गेल्या काही दिवसांपासून कन्नड संघटनांचा धुडगूस वाढला आहे. विविध दुकानदारांना लक्ष्य करत वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बेळगाव : दुकाने व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या पाट्यांवर कन्नड भाषेतून ६० टक्के जागेत मजकूर लिहा, असे सांगत बुधवारी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागांत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. विविध गल्लीमध्ये जाऊन कन्नड फलक (Kannada Board) लावण्याबाबत दडपशाही केली जात असताना पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांच्या (Karnataka Police) भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका आणि प्रशासनाकडून सातत्याने विविध प्रकारे शहर आणि परिसरात कन्नडसक्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच दुकानांवरही कन्नड फलक लावा, असे सांगत व्यावसायिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कन्नड संघटना (Kannada Association) कायदा हातात घेत व्यावसायिक व दुकानदारांना नाहक त्रास देत आहेत.
कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी शनिवार खूट, काकतीवेस, बापट गल्ली आदी भागांत जाऊन दुकानदारांना लवकर कन्नड भाषेतील फलक लावा, तसेच फलक लावताना कन्नड भाषेतील मजकूर ६० टक्के जागेवर असावा, त्यानंतर इतर भाषेतील मजकूर असावा, अन्यथा दुकानासमोर येऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. कन्नड संघटनांचे कार्यकर्ते दादागिरी करत असताना त्यांच्यासोबत पोलिसही होते. व्यापाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारत शहराची शांतता भंग होऊ नये, याकडे लक्ष द्या, अशी मागणी केली.
बेळगाव शहर आणि परिसरात मराठी भाषिक बहुसंख्य आहेत. तसेच व्यापार आणि इतर कामासाठी पश्चिम महाराष्ट्र व गोव्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांना योग्यप्रकारे माहिती मिळावी, यासाठी मराठी, कन्नड व इंग्रजी भाषेतून फलक लावले जातात. त्यामुळे फलकांबाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची अडचण नाही. तरीही कन्नड संघटना दुकानदारांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मोजक्याच भागात जाऊन दडपशाही सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून कन्नड संघटनांचा धुडगूस वाढला आहे. विविध दुकानदारांना लक्ष्य करत वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने कन्नड संघटनांना समज देणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनेही याबाबत आवाज उठवणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
कन्नड रक्षण वेदिके (करवे) च्या टी. ए. नारायण गौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी लव्हेले रोड आणि युबी सिटी परिसरात कार्यकर्त्यांनी दगडफेक करत इंग्रजी पाट्यांना काळे फासले. खबरदारी म्हणून कब्बन पार्क पोलिसांनी ‘करवे’च्या डझनभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांनी मॉल ऑफ एशिया मालकाला पाट्यांवर ६० टक्के जागेत कन्नड अक्षरे कोरण्याच्या नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला. केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडजवळील सदहळ्ळी गेटपासून कब्बन पार्कपर्यंत रॅली काढली. ब्रिगेड रोड, एमजी रोड आणि इतर भागांतून मालकांना कन्नड पाट्या लावण्यासाठी घोषणा देत कार्यकर्त्याने रॅली काढली. दरम्यान, पोलिसांनी गौडा आणि राज्य सचिव सन्ना इराप्पा यांना देवनहळ्ळी टोलगेटजवळ ताब्यात घेतले. तत्पूर्वी, ब्रृहन् बंगळूर महानगरपालिके (बीबीएमपी) मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ यांनी विभागीय आयुक्तांना १५ दिवसांत सर्वेक्षण करून कन्नड पाट्यांच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. तसेच नियम न पाळणाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याचे निर्देशही दिले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.