु पुलामुळे मदतकार्य लवकर शक्य झाले. आता या भागातून लष्कराने परत जाणे क्लेषदायक आहे. आम्ही गेल्या दहा दिवसांपासून एकत्र काम केले आहे. संकटकाळात लष्कर धावून आले आणि त्यामुळे त्यांना निरोप देताना मन भरून आले आहे. परंतु त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले आहे. त्यांच्यावर अन्यही जबाबदाऱ्या आहेत आणि त्याची सर्वांनाच जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या सेवाकार्याबद्धल आभार मानतो.पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागातून संपूर्णपणे लष्कर काढून घेतले जात नसून बेली ब्रिजच्या देखभालीसाठी आणि चलियार नदीच्या घनदाट जंगलातील दुर्गम भागातील शोध मोहिमेच्या तपासासाठी एक लहान तुकडी या भागात तैनात असेल. आम्ही जरी जात असलो तरी आमचे हृदय हे प्रामुख्याने केरळ, वायनाड आणि मेप्पादी लोकांजवळ आहे. आम्ही मंत्री, स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.