Pune-Delhi Flight : पुणे-दिल्ली विमानाला टग ट्रॅक्टरची धडक..एअर इंडियाच्या विमानाला भगदाड

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला ‘पुश बॅक टग’ (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने मोठे नुकसान झाले. या धडकेत विमानाच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘फ्युजलाज’ला मोठे भगदाड पडले, तसेच विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचेदेखील नुकसान झाले.
Pune-Delhi Airport
Pune-Delhi Airportsakal

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला ‘पुश बॅक टग’ (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने मोठे नुकसान झाले. या धडकेत विमानाच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘फ्युजलाज’ला मोठे भगदाड पडले, तसेच विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचेदेखील नुकसान झाले. त्यामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करावे लागले. या अपघातामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली.

पुणे विमानतळावरून एअर इंडिया फ्लाइट क्रमांक एआय ८५८ गुरुवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी दिल्लीसाठी जाणार होते. ऐरोब्रिजला जोडलेले विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. या वेळी ‘पुश बॅक टग’ची मोठी धडक विमानाच्या खालच्या बाजूस बसली. यात विमानाचा पत्रा कापला गेला अन् भगदाड पडले. ही घटना विमानाच्या अपघातश्रेणीमध्ये येते. त्यामुळे हवाई मंत्रालयाच्या एएआयबी (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) विभागाकडून या घटनेची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

अन् प्रवासी बचावले

पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने सुमारे १६० प्रवासी दिल्लीला निघाले होते. विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्याआधीच विमानाचा असा अपघात झाला. धडक झाल्यावर मोठा आवाज आला. वैमानिकांनी तत्काळ विमानाची पाहणी केली. विमानाला भगदाड पडल्याचे लक्षात येताच उड्डाण रद्द करण्यात आले. विमानाच्या पंखांचेदेखील नुकसान झाले आहे. पंख्यांमध्ये इंधन असते. मात्र मोठा धोका टळला.

प्रवासी सुरक्षा धोक्यात

मागच्या शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या विशेष विमानाचादेखील पुणे विमानतळावर अपघात झाला. त्यांना घेऊन जाण्यासाठी थांबलेल्या विमानाला इंडिगोच्या शिडीची धडक बसली. गुरुवारी याहून अधिक गंभीर घटना घडली. यातून प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

असा झाला अपघात

  • विमान ‘पार्किंग’ ठिकाणावरून टॅक्सी ट्रॅककडे (पार्किंग आणि मुख्य धावपट्टीच्या मधील जागा) निघाले.

  • टॅक्सी ट्रॅकवर विमान आल्यावर ‘पुश बॅक टग’ने विमानाची दिशा बदलण्यासाठी विमानाला ओढण्यास सुरुवात झाली.

  • विमानाच्या पुढच्या बाजूने ‘टग’ने ओढत असताना विमानाचे ‘चाक’ आणि ‘पुश बॅक टग’ यांना जोडलेला टोबार (जॉइंट) तुटला.

  • त्यामुळे ऑपरेटरचे ‘पुश बॅक टग’वरचे नियंत्रण सुटले अन् विमानाला धडक बसली.

  • विमानाची खालची बाजू ज्याला ‘फ्युजलाज’ला भगदाड पडले.

ही अत्यंत गंभीर घटना आहे. यामुळे पुणे विमानतळावरील प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळ प्रशासनाने घटनेचा अभ्यास करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com