हरितक्रांतीचे प्रणेते कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन

‘भारताच्या हरितक्रांतीचे जनक’ अशी ओळख असलेल्या एम. एस. स्वामिनाथन यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
Agronomist ms swaminathan
Agronomist ms swaminathansakal
Updated on

‘भारताच्या हरितक्रांतीचे जनक’ अशी ओळख असलेल्या एम. एस. स्वामिनाथन यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. भारतातील कमी उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी समर्पित केले. जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी त्यांनी वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ म्हणून संशोधन केले. १९६० च्या दशकात अमेरिकेच्या गव्हावर अवलंबून असलेला भारताला त्यांनी अन्नधान्यात स्वयंपूर्ण तर बनविलेच शिवाय अतिरिक्त साठाही केला गेला. तत्कालीन कृषी मंत्री सी. सुब्रह्मण्यम आणि जगजीवनराम यांच्याबरोबर काम करून डॉ.स्वामिनाथन यांनी हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण केले.

स्वामिनाथन यांचा जन्म कुंभकोणम येथे ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला होता. डॉ.एम.के सांबशिवन आणि पार्वती थंगाम्मा असे त्यांच्या आईवडिलांचे नाव होते. त्यांचे मूळ नाव मानकोंबू सांबशिवन स्वामिनाथन असे होते. मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये ते ‘एमएस’ या टोपण नावाने ओळखले जात असत. स्वामिनाथन ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मोठ्या भावाने त्यांचा सांभाळ केला.

स्वामिनाथन यांनी वैद्यकीय अभ्यास करावा, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती; पण त्यांनी प्राणी विज्ञान शाखेची निवड केली. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी १९४३ मध्ये बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. यामुळे स्वामिनाथन अस्वस्थ झाले होते. नंतर त्यांनी १९४४ मध्ये मद्रास कृषी विद्यापीठातून कृषीशास्त्र विषयात पदवी घेतली होती.

शिक्षण -संशोधन

आनुवंशिकता आणि वनस्पती प्रजननाचा अभ्यास करण्यासाठी १९४७ मध्ये ते दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संशोधन संस्थेत गेले होते. त्यांनी १९४९ मध्ये गुणसूत्रातील बदलावर पदव्युत्तर पदवी मिळविली. स्वामिनाथन यांनी नेदरलँड्सच्या वॅजेनिंगेन येथील कृषी विद्यापीठात बटाट्यावरील संशोधन केले होते.

केंब्रिज विद्यापीठात १९५२ मध्ये त्यांनी आनुवंशिकतेमध्ये पीएच.डी प्राप्त केली. गुणसूत्र बदल आणि बटाट्याच्या नव्या जाती विकसित करण्याच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची कटक येथील केंद्रीय तांदूळ संशोधन संस्थेत (सीआरआरआय) नियुक्ती झाली होती.

जागतिक अन्न पुरस्कार

स्वामिनाथन यांनी १९८८ मध्ये एम.एस.स्वामिनाथन संशोधन फाउंडेशन (एमएसएसआरएफ) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी अनेक सरकारी संस्थांवर विविध पदे भूषविली. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक (१९६१-७२), भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक, भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव (१९७१-७९) यासह अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

विज्ञान आणि जागतिक घडामोडींवरील पुगवॉश परिषदेचेही ते अध्यक्ष होते. भारतामध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदूळ वाणांचा विकास आणि त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांना जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविणारे स्वामिनाथन हे २००७ ते २०१३ या काळात राज्यसभेचे सदस्यही होते.

जगभरातील विद्यापीठांनी ८४ मानद डॉक्टरेट पदव्यांनी त्यांचा सन्मान केला होता. चेन्नई येथील निवासस्थानी २८ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ.एम.एस स्वामिनाथन यांचे निधन झाले.

‘वडिलांच्या कार्याचा सर्वोच्च सन्मान’

कन्नूर - प्रसिद्ध वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ आणि भारतातील हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांच्या कन्या व ‘डब्लूएचओ’च्या माजी उपसरचिटणीस डॉ सौम्या स्वामिनाथन यांनी स्वागत केले.

त्या म्हणाल्या, ‘वडिलांच्या कार्याला देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने मान्यता मिळाली आहे, याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे. वडिलांच्या संपूर्ण आयुष्यातील कार्यावर भारत सरकार आणि पंतप्रधानांनी मोहोर उमटवल्याचे समाधान मला आहे.

या नव्या या सन्मानाने माझ्या वडिलांनाही आनंद झाला असता; परंतु त्यांनी कधीही पुरस्कारांसाठी काम केले नाही. शेतकऱ्यांचे त्यांच्यावरील प्रेमच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते.

सरकारच्या या निर्णयाने वडिलांचे कुटुंब, मित्रपरिवार, विद्यार्थी आणि हितचिंतकांना आनंद तर झालाच शिवाय समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करू शकता, हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश देशातील तरुणांना मिळाला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.