अहमदाबाद - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना फौजदारी मानहानीप्रकरणी आज हजर राहण्यासाठी गुजरातमधील न्यायालयाने बजावलेले समन्स मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण आम आदमी पक्षाच्या गुजरातच्या विधी विभागाच्या प्रमुखांनी दिले.
गुजरात विद्यापीठाच्या कुलसचिवांनी गुजरातमधील महानगर न्यायालयात केजरीवाल आणि संजय सिंह यांच्याविरुद्ध मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.
न्यायालयाने १५ एप्रिल रोजी केजरीवाल आणि सिंह यांना २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. आपचे गुजरातच्या विधी विभागाचे अध्यक्ष प्रणव ठाकूर यासंदर्भात म्हणाले, की या समन्सबाबत प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला समजले. मात्र, केजरीवाल किंवा संजय सिंह यांना दिल्लीमध्ये अद्याप कोणतेही समन्स मिळाले नाही. हे समन्स मिळाल्यानंतरच ते न्यायालयात हजर होतील, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून केजरीवाल आणि सिंह यांनी गुजरात विद्यापीठाविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप असून विद्यापीठाच्या कुलसचिवांनी महानगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. प्रथमदर्शनी, या प्रकरणी भादंवि कलम ५०० (मानहानी) नुसार खटला दाखल करता येत असल्याचे नमूद करत न्यायालयाने या दोघांविरुद्ध समन्स बजावले.
सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली
आपचे तुरुंगात असलेले नेते व दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना प्रकृती खालावल्यामुळे सफदरजंग रूग्णालयात दाखल करण्यात आले. जैन यांनी आपल्याविरुद्धच्या मनी लाँड्रिग प्रकरणात जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जैन अशक्त झाल्याचे छायाचित्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले. मात्र, त्यांच्या प्रकृतीविषयी तत्काळ सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान, जैन यांचे वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात जैन यांचे वजन तब्बल ३५ किलोंनी कमी झाल्याची माहिती दिली होती. जैन यांनी तुरुंगात नैराश्य जाणवत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांना लोकांमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. जैन यांच्या मानसिक त्रासाबाबत मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन नियमांनुसार त्यांच्यावर उपचार केले जातील, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.